फेब्रुवारी महिना म्हणजे गुलाबी थंडी आणि प्रेमाचे वारे. पण प्रत्येक वेळी लाल गुलाबच हवा असं नसतं; कधीकधी एक पिवळा गुलाब मनातलं द्वंद्व संपवून मैत्रीचं नवं आणि घट्ट नातं गुंफतो.

फेब्रुवारी महिन्याचं पान उलटलं आणि समोर दिसला 'व्हॅलेंटाईन वीक'. "अरे बापरे!" म्हणत ती स्वतःशीच पुटपुटली. पण बाजूला सोफ्यावर बसलेल्या मैत्रिणीला ते ऐकू गेलंच. ४ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शाळेत असल्यापासून दरवर्षी हक्काचं आमंत्रण असायचं आणि तीही तेवढ्याच हक्काने यायची. तिथीने घरी आणि तारखेने या मैत्रिणीच्या घरी, असे ती दोन वाढदिवस साजरे करायची.
कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र दोघींच्या मनात गुलाबी फुलपाखरू बागडत होतं. एकीचं व्यक्त तर दुसरीचं अव्यक्त प्रेम! दोघीही ते गुपचूप एन्जॉय करायच्या. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा अलिखित नियम तिथे लागू होता. गेली दोन वर्षे त्या दोघींचा फेब्रुवारी महिना जणू गुलाबी रंगात न्हाऊन जायचा.
कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच आजचा दिवस काहीसा वेगळा वाटत होता. सगळीकडे एक गोड कुजबुज सुरू होती. कोणी हातात लाल गुलाब धरला होता, तर कोणी पिवळा. काही प्रेमवीर चेहऱ्यावर धाडस दाखवत मिरवत होते, तर काहीजण काळजात धाकधूक आणि डोळ्यांत लाजरेपणा घेऊन आले होते. आज 'रोझ डे' होता—व्हॅलेंटाईन वीकमधला सगळ्यांचा आवडता दिवस! प्रत्येकाला मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारा हा खास दिवस.
गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी तिने एक विशेष गोष्ट ठरवली होती. त्याच्या आवडीचा गुलाबी रंगाचा चुडीदार, मैत्रिणीने तिला आवडते म्हणून घेऊन दिलेली डायरी आणि पेन, खांद्याला स्लिंग बॅग अशा थाटात ती कॉलेजमध्ये आली. "चला, मी जाते माझ्या एक्स्ट्रा लेक्चरला. तू नोट्स लिहून घे हं, मी नंतर कॉपी करते. ऑल द बेस्ट! येणार... येणार... आज लाल गुलाब येणार!" अशी मस्करी करत मैत्रीण निघून गेली.
ती एकटीच लेक्चरला बसली. वही उघडून एका पानावर 'तीन फुल्या, तीन बदाम' असे काहीतरी लिहीत होती, पण मनात मात्र त्याचाच विचार आणि एका डोळ्याने दारावर लक्ष होतं. वर्गात आल्यावर तिने पाहिले, राजकुमार नेहमीच्या जागेवर नव्हते. ते पाहून तिच्या मनात चलबिचल झाली. "आज येणार नाही का? आला असणार तर बाहेर कट्ट्यावर बसला असेल." कॉलेजला येताना मनात अनेक विचार रुंजी घालत होते. "आज तरी उत्तर मिळेल का? उत्तर होकारार्थी असेल तर काय बोलायचं? नकार आला तर कसं सावरायचं? आणि तो समोर आलाच नाही तर? मी जाऊ का स्वतःहून गुलाब घेऊन? फक्त मुलांनीच पुढाकार घ्यायला हवा असा काही नियम आहे का?" असे असंख्य प्रश्न मनात येत होते.
क्लासच्या पायऱ्या चढताना हृदयाची धडधड वाढली होती. नेमके पहिले लेक्चर भूगोलाचे आणि तेही लायब्ररीच्या पहिल्या मजल्यावर! तिला वाटलं आपल्या हृदयाचे ठोके इतरांना तर ऐकू येत नाहीत ना? कारण प्रत्येकजण तिच्याकडे बघून हसत पुढे जात होतं. वर्गाच्या दाराजवळ पोहोचल्यावर तिने पूर्ण वर्ग न्याहाळला. एक वेगळीच लगबग होती; मुलींनी वेणीत गुलाबाची छोटी कळी खोचली होती, तर काही मुलं गप्पांच्या आडून हातातला गुलाब लपवण्याचा प्रयत्न करत होती.
"रोझ डे म्हणजे फक्त प्रेमिकांचा दिवस असतो का? मला तसं वाटत नाही," तिने विचार केला. आज मैत्रीला, आपुलकीला आणि कृतज्ञतेलाही गुलाबाच्या रूपाने एक प्रतीक मिळतं. लाल गुलाब प्रेमाचं, पिवळा मैत्रीचं, तर गुलाबी आपुलकीचं! फुलं रंगानुसार भावना सांगतात, तिथे शब्दांची गरजच राहत नाही. ती बाकावर बसली. खिडकीतून येणारा वारा गुलाबाच्या सुगंधाने भरलेला होता. इतक्यात मागच्या बाकावरची एक मुलगी तिच्या कानात कुजबुजली, "आला बघ तो!"
तो आला होता... वर्गातला नेहमी शांत, अभ्यासू, पण डोळ्यांतून खूप काही बोलणारा. त्यांच्यात कधी स्पष्ट बोलणे झाले नव्हते, पण नजरानजर झाली की काही क्षण जग थांबल्यासारखे वाटे. लेक्चर सुरू होतं, पण कोणाचंही लक्ष नव्हतं. सरांनी नोट्स उद्या देतो म्हणताच, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सरांनीही हसून 'हॅप्पी रोझ डे' म्हणत लेक्चर संपवले.
ती तिथेच बसून राहिली. इतक्यात तो समोर येऊन उभा राहिला. हातात एकच गुलाब! तिच्या श्वासाची लय बदलली. "हे... तुझ्यासाठी," तो थरथरत्या आवाजात म्हणाला. क्षणभर तिला काहीच सुचेना. फक्त त्याचे डोळे आणि हातातला तो पिवळा गुलाब! ती काही बोलली नाही, फक्त हसली. "आपल्या मैत्रीचं प्रतीक... पिवळा गुलाब तुला!" तिचं हे हसून दिलेलं उत्तर हजारो शब्दांहून अधिक होतं. त्या पहिल्या रोझ डेने तिच्या आयुष्यात एक नवं पान उघडलं होतं.
गुलाबाचा आणि त्या मैत्रीचा सुगंध दिवसभर तिच्या सोबत होता. घरी परतताना रस्त्यावर काही तरुण-तरुणी हातात गुलाब घेऊन चालताना दिसत होते. काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर काहींच्या डोळ्यांत पाणी. रोझ डे सर्वांसाठी सारखा नसतो; कुणासाठी तो सुरुवात असते, तर कुणासाठी शेवट. पण प्रत्येकासाठी ती एक आठवण बनते.
रात्री त्या गुलाबाकडे पाहून ती म्हणाली, "खूप छान केलंस, मनातलं व्यक्त करण्याची हिंमत दिलीस. मी ज्याला प्रेम समजत होते, ती खरं तर एक सुंदर मैत्री होती. कदाचित याहीपेक्षा अधिक चांगलं कुणी आयुष्यात येणार असेल, म्हणून ही मैत्री मी मनापासून निभावेन." आता दरवर्षी ती लाल गुलाबाची वाट न बघता, अभिमानाने मैत्रीचा 'पिवळा गुलाब' साजरा करायला तयार झाली होती. आपल्याच विचारांवर ती खुश झाली आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेत तिने त्या पिवळ्या गुलाबासोबत नवीन प्रवासाला सुरुवात केली.

- सौ. मंजिरी वाटवे