प्रेमा तुझा रंग कसा...

प्रेम म्हणजे काही पाॅवर बँक नाही की दुसऱ्याची बॅटरी कायम चार्ज करत बसायचं. आधी स्वतःचा चार्ज १००% असावा लागतो. मगच ते नातं टिकतं. कारण ते रिकामेपणातून नाही, पूर्णत्वातून निर्माण झालेलं असतं.

Story: मनी मानसी |
13th February, 09:36 pm
प्रेमा तुझा रंग कसा...

प्रेमात पडण्याआधी स्वतःला नक्की ओळखा!

आज व्हॅलेन्टाईन डे! एरव्ही हाणामारी चालू असलेल्या आजच्या जगात, ह्या ‘डे’निमित्त मात्र प्रेमाचं प्रमाण अमंळ वाढलेलंच असतं. चॉकलेटं महाग होतात तर गुलाबं दुर्मिळ! 

फेसबुक, इंस्टाग्राम उघडलं की प्रत्येकाच्या आयुष्यातल्या ‘त्या’ व्यक्तीचे कोडकौतुक चाललेले दिसते आणि मग आपल्यापैकीच कित्येकांना असं वाटू लागतं जणू सगळ्यांचाच कोण न कोणी व्हॅलेन्टाईन आहे... बहुधा आपणच प्रॉडक्शन डिफेक्ट असू आणि त्यामुळे आपण सिंगल आहोत ही भावना तीव्र होते. 

कॉलेज कॅन्टीनपासून ऑफिसच्या कॉफी मशीनपर्यंत सगळीकडे एकच चर्चा, कोणाचे सुत कोणासोबत जुळले आहे आणि कोणाची डाळ शिजलीच नाही वगैरे. आता अशा वेळी प्रेमात पडणं म्हणजे काहीतरी फार मोठं साध्य केल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. परंतू ते तसं असत नाही. 

आपण प्रेमात पडतो, पण त्या आधी स्वतःच्या प्रेमात असतो का?

आजची तरुण पिढी खूप हुशार आहे, स्वतंत्र विचारांची, आत्मविश्वासाने भरलेली आहे, पण भावनिक दृष्ट्या मात्र थोडीशी impulsive आहे असं माझ्या लक्षात आलंय. ह्या वयात “आपलाही कोणी तरी असायला हवा बाॅयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड” ही गरज इतकी बळावते की “मलाच स्वतःला समजून घ्यायची गरज आहे” यावर मात करते. मग प्रेम म्हणजे attraction राहत नाही, ते unhealthy attachment होवून जातं आणि तसं झालं की माणूस हळूहळू स्वतःच्या सीमा पुसायला लागतो.

काही वेळा समुपदेशन सत्रामध्ये तरुण मुली-मुलं म्हणतात,

“मॅम, मला नात्यात अॅडजस्ट करायला काहीच हरकत नाही.” तेव्हा मी विचारते, “उत्तम. कुठल्याही नात्यात अॅडजस्ट करणं सामंजस्याचंच असतं परंतू तु कुठपर्यंत अॅडजस्ट करणार आहेस?” 

ह्यावर उत्तर बहुतेकवेळा मिळत नाही. कारण आपल्याला स्वतःचं ‘कुठपर्यंत’ हे माहितच नसतं!

स्वतःला न ओळखता प्रेमात पडलं की काय होतं? 

स्वतःला न ओळखता प्रेमात पडलं की एक वेगळीच गंमत सुरू होते.

आपल्याला कॉफी आवडत नाही, पण समोरच्याला आवडते म्हणून आपण cappuccino पितो. आपल्याला शांत बसायला आवडतं, पण ‘cool couple’ दिसण्यासाठी party hopping करतो.

मला काय आवडतं, मला काय चालत नाही, मी कशाने दुखावतो/ते हे सगळं बाजूला राहतं. उलट, त्यांना काय आवडतं, ते कधी अपसेट होतील, त्यांचा मुड कसा सांभाळायचा यालाच प्रेम समजलं जातं. आणि नातं पुढे जातं पण आपण मागे पडतो.

आपली आवड, आपले मित्र, आपले स्वप्न... सगळं हळूहळू बाजूला सरतं. नातं टिकवण्यासाठी आपण सतत स्वतःला खर्ची पाडत राहतो आणि एक दिवस अचानक लक्षात येतं, अरे, नातं आहे, पण ह्यात आपलं अस्तित्वच नाहीये. 

हळूहळू आपलं आयुष्य असं होतं की, मी कोण आहे? मला काय आवडतं? हे प्रश्न बायोडेटा अपडेट करतानाच आठवायला लागतात.

आम्ही Psychoanalysis मध्ये याला ‘मी कुठे बरं हरवलो?’ syndrome असं ही गमतीनं म्हणतो. बघा, नातं टिकवण्यासाठी आपण इतके अॅडजस्ट करतो की शेवटी आपल्यालाच अॅडजस्ट करायला जागा उरत नाही.

आता तुम्ही म्हणाल, अगं पण स्वतःला ओळखणं म्हणजे नक्की काय? आरशासमोर उभं राहून motivational quotes म्हणायचे का? अजिबात नाही.

मुळात, स्वतःला ओळखणं म्हणजे : 

  •   माझ्या emotional गरजा काय आहेत?
  •   मला प्रेम हवं आहे की validation?
  •   कोणी ignore केलं की माझं self-worth का घसरतं?
  •   माझ्या आयुष्यात boundaries आहेत का, की “नको” म्हणताना मला अपराधी वाटतं?
  •   माझ्या values काय आहेत? फक्त नातं टिकवण्यासाठी मी त्यांच्याशी तडजोड करतोय/करतेय का?
  •   नकार मिळाला तर मी त्याचा सामना कसा/कशी करतो/करते?

समुपदेशक म्हणून मी नेहमी म्हणते, आपण खरंतर प्रेमात पडतच नाही, आपण projection मध्ये पडतो. म्हणजे आपल्या आत जी अपूर्णता, भीती, एकटेपणा असतो, त्यावर आपण समोरच्याचं नाव चिकटवतो इतकंच. पण स्वतःला ओळखून प्रेमात पडणं हे सुरक्षित असतं, शांत असतं, आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. म्हणूनच समुपदेशनात आम्ही प्रेम शिकवत नाही तर स्वतःशी ओळख करून देतो. कारण स्वतःशी जुळलेली व्यक्ती कधीच कुठल्याच नात्यात स्वत्व हरवत नाही. 

अगदी पु. ल. देशपांडेंच्या शैलीत सांगायचं तर, प्रेम म्हणजे काही पाॅवर बँक नाही की दुसऱ्याची बॅटरी कायम चार्ज करत बसायचं. आधी स्वतःचा चार्ज १००% असावा लागतो. मगच ते नातं टिकतं. कारण ते रिकामेपणातून नाही, पूर्णत्वातून निर्माण झालेलं असतं. 

Healthy प्रेम म्हणजे : मी पूर्ण आहे, तू पूर्ण आहेस, आणि आपण एकत्र छान आहोत.

Unhealthy प्रेम म्हणजे : मी तुझ्याशिवाय काहीच नाही (आणि हे ऐकून समोरच्याने घाबरायचं असतं बरं).

तर या व्हॅलेन्टाईन डे’ला, कुणाच्या प्रेमात पडण्याआधी जरा थोडा वेळ स्वतःसोबत घालवा.

एकट्याने कॉफी प्या.

स्वतःचे विचार ऐका.

आणि स्वतःला विचारा, 

“मी स्वतःसोबत राहू शकतो/शकते का?”

जर उत्तर ‘हो’ असेल,

तर समजा, तुम्ही प्रेमासाठी सज्ज आहात.

कारण प्रेमात पडणं सोपं असतं...

पण स्वतःला न गमावता प्रेमात पडणं, ही खरी कला आहे. 


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४