जेव्हा आम्ही उत्तरपत्रिका तपासायला घेतो, तेव्हा खरं चित्र समोर येतं. मुलं कुठे चुकली, आम्ही शिकवताना कुठे कमी पडलो का, मुलांनी संकल्पना चुकीच्या समजून घेतल्या का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या उत्तरपत्रिकेत दडलेली असतात. ती केवळ कागदाची पानं नसून आमच्या वर्षभराच्या मेहनतीचा आरसा असतो.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट, काकीचा फोन आला. बोलता बोलता ती काळजीत पडलेली जाणवली. माझी चुलत बहीण, जी आता नववीत आहे, तिने परीक्षेचा प्रचंड ताण घेतला आहे. वर्गात पहिली येण्याच्या ध्यासापायी ती पहाटे दोन-दोन वाजेपर्यंत जागत असते. अभ्यासाच्या या ओझ्याखाली तिचे हसणे-खेळणे हरवले असून ती खूप बारीकही झाली आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केलाच, पण दुसऱ्याच दिवशी मामीचा फोन! तिचा मुलगा बाबू, तोही नववीतच, पण त्याची तऱ्हा वेगळीच. तो अभ्यासाकडे ढुंकूनही पाहत नाही. "हा नापास होईल, तूच याला काहीतरी सांग," म्हणत मामी रडू लागली. या दोन टोकाच्या मुलांशी बोलताना मला जाणवले की, परीक्षेचा हा बागुलबुवा प्रत्येकाच्या मनात वेगळ्या पद्धतीने घर करून बसला आहे.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. या काळात केवळ विद्यार्थीच नाही, तर एक शिक्षक म्हणून आमचीही अवस्था काही वेगळी नसते. माझी एक सहशिक्षिका नेहमी म्हणायची, "यांची बोर्डाची परीक्षा म्हणजे जणू आमच्या पोटात येणारी कळच!" हे विधान किती सार्थ आहे, याचा अनुभव मला दरवर्षी येतो. वर्षभर आम्ही मुलांना मनापासून शिकवतो, त्यांच्याकडून उजळणी करून घेतो, पण त्या तीन तासांत त्यांनी काय आणि कसं लिहिलंय, यावर आमचं वर्षभराचं कर्तृत्व अवलंबून असतं. मुलांची परीक्षा ही खरं तर शिक्षकांचीही सत्वपरीक्षाच असते. मुलांनी किती आत्मसात केलंय, हे जाणून घेण्यासाठी एक शिक्षक तितकाच आतुर असतो.
परीक्षा हॉलमधील वातावरण तर अजूनच वेगळं असतं. तिथे आम्हा शिक्षकांना 'परीक्षक' आणि 'पर्यवेक्षक' अशा दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागतात. ज्या मुलांना आपण वर्षभर मायेने शिकवलं, त्याच मुलांसमोर परीक्षेच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखं गंभीरपणे उभं राहावं लागतं. आपलीच मुलं कॉपी तर करत नाहीत ना, हे पाहणं मनाला खरं तर वेदना देणारं असतं. तिथे "नजर हटली की दुर्घटना घडली" अशीच काहीशी परिस्थिती असते. कोणाची तरी कारकीर्द पणाला लागलेली असते, त्यामुळे डोळ्यांत तेल घालून उभं राहावं लागतं. प्रत्येक हॉलतिकीट तपासणं, प्रत्येक उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी करणं, हे काम सुरुवातीला खूप जिकिरीचं वाटायचं, पण आता ती सवय झाली आहे.
कधी कधी खूप वाईट वाटतं जेव्हा एखादा पेपर कठीण जातो आणि मुलं त्याचं खापर शिक्षकांवर फोडतात. मला स्वतःला असा अनुभव आला आहे की, पेपर समाधानकारक न झाल्यास मुलं शिक्षकांना दोष देतात. पण अशा वेळी मला पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, मुलं कॉपीचा पर्याय का निवडतात? अभ्यास झाला नसेल, तर आपल्याला जेवढं येतंय तेवढं प्रामाणिकपणे लिहूनही उत्तीर्ण होता येतं. अपयश आलं तर पुढच्या वेळी अधिक जोमाने अभ्यास करता येतो. पण चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश काय कामाचं?
या सगळ्याचा विचार करताना असं वाटतं की, आपली शिक्षण पद्धती कुठेतरी 'घोकमपट्टी' (Rote Learning) कडे झुकली आहे. इथे मूळ सिद्धांत किंवा संकल्पना समजून घेणाऱ्यापेक्षा, पुस्तकातलं जशास तसं उत्तरपत्रिकेवर उतरवणाऱ्याला जास्त महत्त्व दिलं जातं. ज्याला पाठांतर चांगलं जमतं, तो बाजी मारतो आणि ज्याची समज चांगली आहे पण पाठांतर कमी, तो मागे पडतो. ही तफावत पाहून कधी कधी खूप चीड येते. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट ज्ञान मिळवणं हे असावं, केवळ मार्क मिळवणं नाही.
परीक्षा संपली की एक प्रकारची उदासीनता किंवा रिकामपण जाणवतं. पण जेव्हा आम्ही उत्तरपत्रिका तपासायला घेतो, तेव्हा खरं चित्र समोर येतं. मुलं कुठे चुकली, आम्ही शिकवताना कुठे कमी पडलो का, मुलांनी संकल्पना चुकीच्या समजून घेतल्या का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या उत्तरपत्रिकेत दडलेली असतात. ती केवळ कागदाची पानं नसून आमच्या वर्षभराच्या मेहनतीचा आरसा असतो.
शेवटी एक स्त्री आणि एक शिक्षिका म्हणून मला एवढंच वाटतं की, मुलांच्या आरोग्यापेक्षा आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यापेक्षा कोणतीही परीक्षा मोठी नसते. पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून हे दडपण कमी केलं पाहिजे. परीक्षा हे आयुष्याचं एक स्टेशन आहे, संपूर्ण आयुष्य नाही. अभ्यासाचं ओझं न होता, तो एक आनंदाचा प्रवास झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सुजाण पिढी घडेल.

- श्रुती करण परब