चिमुकल्या हातांची जादू

Story: छान छान गोष्ट |
21st February, 11:02 pm
चिमुकल्या हातांची जादू

ए​का छोट्याशा गावात चैतन्य नावाचा एक गोड मुलगा राहायचा. गावच्या ग्रामदैवताची जत्रा म्हणजे चैतन्यसाठी वर्षातला सर्वात मोठा सण! यंदाही जत्रा जोरात भरली होती. चैतन्य आपल्या आई-बाबांसोबत जत्रेत गेला. सगळीकडे रोषणाई, पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि मिठाईचा सुगंध दरवळत होता. चैतन्यने लाकडी घोडा घेतला, गरमागरम जिलेबी खाल्ली आणि मोठ्या पाळण्यात बसून आकाशाला स्पर्श केला. तो खूप आनंदी होता आणि दिवसभर खूप धमाल केली.

​दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य आपले दप्तर पाठीवर मारून शाळेला निघाला. शाळेचा रस्ता त्याच मंदिराच्या मैदानातून जात होता जिथे काल जत्रा भरली होती. पण आज तिथले दृश्य बघून चैतन्यचे पाय अचानक थबकले. काल जिथे रोषणाई आणि झगमगाट होता, तिथे आज सगळीकडे कचऱ्याचे ढीग पडले होते. प्लास्टिकच्या पिशव्या, रिकामे कागदी पेले, उरलेले अन्न आणि कागदाचे तुकडे वाऱ्याने इकडे तिकडे उडत होते. ज्या मंदिराच्या परिसरात तो काल आनंदाने बागडला, तिथे आज घाण आणि दुर्गंधी पसरली होती. हे बघून चैतन्यला 

खूप वाईट वाटले. त्याने मनात विचार केला की ज्या देवाच्या जत्रेत आपण इतकी मजा केली, त्याच्या घराची ही अशी अवस्था कशी?

​शाळेत गेल्यावर चैतन्यचे लक्ष कशातच लागेना. वर्गात जेव्हा त्याच्या आवडत्या देशपांडे बाई आल्या, तेव्हा चैतन्यने धीर करून हात वर केला. तो म्हणाला, "बाई, आज मी जत्रेच्या मैदानातून आलो, तिथे खूप कचरा पडलाय. आपल्याला ते स्वच्छ करता येईल का?" बाईंना त्याचे बोलणे खूप भावले. त्यांनी संपूर्ण वर्गाला विचारले की मुलांनो, आपण जत्रा साजरी केली मग तिथली स्वच्छता करणे ही आपली जबाबदारी नाही का? सगळ्या मुलांनी एका सुरात हो म्हटले. तेव्हा चैतन्यला एक छान कल्पना सुचली. तो उत्साहाने म्हणाला, "बाई, आपण सगळे मित्र मिळून ती जागा साफ करूया का? आम्ही श्रमदान करू!"

​देशपांडे बाईंनी ही संकल्पना लगेच मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापकांना चैतन्यची ही निरागस आणि समाजोपयोगी कल्पना खूपच आवडली. ते म्हणाले की ही तर खूप उत्तम गोष्ट आहे आणि मुलांमध्ये नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी ही मोठी संधी आहे. त्यांनी तातडीने दोन शिक्षक आणि काही मोठ्या वर्गातील मुलांना चैतन्यच्या गटासोबत जाण्यासाठी परवानगी दिली.

​दुपारच्या वेळी सर्व मुले उत्साहाने मंदिराच्या मैदानात पोहोचली. कोणाकडे झाडू होता, तर कोणी कचरा गोळा करायला घरून टोपल्या आणल्या होत्या. चैतन्य आणि त्याच्या मित्रांनी हातात हातमोजे घालून एकेक प्लास्टिकची पिशवी उचलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही गावकरी लांबून हे नवल बघत होते. त्यांना वाटले की ही छोटी मुले काय करणार? पण जेव्हा त्यांनी पाहिले की लहान मुले कशाचीही तमा न बाळगता घामाघूम होऊन मैदानाचा कानाकोपरा साफ करत आहेत, तेव्हा गावकऱ्यांनाही आपली चूक उमजली. बघता बघता काही ग्रामस्थही धावून आले आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागले.

​तासाभराच्या अथक परिश्रमानंतर, त्या मैदानाचा चेहरामोहराच बदलून गेला. कचऱ्याचे ढीग गायब झाले होते आणि मंदिराचा परिसर पुन्हा एकदा आरशासारखा स्वच्छ आणि पवित्र दिसू लागला. काम संपल्यावर सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि हास्य होते. मुख्याध्यापकांनी चैतन्यच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि म्हणाले की आज तुम्ही फक्त मैदान साफ केले नाही, तर पूर्ण गावाला स्वच्छतेचा एक मोठा धडा शिकवला आहे. चैतन्यला खूप अभिमान वाटला. त्याला जत्रेतल्या पाळण्यापेक्षाही जास्त आनंद या 'श्रमदानातून' मिळालेल्या स्वच्छतेत जाणवला.


स्नेहा सुतार