पायपुसणी: एक 'बडे कामकी चीज'

'पायपुसणे' या शब्दावरून आठवण होते ती पूर्वीच्या जमान्यात स्त्रियांना नगण्य लेखताना केल्या जाणाऱ्या तुलनेची. आजही काही असंस्कारक्षम घरांमध्ये स्त्रीची किंमत पायातल्या चपलेइतकी किंवा पायपुसण्याइतकीच मानली जाते. वापरून झाल्यावर फेकून द्यावे, अशा घाणेरड्या मानसिकतेची जोपासना ज्या घरात होते, तिथली मुले मोठी झाल्यावर काय आदर्श ठेवणार?

Story: ललित |
06th February, 11:36 pm
पायपुसणी: एक  'बडे कामकी चीज'

अापल्या रोजच्या पाहण्यातील आणि वापराची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या दाराबाहेर असलेली पायपुसणी. आत-बाहेर करताना ती सहज नजरेस पडते. पाहताना किंवा म्हणताना जरी ती अगदी क्षुल्लक वाटत असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती “बडे कामकी चीज” आहे. गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या दारात तिचे अस्तित्व असतेच. अर्थात, गुणवत्तेनुसार त्यात भारी किंवा हलके असे प्रकार असू शकतात, पण उपयोगाच्या दृष्टीने ती सर्वांसाठी तितकीच महत्त्वाची आहे.

हल्ली वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून पायपुसण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घराच्या सुख-समृद्धीशी त्याचे नाते जोडले जाते. ते कसे असावे आणि कसे नसावे, याचे नियमही दाखवून दिले जातात. काही जणांच्या सांगण्याप्रमाणे, या पायपुसण्याखाली तुरटी ठेवली तर ते शुभ असते; घराला कोणाची दृष्ट लागत नाही. आपण नेहमीच आपल्या घराचे शुभ चिंतत असतो, त्यामुळे "हे ही करून पाहूया" अशा विश्वासाने लोक काही गोष्टी करतात. पायपुसण्याचा मुख्य उपयोग म्हणजे धूळ, माती आणि चिखलाला प्रतिबंध करणे. मात्र, वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरात येणारी व्यक्ती जर सोबत नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असेल, तर त्यालाही याद्वारे प्रतिबंध होतो असे मानले जाते. मंदिरात प्रवेश करताना आपण पाय धुतो; त्यावेळी मनात असलेले राग, लोभ, द्वेष या भावना आणि त्यामुळे उद्विग्न झालेले मन पायाला पाण्याच्या थंडगार स्पर्शाने शांत होते. पूर्वी लोक दाराबाहेर पाण्याची बादली आणि तांब्या ठेवत असत, जेणेकरून पाय धुवूनच घरात प्रवेश करता येईल. आजच्या काळात ते शक्य नसल्यामुळे, किमान पायपुसण्यावर पाय पुसून तरी आत यावे, अशी योजना असते.

दाराबाहेरची रांगोळी जशी लक्ष वेधून घेते, तसे कधी कधी सुंदर पायदान पाहून येणाऱ्याचे मन प्रसन्न होते. कोणत्या रंगाचे आणि आकाराचे पायपुसणे वापरावे, हे ज्याची त्याची कलात्मक दृष्टी ठरवते. गरिबाच्या झोपडीबाहेर किंवा शेतकऱ्याच्या दारात साधे तरटाचे किंवा गोणीचे पायपुसणे असते, तर मध्यमवर्गीय स्त्रिया जुन्या साडीचे पायपुसणे बनवून वापरतात. आज बाजारात वीस रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतची पायपुसणी उपलब्ध आहेत. आकार, रंग, कापड आणि डिझाइनवर त्यांची किंमत ठरते. विणकाम केलेली, लोकरीची किंवा गालीचासारखी पायपुसणीही मिळतात. बाथरूमबाहेर किंवा किचनबाहेर पाय घसरू नये, अशा विशिष्ट पद्धतीची पायपुसणी वापरली जातात. काही 'Welcome' ने स्वागत करणारी असतात, तर काही हात जोडून नमस्कार करणारी. सध्या 'बेस्ट आउट ऑफ वेस्ट'च्या माध्यमातून जुन्या साड्या किंवा ओढण्यांपासून कलात्मक पायपुसणी बनवण्याच्या कल्पना राबवल्या जातात. मॉलमध्ये तर इतकी सुंदर पायपुसणी मिळतात की, त्यावर खराब पाय ठेवायलाही मन धजावत नाही. काथ्यापासून किंवा मऊमऊ लोकरीपासून बनवलेली ती पायपुसणी श्रीमंती प्रदर्शनासाठी असावीत असे वाटते.

माझ्या लहानपणी धान्याची रिकामी झालेली पोती हेच जास्त वापरले जायचे. त्यावर काही स्त्रिया जुन्या साडीचे वेष्टन शिवत असत. आताच्या काळात पोती सुद्धा प्लास्टिक सदृश पिशव्यांचीच असतात, ज्याने पाय नीट पुसले जात नाहीत. कुठे तारांची तर कुठे रबराची पायपुसणी दिसतात, पण ती धुवायला कठीण जातात आणि त्यात घाण अडकून राहते. पावसाळ्यात चिखलाने माखलेले पाय असोत की धुळीने भरलेली पावले, पोती किंवा बारदान हेच योग्य ठरायचे. मी काही ठिकाणी तर या पायपुसण्याचा आणखी एक उपयोग पाहिला आहे, तो म्हणजे घराबाहेर जाताना घराची चावी पायपुसण्याखाली लपवून ठेवणे. हे गुपित फक्त घरातल्या लोकांनाच माहिती असायचे.

'पायपुसणे' या शब्दावरून आठवण होते ती पूर्वीच्या जमान्यात स्त्रियांना नगण्य लेखताना केल्या जाणाऱ्या तुलनेची. आजही काही असंस्कारक्षम घरांमध्ये स्त्रीची किंमत पायातल्या चपलेइतकी किंवा पायपुसण्याइतकीच मानली जाते. वापरून झाल्यावर फेकून द्यावे, अशा घाणेरड्या मानसिकतेची जोपासना ज्या घरात होते, तिथली मुले मोठी झाल्यावर काय आदर्श ठेवणार? स्त्रीला पायपुसणे समजण्याची घोडचूक करणारे पुरुष मात्र अखेर तोंडघशी पडतात. पायपुसणे जरी निर्जीव असले तरी स्त्रीला मन आणि भावना असतात. ती काही काळ मुकाट्याने सहन करेल, पण वेळ आली की ती जगाला दाखवून देईल की तिचे महत्त्व काय आहे आणि तिच्या स्वत्वाची किंमत काय असते.


प्रतिभा कारंजकर 

फोंडा