शापोरा नदीने मला फक्त आठवणी दिल्या नाहीत; तिने मला आत्मविश्वास, संवेदनशीलता, जिज्ञासा आणि निसर्गाबद्दल आदर दिला.

गोव्यातील बालपण हे बंद खोलीत नव्हे तर निसर्गाच्या सान्निध्यात, नदीकिनाऱ्यावर आणि वाळूत उमलत असते. माझ्यासाठी शापोरा नदी ही केवळ समुद्राकडे वाहणारी नदी नव्हती; ती माझे खेळाचे मैदान, माझी पहिली शाळा आणि निसर्गाशी जुळलेले नाते होती.
नदीकिनाऱ्यावरील विस्तीर्ण वाळूचा पट्टा हेच आमचे क्रिकेटचे मैदान होते. कुठलीही आखीव-रेखीव पिच नव्हती, सीमारेषा नव्हत्या, फक्त वाळूत काढलेली तात्पुरती विकेट आणि मनातला उत्साह. वाळूत क्रिकेट खेळणे सोपे नव्हते. चेंडू कधी हळू जाई, कधी वाळूत रुतून बसे. प्रत्येक धाव मेहनतीने घ्यावी लागे. आम्ही अनवाणी खेळत असू, अंगभर वाळू लागलेली असायची; पण चेहऱ्यावर समाधान आणि आनंद असायचा.
याच शापोरा नदीत मी पोहायला शिकले. कोणतेही प्रशिक्षक नव्हते, पोहण्याचा तलाव नव्हता. उथळ पाण्यातून, मोठ्यांकडे पाहत, हळूहळू धैर्य गोळा करत आम्ही पोहायला शिकलो. सुरुवातीला भीती वाटणारे पाणी हळूहळू आपलेसे झाले. पाण्यावर तरंगण्याचा आणि स्वतः पोहण्याचा पहिला अनुभव आजही विसरता येत नाही. नदीने मला आत्मविश्वास दिला.
ओहोटीच्या वेळी पाण्याच्या उथळ भागात लहान-लहान मासे चमकत पोहताना दिसत. आम्ही छोट्या डब्यांमध्ये त्यांना अलगद पकडण्याचा प्रयत्न करत असू. कधी खेळताना पायांनी पाणी उडवत असू, तर त्या उड्यांमुळे मासे चार दिशांना पळत. कधीकधी एखादा मासा वाळूत येऊन पडत असे. तेव्हा आम्ही लगेच त्याला अलगद उचलून पुन्हा पाण्यात सोडत असू. त्या लहान वयातही आम्हाला जाणवत होते की नदी हे त्यांचे घर आहे आणि आपण फक्त पाहुणे आहोत.
वाळूत छोटे खेकडे त्यांच्या बिळांतून बाहेर येताना दिसत. आमच्या पावलांचा आवाज झाला की ते क्षणार्धात आडवे पळत जाऊन बिळात लपून बसत. आम्ही शांत उभे राहून त्यांना पुन्हा बाहेर येताना पाहत असू. त्या निरीक्षणातून नकळत निसर्गातील जीवसृष्टीची जाणीव होत गेली.
आम्ही वाळूत छोटे घर, किल्ले बांधत असू. शिंपले, पाने, काड्या लावून सजावट करत असू. काही वेळात लाट येऊन ते घर पुसून टाकत असे. निसर्गाचे बदलते स्वरूप आणि क्षणभंगुरता आम्हाला अशाच खेळातून कळत होती.
नदीकिनारी असलेल्या बोरांच्या झुडुपांतून पिकलेली बोरं तोडून खाणे हा आमचा आणखी एक आनंद होता. आंबट-गोड चव आणि मैत्रीची साथ, हेच आमचे सुख होते.
नदीकाठाने मला वैज्ञानिक जिज्ञासाही दिली. विविध प्रकारच्या शैवाल (algae) आणि गवतांचे नमुने गोळा करून त्यांचे रंग, आकार, पोत पाहणे मला आवडायचे. तेव्हा तो फक्त कुतूहल होता; पण पुढे वनस्पतिशास्त्रातील माझ्या अभ्यासाची तीच बीजे ठरली.
नदीवर जाळी टाकणारे मच्छीमार पाहणे हे विशेष आकर्षण होते. ते कौशल्याने जाळे पाण्यात टाकत आणि थोड्या वेळाने ओढून घेत. जाळ्यात अनेकदा मासे तर येतच, पण त्याबरोबर नदीतील भरपूर गवतही अडकलेले असायचे. त्या गवतामध्ये कधी कधी नाजूक समुद्री घोडे (सी-हॉर्स) दिसायचे. त्या छोट्या, वेगळ्या आकाराच्या जीवांना जवळून पाहणे हा जणू एखादा चमत्कारच वाटायचा. ते गवताला अलगद चिकटून स्थिर उभे असायचे. त्या क्षणांनी माझ्या मनात जलजीवसृष्टीबद्दल अधिक आदर आणि आकर्षण निर्माण केले.
आज विकासाच्या नावाखाली अशा अनेक नैसर्गिक जागा कमी होत चालल्या आहेत. नदीकिनारे बदलत आहेत, मोकळी वाळूची मैदाने कमी होत आहेत. मुलांना निसर्गाशी असा थेट संपर्क कमी मिळतो आहे. हे केवळ खेळाचे नुकसान नाही, तर भावनिक आणि शैक्षणिक हानी आहे.
शापोरा नदीने मला फक्त आठवणी दिल्या नाहीत; तिने मला आत्मविश्वास, संवेदनशीलता, जिज्ञासा आणि निसर्गाबद्दल आदर दिला. वाळूतील क्रिकेट, पाण्यातील पोहणे, बोरांची चव, खेकडे, मासे आणि जाळ्यात अडकलेले समुद्री घोडे, हे सारे क्षण आजही मनात जिवंत आहेत.
कधी कधी आयुष्याची खरी शिकवण वर्गात नव्हे, तर नदीकिनारी वाळू, पाणी आणि निसर्गाच्या सान्निध्यात मिळते.
