शाळा आणि विद्यार्थी यांचे नाते अतुट असते. बालपणातील निसर्गरम्य वातावरणात व्यतीत केलेले शालेय जीवन, जुने खेळ आणि रानमेव्याच्या गोड आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात जिवंत आहेत, ज्या मोबाईलच्या युगात हरवत चालल्या आहेत.

विद्यार्थी आणि शाळा यांच्यात एक अटूट नाते असते. शाळा म्हटली की मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता पाहायला मिळते. शालेय जीवन प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतो. आपण कितीही मोठे झालो, तरी आपले शालेय जीवन कधीच विसरू शकत नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी या जीवन प्रवासाला जोडलेल्या असतात. मूल जन्माला आल्यानंतर पहिली शाळा ही त्याच्या घरापासून सुरू होते. आपले आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी, भाऊ-बहीण यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी कळत-नकळत शिकत असतो. मूल शाळेत जायला लागलं की, त्याने टाकलेले हे बाहेरील दुनियेतील पहिले पाऊल म्हणता येईल. वेगवेगळ्या माणसांशी भेटणे, निसर्गाच्या सानिध्यात वावरणे, शाळेतील शिक्षक, मित्र-मैत्रिणी हे सगळं त्याच्यासाठी अगदी नवीन असतं.
प्राथमिक शाळा तर आपण कधीच विसरू शकत नाही. आपल्या चांगल्या-वाईट बऱ्याच गोष्टींची ती एक अढळ आठवण आपण कायम ठेवतो. शाळेचा पहिला दिवस तर अविस्मरणीय असतो. मला अजूनही आठवते ती माझी सरकारी प्राथमिक शाळा. येथे केलेली चेष्टा-मस्करी, अभ्यास, शिकलेली गाणी, बाई, गुरुजी अजूनही कायम लक्षात आहेत. कधीतरी असं वाटतं की, परत आपण त्या काळात जाऊन ते जीवन जगावं. आमची शाळा गावापासून बरीच लांब होती. आम्ही दररोज चालत शाळेत जायचो. अर्ध्या तासाची वाट आम्ही अगदी मजेत चालून एक तास करायचो. शाळा अगदी निसर्गरम्य अशा जागी होती. चारी बाजूंना हिरवेगार डोंगर होते. गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी यांच्यापासून आम्ही बरेच दूर होतो. आवाज ऐकू यायचा तो फक्त प्राणी-पक्षांचा आणि वारा आला की झाडांच्या मस्त डुलणाऱ्या पानांचा. शाळेच्या एका बाजूला काजूची बाग होती, तर दुसऱ्या बाजूला भले मोठे डोंगर होते. पावसाळ्यात तर शाळेभोवती एक वेगळीच हिरवळ पसरलेली असायची. अनेक रानटी फळे-फुले आम्हाला मिळायची, जी आता दिसतही नाहीत. शाळेत कोणताही कार्यक्रम असला की, याच रानटी फुलांपासून आम्ही पुष्पगुच्छ आणि रांगोळी
सजवायचो.
घरी जात असताना वाटेतील फळे खात-खात अगदी सावकाश चालायचं, जेणेकरून सगळी फळे खाऊन झाली पाहिजेत. घरी जेवलो नाही तर आई विचारायची, "जेवण का नको?", मग सांगायचं की भूकच लागली नाही. खरंतर पोट तुडुंब भरलेलं असायचं. रानटी फळे म्हणजे हसोळी, चारे, चुन्ना, काटेबोरे, बिब्याचे बोंडू, फातरफण्णा, चाफरा, कांटा, आवडधोडे किंवा यासारखी बरीच फळे होती, जी आता बहुतेक मुलांना ओळखता देखील येणार नाहीत. यात त्यांची काही चूक नाही, कारण जसजसे वातावरणात बदल होत गेले, तसतशी ही फळे देखील दुर्मिळ होत गेली.
ही फळे काढली की आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी मिळून वाटून खायचो. कधीच भांडण केलं नाही. कच्च्या कैऱ्या, चिंचा यांच्याबद्दल तर विचारूच नका! प्रत्येक जण एक-एक वस्तू आपल्या घरातून आणायचा - कोणी मीठ, मसाला, चाकू, तर कोणी एखादं भांडं, जेणेकरून व्यवस्थित खाता येईल. त्यावेळची ती मजाच वेगळी होती. एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या आवारात बसून आम्ही निवांत खात असू. कधी भीती आणि चिंताही वाटली नाही. वडाच्या पारंबीला लटकून झोके घेणे, मातीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणे, दगड गोळा करणे, शिंपल्या रंगवणे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या.
वेगवेगळी फुले म्हणजे ओवळा, सुरंगी, कुसर, रानमोगरी, रान आबोली, बीटी, आबोलीची फुले यांसारख्या फुलांची वेणी बनवणे, हार करणे हा आम्हाला त्याकाळी उपक्रम दिला जायचा. दसऱ्याला ही फुले रांगोळी घालण्यासाठी वापरली जायची. सुकी आणि ओली फुले घातली की रांगोळी अगदी आकर्षक वाटायची. आता ही फुले देखील क्वचितच पाहायला मिळतात.
पण आम्हाला या दुर्मिळ गोष्टी अनुभवायला मिळाल्या, याचं आजही समाधान वाटतं. अजूनही कधी आठवण आली की वाटतं, त्या जीवनात परत जाऊन तो बालपणाचा आनंद घ्यावा. त्यावेळी आम्ही लगोरी, धावणे, लपाछपी, दगडाने नेम धरणे हे खेळ खेळायचो. आता प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल दिसतो. खरंच, बालपण कधीही कोणीही विसरू शकत नाही.
