पहिली संक्रांत

​रात्री सगळं आवरल्यावर सासूबाई तिच्या जवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या, “छान झाली गं तुझी पहिली संक्रांत.” त्या एका वाक्याने दिवसभराच्या थकव्याचं चीज झाल्यासारखं तिला वाटलं.

Story: पहिलं-वहिलं |
13th February, 10:02 pm
पहिली संक्रांत

ख​रं सांगायचं तर पहिली संक्रांत हा केवळ सण नसतो; तो एक घरगुती प्रयोग असतो. नव्या संसारात नव्या सवयी रुजवायचा, नाती तपासायचा आणि आपल्यालाच आपली ओळख करून देण्याचा तो पहिला प्रयत्न असतो. लग्नानंतरची पहिली संक्रांत येईपर्यंत सासरच्या घरात ती अगदी नीट, मोजक्या शब्दांत बोलणारी, सगळ्यांना “हो बाई, हो चालेल” असं म्हणणारी असते.

​पण संक्रांतीच्या सणाची तयारी सुरू झाली की अचानक तिच्याकडून अपेक्षा वाढतात. “पहिली संक्रांत आहे गं...पाहुण्यांना तिळगूळ नीट दे”, “सासूबाईंच्या मावशी येणार आहेत, मानपान सांभाळ हं”, “वाण तर खासच हवं” अशा सूचना सकाळच्या चहाबरोबरच तिला दिल्या जातात.

​पहिली गंमत सुरू झाली ती 'वाण' काय द्यायचे यावरून. माहेरी ऐकलेलं वेगळं, सासरी चालत आलेलं वेगळं. तिला वाटत होतं, “साधा घरात केलेला तिळगूळ, एखादी साडी, नारळ, सुपारी असं वाण देऊ. नंतर आलेल्या सगळ्यांना सर्वानुमते ठरवून काही उपयोग होईल अशी वस्तू देऊ.” पण सासरी वाण द्यायचं म्हणजे एक छोटंसं दुकानच वाटेल असं सगळं होतं. त्यात डबे, रुमाल, भांडी, साबण, साड्या आणि कधी कधी बोनस म्हणून एखादं फूलसुद्धा!

​असं सगळं तिनं माहेरी एका वाड्यातल्या काकूंना वाण लुटताना बघितलं होतं. दरवर्षी असंच दुकान मांडावं तशा त्या वस्तू त्या मांडून ठेवत. मग आलेल्यांना त्यातली एकेक वस्तू घ्यायला सांगत व तिळगूळ देत. हे सगळं आठवून ती गालातल्या गालात हसली आणि कुणी बघितलं नाही ना, असा विचार करून इकडे तिकडे बघू लागली. तिची गोंधळलेली नजर पाहून सासूबाई हसून म्हणाल्या, “हळूहळू कळेल गं तुला.”

​दुसरी गंमत म्हणजे तिळगुळाचा गोडवा. तिळगूळ करताना सगळ्यांचे सल्ले एकाच वेळी मिळतात. “जास्त गूळ घालू नको”, “तीळ भाजलेत ना?”, “हा तिळगूळ घट्ट झालाय वाटतं!” तेव्हा तिने मनात म्हटलं, “बोला ग बाई, मी ऐकतेय! आईकडे असताना जरा लक्ष दिलं असतं तर आज मी अशा सूचना ऐकत बसले नसते. सकाळी लवकर उठून तिळगूळ करून तुम्हाला सरप्राईज दिलं असतं.” असं ती मनातल्या मनात बोलत असतानाच तिने एका वाटीत तिळगूळ काढून ठेवला. आई म्हणाली होती की, कुणालाही न सांगता पहिला तिळगूळ बाजूला लपवून ठेवायचा असतो. "वा! मला बरं योग्य वेळी आठवलं," असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटत तिने हा अलिखित नियम पाळला.

​हळदीकुंकू आणि वाण लुटण्यासाठी सगळ्या स्त्रिया जमल्यावर खरी परीक्षा सुरू झाली. प्रत्येक जण हसून म्हणायची, “पहिली संक्रांत आहे ना?” तिला त्या वाक्यात कधी कौतुक वाटायचं, तर कधी 'आता जबाबदारी घ्यायला तयार हो' असा सुचवलेला इशारा वाटायचा. कोणी दिलेलं वाण बघतंय, कोणी तिळगुळाची चव घेतंय, तर कोणी तिची साडी निरखतंय. त्या सगळ्या नजरांचा सामना करताना तिला जाणवलं की, खरंच आपण आता या घराचा एक अविभाज्य भाग झालो आहोत. सगळ्यांनी आज किती सांभाळून घेतलं आपल्याला!

​सकाळी गुळपोळी करताना उडालेली धांदल, तव्यावरची पोळी उलटताना हाताला बसलेला चटका आणि “आई ग!” म्हणताच सासूबाईंनी फुंकर घातल्यावर तिचं मन हळवं झालं. “कशी वेंधळी आहेस तू! बरं झालं मी किचनमध्ये होते, नाहीतर काय केलं असतंस?” हे वाक्य ऐकताना जणू आपली आईच बोलतेय असा तिला भास झाला. दुपारी गोडधोड जेवण झाल्यावर घर वामकुक्षीसाठी शांत होतं, पण ती मात्र हळदीकुंकूच्या तयारीत मग्न होती. मनात विचारांच चक्र सुरू होतं. 'असं करेन, तसं करेन... आईला फोनवर विचारू का? की जाऊन येऊ? अर्ध्या तासाचा तर प्रवास आहे.' इतक्यात नवरोबा म्हणाले, "राणीसाहेब, काय स्वतःशीच बोलताय?" तशी ती हसली. सकाळी स्वयंपाक करताना जी घबराट होती, ती आता तिच्यासाठी एक गोड आठवण बनली होती.

​संध्याकाळी चहा पिऊन सासूबाई, ती आणि तिची पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी माहेरून आलेली नणंद छान तयार होऊन हॉलमध्ये आल्या. देवाला व तुळशीला तिळगूळ आणि हळदीकुंकू वाहून त्या गप्पा मारत बसल्या. हळूहळू सुवासिनी येऊ लागल्या आणि हॉल हसण्या-खिदळण्याने गजबजून गेला.

​रात्री सगळं आवरल्यावर सासूबाई तिच्या जवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या, “छान झाली गं तुझी पहिली संक्रांत.” त्या एका वाक्याने दिवसभराच्या थकव्याचं चीज झाल्यासारखं तिला वाटलं. ती मनात म्हणाली, 'पहिली संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, तर तो नवीन नात्यांचा, नवीन भूमिकांचा आणि हळूहळू उमलणाऱ्या आपुलकीच्या गोड क्षणांचा साक्षीदार असतो.'

​दिवसभरातल्या आठवणींची उजळणी करत तिने साडीची घडी घातली आणि खोली आवरायला सुरुवात केली. तिच्या मनात विचार आला, पुढच्या वर्षी मी सुद्धा इतरांसारखं म्हणणार,

“काही काळजी करू नकोस... पहिली संक्रांत आहे ना!”

हा विचार करून ती कितीतरी वेळ स्वतःशीच हसत राहिली.


- ​सौ. मंजिरी वाटवे