माहेरी कौतुकाने होणारी कामाची सुरुवात सासरी जबाबदारीत कधी बदलते, हे कळतही नाही. जेव्हा घरातील काम ही केवळ स्त्रीचे 'कर्तव्य' मानले जाते, तेव्हा त्यातील ओलावा संपून फक्त यंत्रवत जगणे उरते; यावर भाष्य करणारा हा एक विशेष लेख.

''बाय आमचे बरी चहा करता. चल गो बाय, करून हाड." मम्मी नेहमी माझ्या मोठ्या बहिणीला म्हणायची आणि ती मोठ्या उत्साहाने चहा करायची. आम्हा मुलींना आई-बाबांकडून काहीही काम केल्यास नेहमी शाबासकीची थाप मिळते आणि त्याची सवय होऊन जाते. लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसांत ही थाप सासरच्या माणसांकडूनही मिळते. नवऱ्याकडून तर कौतुकाचा पाऊस पडतो आणि आपण स्त्रिया त्या कौतुकासाठी रात्रंदिवस राबतो. पुढे नव्याची नवलाई संपते आणि नवरा शाबासकीची थाप द्यायला विसरून जातो. मग आम्ही आपणहून "हे कसं झालंय? ते कसं झालंय?" असे मुद्दामहून विचारतो, तेव्हा त्याचे उत्तर येते 'ठीक'. आणि इथेच शाबासकीच्या थापेला पूर्णविराम लागतो.
रोजच्या कौतुकाच्या अभावामुळे स्त्रियांचा उत्साह कमी होतो आणि मग उरतात त्या फक्त जबाबदाऱ्या. रोज ताटात नवनवीन पदार्थ वाढणे ही एक जबाबदारी होऊन बसते. खरं तर मन लावून स्वयंपाक करणे हा कित्येक स्त्रियांचा आवडता छंद असतो. मला सुद्धा जेवण बनवण्यात फार आनंद व्हायचा; नवीन रेसिपीज ट्राय करणे आणि त्या घरच्या मंडळींना खाऊ घालणे यात एक वेगळीच मजा असायची. पण जेव्हा जेवण बनवणे ही केवळ एक 'जबाबदारी' झाली, तेव्हा मात्र तो छंद कुठल्या कुठे पळून गेला. आज एखाद्या दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेवण बनवता आले नाही, तर जणू काही मोठे पाप झाल्यासारखे वाटते.
मला एकदा एका मैत्रिणीने सांगितलेला किस्सा आठवतो. तिची मासिक पाळी सुरू होती, तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला "तू आज मला 'युजलेस' वाटतेस," असे म्हटले. मला तर यावर हसू की रडू, हेच कळेना. म्हणजे एखादी स्त्री जर काही कारणास्तव जेवण करू शकली नाही, तर ती निरुपयोगी कशी काय ठरू शकते? बरं ते राहू दे, आणखी एक मैत्रीण सांगत होती की, तिच्या नवऱ्याला पाणी उकळले की नाही, हे सुद्धा कळत नाही!
अर्थात, या सर्व गोष्टींना काही अपवादही आहेत. काही पती आपल्या कुटुंबासाठी मनापासून खूप काही करतात. पूर्वी कष्टाची कामे जास्त होती, म्हणून स्त्री-पुरुषांमध्ये एक अलिखित समज होता की पुरुषांनी बाहेरचे काम करून पैसे कमवायचे आणि स्त्रियांनी घरची जबाबदारी पार पाडायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. बाहेरचे काम आणि पैसे कमवणे हे फक्त शारीरिक कष्टाचे राहिलेले नसून बुद्धीचेही आहे आणि स्त्रिया ते करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. आज स्त्रिया घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घर चालवण्यास मदत करतात. पण तरीसुद्धा, घरातील बाकी जबाबदाऱ्या मात्र आजही तिच्याच खांद्यावर पडतात आणि कित्येकदा तिचे मनोबल तुटते. कुठेतरी वाचलेले आठवते, "स्त्रिया कामावरून घरी परत केवळ दुसऱ्या कामासाठीच जातात."
यालाही काही सकारात्मक अपवाद आहेत. कित्येक पुरुष आपल्या पत्नीला घरकामात मदतीचा हात देतात. भांडी घासणे, केर काढणे, जेवण बनवणे, कपडे वाळत घालणे ही कामे ते आपली जबाबदारी समजून मनापासून करतात. अशा घरात पत्नी आनंदी असते आणि साहजिकच संपूर्ण परिवार सुखी असतो. पण दुर्दैवाने, समाजातील काही जण अशा पुरुषांनाच नावे ठेवतात, 'बायकोचा बैल', 'जोरू का गुलाम' आणि काय काय! केवळ अशा टीकेला घाबरून काही जण 'कठोर पुरुष' बनण्याचा आव आणतात आणि आपल्याच घरात शाबासकीची थाप द्यायला विसरतात.

- सोनिया परब