योग्य वेळी तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ब्रीच स्थितीतही सुरक्षित प्रसूती शक्य असते. सुरक्षितता, जागरूकता आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन हेच यशस्वी मातृत्वाचे गमक आहे.

ईशाच्या अगदी सुरळीतपणे चाललेल्या गर्भावस्थेच्या ३६ व्या आठवड्यांच्या स्कॅन मधे अचानक समजले की आतापर्यंत बाळाचे डोके सीफॅलीक स्थिती म्हणजेच गर्भाशयात खालच्या दिशेने असायला हवे होते पण त्या ऐवजी डोके वर व पाय खालच्या दिशेमधे आलेले आहेत. ते बघताच डॉक्टरांनी आता ही स्थिती बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे असे सांगून एका आठवड्यानंतरची सीजेरीयन साठी तारीख दिली. नॉर्मल डिलिव्हरीसाठी मनाची सगळी तयारी केली असता अचानक सिझेरियनचे ऐकले व ईशाला धक्काच बसला..
गर्भावस्थेच्या शेवटच्या आठवड्यातील बाळाची स्थिती ही सुरक्षित प्रसूतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. सामान्यपणे नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रसूतीच्या वेळी बाळाचे डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत असते. पण काही वेळा बाळाचे डोके वर आणि नितंब किंवा पाय खाली अशी स्थिती आढळते. या स्थितीला “ब्रीच प्रेझेंटेशन” असे म्हणतात. अशी स्थिती आढळल्यावर वरील उदाहरणातील ईशासारख्या इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना एकच प्रश्न पडतो — “आता सिझेरियनच करावे लागेल का?”
या प्रश्नाचे उत्तर सरळ “हो” किंवा “नाही” असे देता येत नाही. प्रत्येक गर्भधारणा ही वेगळी असते आणि निर्णय हा परिस्थितीनुसार घेतला जातो.
ब्रीच प्रेझेंटेशन म्हणजे काय?
ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये बाळाचे नितंब किंवा पाय गर्भाशयाच्या खालच्या भागाकडे असतात आणि डोके वरच्या बाजूला असते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत ही स्थिती सामान्य असते, कारण बाळ गर्भाशयात मुक्तपणे फिरत असते. मात्र ३६–३७ आठवड्यांनंतर बाळ गर्भाशयात हालचाल करू न शकल्याने एका जागेत स्थित होते. बाळ सीफॅलीक पोजीशन न घेता दुसऱ्या स्थितीत आल्याने, ते प्रसूतीसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
ब्रीच प्रेझेंटेशनचे प्रकार
ब्रीच प्रेझेंटेशनचे तीन मुख्य प्रकार आहेत:
फ्रँक ब्रीच: नितंब खाली आणि पाय वर सरळ.
शरीरातील सर्वात मोठा भाग असल्याने अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे बाळाला ऑक्सिजन कमी मिळण्याचा धोका असतो. या कारणांमुळे अनेक डॉक्टर सुरक्षिततेच्या दृष्टीने सिझेरियन निवडतात.
नैसर्गिक प्रसूती शक्य असते का?
होय, काही स्थितींमध्ये ब्रीचमध्येही नैसर्गिक प्रसूती शक्य असते. विशेष करून फ्रँक ब्रीच, योग्य वजनाचे पूर्णकालीन बाळ आणि आईची श्रोणी प्रसूतीस योग्य असल्यास, अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली नैसर्गिक प्रसूती केली जाऊ शकते. मात्र यासाठी रुग्णालयात आपत्कालीन सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक असते.
बाळाची स्थिती बदलण्याचा पर्याय
३६–३७ आठवड्यांदरम्यान “एक्स्टर्नल सेफेलीक वर्जन(इ सी व्ही)” नावाची प्रक्रिया करून डॉक्टर बाळाची स्थिती बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न करू शकतात. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर बाळ डोके खाली स्थितीत येऊ शकते आणि सामान्य प्रसूतीची शक्यता वाढते.
निर्णय कसा घ्यावा?
प्रसूतीचा प्रकार ठरवताना केवळ भीती किंवा सोय यावर निर्णय घेऊ नये. आईचे आरोग्य, बाळाची स्थिती, गर्भधारणेचा कालावधी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा. प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते, त्यामुळे इतरांच्या अनुभवावरून आपण निष्कर्ष काढू नये.
ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये नेहमीच सिझेरियन करावे लागते असे नाही; आई आणि बाळाचे आरोग्य हेच सर्वात महत्त्वाचे असते व ते ध्यानात ठेवता अनेक परिस्थितींमध्ये सिझेरियन अधिक सुरक्षित ठरते. योग्य वेळी तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ब्रीच स्थितीतही सुरक्षित प्रसूती शक्य असते. सुरक्षितता, जागरूकता आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन हेच यशस्वी मातृत्वाचे गमक आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर