"शरीराचे योग्य पोषण करून त्याचा आदर करा, " असे वेद सांगतात. मात्र, पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्याच श्रेष्ठ संस्कृतीला नावे ठेवतो.

"गण्या, अरे बकासुरासारखा टोपलीभर एकाच वेळी खाऊ नकोस. पोटात अन्न, पाणी आणि हवा यांना आपापली जागा मिळालीच पाहिजे. तसं झालं तरच ते अन्न तुझं भलं करेल आणि तुझ्या अंगी लागेल. नाहीतर पोट बिघडल्यावर अन्नाला दोष देशील. असं वारंवार झालं की डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येईल. आणि हेच डॉक्टर अन् आहारतज्ज्ञ नेमके तुझे आवडीचेच पदार्थ खाऊ नका म्हणून सांगतील," आई आपल्या मुलाला समजावून सांगत होती.
हे दृश्य हल्ली बहुतांश घरांत पाहायला मिळते. बाजारात मिळणारे वडापाव, चिप्स, पिझ्झा, बर्गर, लोणी घातलेले पदार्थ हे कधीतरी खाणे ठीक आहे; पण हल्ली आपण सगळीकडेच बघतो की, घरी बनवायचा कंटाळा म्हणून झटपट मिळणाऱ्या या पदार्थांवर ताव मारला जातो. हळूहळू याचीच सवय होऊन जाते आणि मग किती खाल्ले जाते, याकडे खाणाऱ्याचे लक्ष राहत नाही. पदार्थ चविष्ट लागला की तो वारेमाप खाल्ला जातो. काही दिवसांनी जसा त्याचा दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतो, तसे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडे जाणे भाग पडते. मग डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ काय खाऊ नये, याची यादी देतात. त्यांनी दिलेल्या मोजमापाचे आणि आहाराचे सुरुवातीला कौतुक केले जाते; पण हळूहळू ते मोजमाप आणि तो आहार कंटाळवाणा वाटू लागतो, कारण ते आपण स्वेच्छेने स्वीकारलेले नसते. त्यामुळे हे बंधन जास्त काळ पाळणे जमत नाही आणि पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' सुरू होते.
'अति तिथे माती' ही फार जुनी म्हण आहे. बाहेरचे खाण्याचा किंवा अति खाण्याचा अतिरेक झाला की, मग नको त्या व्याधी मागे लागतात. ही सवय अगदी शालेय वयापासून लागते. पालक कधी कधी सोय म्हणून मुलांना डब्यात विकतचे समोसे, चिप्स किंवा बर्गर देतात. याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर झालेला स्पष्ट दिसतो. आजकाल बऱ्याच मुलांमध्ये स्थूलपणा दिसून येतो.
गाडीच्या टाकीत पेट्रोल संपत आले की आपण पेट्रोल भरतो. काही वेळा किती अंतर कापायचे आहे, याचा विचार करून टाकी पूर्ण भरायची की नाही हे ठरवतो. पण पोटाच्या टाकीत मात्र अन्नरूपी इंधन भरताना ही सारासार बुद्धी कुठे पेंढ खाते, कुणास ठाऊक!
फ्रिजमध्ये दोन-तीन दिवस ठेवलेले आणि मायक्रोवेव्हमध्ये झटपट गरम केलेले, सत्त्व गेलेले अन्न खाण्याने कुणाचे भलं होणार? यामुळे जिभेचे चोचले पुरवले जातात, पण बिचाऱ्या पोटाचे नुकसान होते. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" हे ज्याला अंतर्बाह्य समजले आहे आणि पटले आहे, तो कोणत्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही.
आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी फार साधे-सोपे अन्न लागते. या ऊर्जेची आज सर्वांनाच गरज आहे, विशेषतः आजच्या धावत्या आणि डिजिटल युगात जगणाऱ्या पिढीला. सतत बैठे काम करणाऱ्या आणि व्यायामासाठी वेळ नसणाऱ्या लोकांसाठी साधे, पाचक आणि हलके अन्नच उत्तम आहे. अन्यथा, आज "कमावलेल्या पैशांचा उपभोग भविष्यात घेऊ" असे म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास, उद्या तोच साठवलेला पैसा आजारपणावर खर्च करण्याची वेळ येईल.
आहाराचा शरीरावर आणि स्वभावावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आपल्या ग्रंथांत 'सात्विक', 'राजसी' आणि 'तामसी' असे वर्गीकरण केले आहे. भगवद्गीतेमध्येही याचा उल्लेख सापडतो. सात्विक आहार घेणाऱ्यांचे आयुर्मान वाढते, जीवन शुद्ध होते आणि त्यांना शक्ती, आरोग्य, आनंद व समाधान प्राप्त होते. असे अन्न चवदार, स्निग्ध, आरोग्यदायी आणि मनाला प्रसन्न करणारे असते. काय खावे आणि काय टाळावे, याचे शास्त्राधार आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहेत; पण आज ते लक्षात कोण घेतो?
आपला देश ही प्राचीन, शास्त्रीय आणि वैज्ञानिक खाद्यसंस्कृती लाभलेला एकमेव देश आहे. वेदांमध्येही आहारशास्त्राचे सखोल उल्लेख सापडतात. "शरीराचे योग्य पोषण करून त्याचा आदर करा," असे वेद सांगतात. मात्र, पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्याच श्रेष्ठ संस्कृतीला नावे ठेवतो. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा ज्ञानाचा खजाना आपण जपला आणि त्याचे भान ठेवले, तरच आपण निरोगी, बुद्धिमान आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ पिढी घडवू शकू. यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला नकोत का?

- अनिता कुलकर्णी