श्री बांदेश्वर देवस्थान – दांडोसवाडा, मांद्रे

​मांद्रेच्या भूमीत असलेलं बांदेश्वर हे देवस्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूंना होणारी शेती व ती शेती करणारे शेतकरी, प्रथम आपल्या मुखी त्या देवाचे नाव घेऊन शेती करण्यास सुरुवात करतात.

Story: विशेष |
13th February, 09:51 pm
श्री बांदेश्वर देवस्थान  – दांडोसवाडा, मांद्रे

आ​मच्या गोव्याच्या भूमीत आगळावेगळा इतिहास लाभलेली मंदिरे किंवा देवस्थाने आहेत. आपल्या राज्यात येणारे इतर राज्यातील व देशांतील पर्यटकसुद्धा या देवस्थानाला भेट देतात. एवढेच नाही, तर काही पर्यटक असेही असतात की, ज्यांना एखाद्या देवस्थानाचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. आपल्या राज्यातील प्रत्येक मंदिराला एक वेगळा इतिहास लाभलेला आहे. ही मंदिरे केवळ पर्यटनस्थळे म्हणून उभारलेली नसून, त्यांमागे असलेल्या इतिहासामुळे त्यांचे बांधकाम झालेले दिसून येते. एवढेच नाही तर, आपल्या गोव्यात अशीही काही मंदिरे आहेत ज्यांच्या भिंतींवरील कोरीव कामातून त्या देवतेची निर्मिती किंवा स्थापना कशी झाली, याचा इतिहास उलगडतो.

​गोव्यातील पेडणे तालुक्यात भगवती देवीची मंदिरे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या तालुक्यातील सर्व भगवती मंदिरांचा इतिहास एकमेकांशी जोडलेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला शिवलिंगाची स्थापना झालेली मंदिरेही मोठ्या प्रमाणात दिसतात. असाच एक आगळावेगळा इतिहास लाभलेलं देवस्थान म्हणजे 'बांदेश्वर'. बांदेश्वर देवस्थान हे मांद्रे गावातील दांडोसवाडा या ठिकाणी वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, याच्या तिन्ही बाजूंना शेती केली जाते व एका बाजूला लोकवस्ती आहे. तिथे केली जाणारी शेती फक्त त्याच वाड्यावरील लोकांची नसून, इतर दोन-तीन वाड्यांतील लोकही तिथे शेती करतात. हा पूर्ण परिसर शेती-भाती व माड-पोफळीच्या झाडांनी नटलेला आहे.

​'बांदेश्वर' म्हणजेच 'बांधावर असलेला'. एका बाजूला गावडेवाडा व सावंतवाडा येथील लोकांची शेती, तर दुसऱ्या बाजूला त्या वाड्यावरील लोकांची शेती; या दोन्हीच्या मध्यभागी हे मंदिर आहे, म्हणून या देवस्थानाला 'श्री बानयो ब्राह्मण' असे नाव पडले. पूर्वी या देवस्थानाच्या आजूबाजूला वस्ती नव्हती, त्यामुळे हा परिसर झाडाझुडपांनी आणि शेतीने गच्च होता. अशाच एका झाडाझुडपांच्या आडोशाला, ओवळीच्या झाडाखाली पिंडीच्या रूपात हे देवस्थान होते. या पिंडीची दररोज पूजा त्याच वाड्यावरील एक ग्रामस्थ श्री. पुंडलिक गणेश नाईक करायचे.

​१९८२-८३ च्या सुमारास याच वाड्यावरील एक ग्रामस्थ श्री. काशिनाथ नाईक, जे काही कारणास्तव मुंबईला राहत होते, ते आपल्या मूळ गावी परतले. त्यांच्या मनात विचार आला की, झाडाझुडपात असलेल्या या 'बानयो ब्राह्मण' देवस्थानाला एक निश्चित आकार द्यावा. त्यांनी आपली ही कल्पना वाड्यावरील इतर ज्येष्ठ ग्रामस्थांना एकत्र जमवून सांगितली. प्रत्येकाने या गोष्टीला होकार दिल्याने त्यांनी या देवस्थानाचे छोटेखानी रूप साकारले. यानंतर तिथे रोज पिंडीची पूजा होऊ लागली.

​१९८४ च्या सुमारास तिथे पहिला 'दशावतार' नाट्यप्रयोग झाला. नाटक म्हटले की त्याचे सादरीकरण रात्रीच व्हायचे. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज. त्यावेळी देवस्थानाची स्वतंत्र वीज जोडणी नव्हती. आजूबाजूला शेती असल्याने सिंचनासाठी लोकांनी पाण्याचा पंप बसवला होता. त्या पंपाची वीज घेऊन हा नाट्यप्रयोग सादर केला गेला. या नाटकाला लोकांची अफाट गर्दी झाली होती. तो काळ असा होता की, घराघरांत टी.व्ही.सारखी मनोरंजनाची साधने नव्हती, म्हणून लोक नाटक किंवा इतर कार्यक्रमांना आवर्जून जायचे. जागेच्या कमतरतेमुळे तिथे वर्षातून एकदा 'ब्राह्मण जेवण' घातले जायचे.

​हे देवस्थान ओवळीच्या झाडाखाली होते व बाजूला काही मोठे दगड होते. १९८५ साली देवस्थानाला अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी एक लहान सिमेंटची घुमटी बांधण्यात आली. त्यामध्ये शंकराची पिंडी व बाजूला गणपती व पार्वतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षापासून तिथे जत्रोत्सवाला सुरुवात झाली. जरी देवळाला आकार दिला असला, तरी आजूबाजूची मोठी झाडे तशीच ठेवली होती. झाडाझुडपांची वाढ होत असल्याने वाड्यावरील लोकांनी तो परिसर स्वच्छ करण्याचे ठरवले. परिसर स्वच्छ करण्यापूर्वी सर्वांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली होती की, ओवळीच्या झाडाशेजारी असलेल्या एका मोठ्या झाडाला हात न लावता आजूबाजूचा परिसर साफ करावा.

​मोठी झाडे कापण्यासाठी सावंतवाड्यावरील एका लाकूडतोड्याला बोलावण्यात आले. काम करताना नकळत तो त्या विशिष्ट झाडावर चढला आणि फांदी कापण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडला. या घटनेबाबत दोन मते सांगितली जातात; एक म्हणजे त्याला झाडावरून कोणीतरी खाली ढकलले, तर दुसरे म्हणजे त्याला झाडावर साप चावला आणि तो खाली पडला. ही घटना वाऱ्यासारखी वाड्यावर पसरली आणि लोकांच्या मनात ही भावना दृढ झाली की, तो ढकलणारा किंवा चावणारा दुसरा कोणी नसून साक्षात 'देव'च होता. तेव्हापासून हे 'जागृत देवस्थान' म्हणून नावारूपास आले.

​हळूहळू या देवस्थानात इतर सण-उत्सव साजरे होऊ लागले. २०१३ मध्ये वाड्यावरील सर्व लोकांनी मिळून निर्णय घेतला की, या छोट्या घुमटीचे भव्य मंदिरात रूपांतर करावे. २०१५ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्याच वर्षी धार्मिक विधी करून शंकराच्या पिंडीची आणि गणपती-पार्वतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांच्यासमोर नंदी व बाजूला कासव अशा स्वरूपात आज आपल्याला हे सुंदर मंदिर पाहायला मिळते. 'श्री बानयो ब्राह्मण' हे देवस्थान आज 'श्री बांदेश्वर' या नावाने प्रसिद्ध आहे.

​मंदिराच्या तिन्ही बाजूंना शेती करणारे शेतकरी आजही कामाला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घेतात. "आमच्या पिकाचे रक्षण कर आणि भरघोस पीक येऊ दे," अशी प्रार्थना ते करतात. येथील महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी वाड्यावरील कोणत्याही घरात चूल पेटवली जात नाही. सर्व लोक सकाळी मंदिरात जमतात. वाड्यावरील स्त्रिया महाप्रसादाची तयारी करतात. या महाप्रसादाचा लाभ केवळ वाड्यावरीलच नव्हे, तर इतर गावांतील भक्तही घेतात.

​वर्षभरातील प्रत्येक सोमवार वाड्यावरील एका घराला वाटून दिला जातो. ज्या घराचा सोमवार असतो, त्या घरातील व्यक्ती पूर्ण आठवडा देवाची पूजा करतात. दर सोमवारी देवळात 'घुमट आरती' व 'भजन' होते. २०१३ मध्ये मंदिर बांधण्यासाठी लागणारा सर्व खर्च वाड्यावरील लोकांनी स्वेच्छेने आणि स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केला आहे.

​हा इतिहास मांडण्याचा एकमेव हेतू हाच आहे की, येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती आणि परंपरा माहीत व्हावी. जर आपल्याला आपले सण-उत्सव जपायचे असतील, तर त्यामागचा इतिहास जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सण-उत्सवांनी आणि मंदिरांनी नटलेली ही गोमंतक भूमी आपण कायम जपली पाहिजे.

​या देवस्थानाची माहिती मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य करणारे वाड्यावरील नामवंत नागरिक अॅड. प्रसाद शहापूरकर यांचे मी विशेष आभार मानू इच्छिते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले.


- हर्षदा सावंत

सावंतवाडा, मांद्रे.