मन, वेदना आणि संवेदना

जर आज आपण थोडे अधिक संवेदनशील झालो, थोडे अधिक सहानुभूतीने वागलो, तर अनेक नात्यांमध्ये उब निर्माण होईल. आज आपण दुसऱ्याला आधार दिला, तर उद्या गरज पडल्यावर कुणीतरी आपल्यालाही आधार देईल. हा परस्परांचा विश्वासच समाजाला मजबूत बनवतो.

Story: लेखणी |
06th February, 11:38 pm
मन, वेदना आणि संवेदना

अाजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि अपेक्षांनी भरलेल्या काळात एक गोष्ट हळूहळू पण ठामपणे जाणवते आहे, ती म्हणजे माणसाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. बाहेरून हसरा दिसणारा माणूस आतून तुटलेला असू शकतो, हे सत्य आता रोजच्या आयुष्यात वारंवार समोर येत आहे. मानसिक वेदना या दिसत नसल्या तरी त्या खोलवर परिणाम करणाऱ्या असतात.

आज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मानसिक तणावातून जात आहे. अभ्यासाचा ताण, नोकरीची असुरक्षितता, कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या, एकटेपणा, अपेक्षांचा भार  या सगळ्यांचा एकत्रित परिणाम माणसाच्या मनावर होत आहे. त्यामुळे अनेक लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालले आहेत. नैराश्य, अस्वस्थता, भीती, निराशा अशा भावना आता अपवाद राहिलेल्या नाहीत, तर त्या सर्वसामान्य झालेल्या आहेत. दुर्दैवाने, आत्महत्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे, ही समाजासाठी अतिशय गंभीर बाब आहे.

या सगळ्या परिस्थितीत मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे अत्यंत गरजेचे आहे, याबाबत कुणाचाही वाद नाही. पण त्याचबरोबर एक प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे आपण माणूस म्हणून एकमेकांसाठी नेमके काय करत आहोत? आपण समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करतो का? की फक्त आपलीच अडचण, आपलाच राग, आपलीच घाई या गोष्टी पुढे ठेवतो?

आज समाजात सहानुभूतीपेक्षा टीका जास्त झाली आहे. चुका दाखवण्याऐवजी चुकांवर बोट ठेवले जाते. एखादा माणूस खचलेला दिसला, की त्याच्या मनात काय चालले असेल, याचा विचार न करता लगेच मत मांडले जाते. पण खरे तर, थोडी समजूतदारपणा आणि थोडे सौम्य वागणे अनेकांचे आयुष्य वाचवू शकते.

याच संदर्भात एक छोटा पण मनाला भिडणारा प्रसंग आठवतो. एकदा घरी वस्तू आणण्यासाठी झोमॅटो वरून एक डिलिव्हरी करणारा तरुण आला होता. त्याला यायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला होता. मी रागातच बाहेर गेले होते. पण त्याला पाहताच माझा राग क्षणात मावळला. तो तरुण रडत होता. त्याच्या डोळ्यांत पाणी भरलेले होते, चेहऱ्यावर निराशा आणि थकवा स्पष्ट दिसत होता. मी त्याच्यावर ओरडले नाही. शांतपणे विचारले की उशीर का झाला. तो फक्त एवढेच म्हणाला की काही अडचण झाली होती आणि तो ठीक आहे. मी त्याला का रडत आहे असे विचारले, पण त्याने काही सांगितले नाही. शेवटी फक्त ‘काळजी घ्या’ एवढेच शब्द बोलून मी आत आले.

त्या दिवशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की  कधी कधी आपल्याला उशिरा मिळालेली एखादी वस्तू जितकी महत्त्वाची वाटते, त्यापेक्षा समोरच्या माणसाचे दुःख कितीतरी मोठे असू शकते. आपण जर थोडा संयम ठेवला, थोडी माणुसकी दाखवली, तर कदाचित समोरचा माणूस थोडा तरी हलका श्वास घेऊ शकेल.

माझ्या स्वतःच्या आयुष्यातही असे अनेक क्षण आले आहेत, जेव्हा मी मानसिकदृष्ट्या खचले होते. त्या वेळी काही समजूतदार शिक्षकांनी, प्राध्यापकांनी आणि काही जिवलग मित्र-मैत्रिणींनी मला समजून घेतले, ऐकून घेतले, साथ दिली. त्यांच्या एका शब्दाने, एका विश्वासाने मला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली. म्हणूनच मला ठामपणे वाटते की मानसिक आधार हा औषधांपेक्षा कधी कधी अधिक प्रभावी ठरतो.

आपण विद्यार्थी असो, शिक्षक असो, कार्यालयात काम करणारे असो, एखाद्या मोठ्या पदावर असो किंवा साधे काम करणारे असो. समोरच्या माणसाला समजून घेण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. हीच गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवते. चूक कोणाकडूनही होऊ शकते. मानसिकदृष्ट्या कुठलाही माणूस कधीही खचू शकतो. याचा अर्थ तो कमकुवत आहे असे नाही, तर तो माणूस आहे याचीच ती खूण आहे.

जर आज आपण थोडे अधिक संवेदनशील झालो, थोडे अधिक सहानुभूतीने वागलो, तर अनेक नात्यांमध्ये उब निर्माण होईल. आज आपण दुसऱ्याला आधार दिला, तर उद्या गरज पडल्यावर कुणीतरी आपल्यालाही आधार देईल. हा परस्परांचा विश्वासच समाजाला मजबूत बनवतो.

मानसिक स्वास्थ्य ही फक्त वैयक्तिक बाब नाही, ती सामाजिक जबाबदारी आहे. आपण प्रत्येकाने थोडे थांबून, थोडे ऐकून, थोडे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित अनेकांचे आयुष्य अधिक सुंदर, अधिक सुरक्षित आणि अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल. आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मानवतेकडे एक पाऊल पुढे टाकले असे म्हणता येईल.


धनश्री विजय जाधव

गोवा विद्यापीठ