फॅशन, जबाबदाऱ्या आणि व्यस्त जीवनशैलीच्या गर्दीत पायांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. उंच टाचेच्या चपला आणि जास्त वेळ उभे राहिल्याने पायाच्या पुढील भागात होणारी वेदना म्हणजे 'मेटाटार्साल्जिया' असून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळची धावपळ सुरू होती. रागिणी ऑफिसला जाण्यासाठी घाईत तयार होत होती. नव्या, टोकदार आणि उंच टाचेच्या सँडल घालून ती आरशात स्वतःकडे बघताना विचार करू लागली. दिवसभर मीटिंग्स, उभे राहणे, घरची कामे – हे सगळं तिच्यासाठी नेहमीचं होतं. पण काही दिवसांपासून चालताना पायाच्या पुढच्या भागात जळजळ जाणवू लागली होती. “काही नाही, थोडा थकवा असेल,” असे म्हणत ती वेदनेकडे दुर्लक्षित करत राहिली.
दिवसेंदिवस ती जळजळ वाढू लागली. बुटामध्ये एखादा छोटा दगड अडकल्यासारखे टोचणे, पायाच्या बोटांजवळ सूज आणि प्रत्येक पावलागणिक होणारी वेदना तिच्या लक्षात येऊ लागली. अखेर डॉक्टरांकडे गेल्यावर तिला कळले – ही साधी वेदना नव्हती; हा होता मेटाटार्साल्जिया.
रागिणीची ही स्थिती अनेक महिलांसाठी ओळखीची गोष्ट आहे. फॅशन, जबाबदाऱ्या आणि व्यस्त जीवनशैली यांच्या गर्दीत पायांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. चुकीची पादत्राणे, उंच टाचेच्या चपला, जास्त वेळ उभे राहणे, वजनातील बदल – या सर्वांचा परिणाम पायाच्या पुढील भागावर होतो आणि तिथे वेदना निर्माण होतात.
महिलांमध्ये पायाच्या पुढील भागात होणारी वेदना ही सामान्य तक्रार मानली जाते आणि या वेदनेचे एक महत्त्वाचे कारण असते 'मेटाटार्साल्जिया'. ही अवस्था पायाच्या पुढील भागातील मेटाटार्सल या हाडांभोवती वेदना आणि दाह निर्माण करते. महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.
मेटाटार्साल्जिया म्हणजे काय?
पायाच्या बोटांच्या मुळाजवळ पाच लांब हाडे असतात, त्यांना मेटाटार्सल हाडे म्हणतात. या हाडांवर जास्त दाब किंवा ताण आल्यास त्या भागात सूज, जळजळ आणि वेदना निर्माण होतात. या स्थितीला मेटाटार्साल्जिया असे म्हणतात. हा स्वतंत्र आजार नसून एक लक्षणात्मक अवस्था आहे.
महिलांमध्ये ही समस्या अधिक का?
महिलांमध्ये मेटाटार्साल्जिया होण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत:
१. हाय हिल्सचा वापर: उंच टाचेच्या चपला वापरल्यास शरीराचे वजन पायाच्या पुढील भागावर केंद्रित होते. त्यामुळे मेटाटार्सल हाडांवर अतिरिक्त दाब येतो.
२. टाईट किंवा अरुंद पादत्राणे: बोटांना पुरेशी जागा न मिळाल्यास पुढील भागावर घर्षण व ताण वाढतो.
३. लठ्ठपणा: वजन वाढल्यास पायांवर अधिक ताण येतो.
४. दीर्घकाळ उभे राहणे: शिक्षक, परिचारिका, विक्री प्रतिनिधी अशा व्यवसायांमध्ये दीर्घकाळ उभे राहिल्याने ही समस्या वाढते.
५. पायांची रचना: 'फ्लॅट फूट' किंवा जास्त उंच आर्च असलेल्या महिलांमध्येही हा त्रास दिसून येतो.
लक्षणे
निदान व उपचार
डॉक्टर रुग्णाच्या तक्रारी, चालण्याची पद्धत आणि पायांची तपासणी करून याचे निदान करतात. याचे उपचार बहुधा साधे आणि प्रभावी असतात:
१. योग्य पादत्राणे: कमी टाचेच्या, मऊ सोल आणि आर्च सपोर्ट असलेल्या चपला वापराव्यात.
२. मेटाटार्सल पॅड: पायाच्या पुढील भागावरचा दाब कमी करण्यासाठी विशेष पॅड उपयोगी ठरतात.
३. विश्रांती आणि बर्फाचा शेक: सूज आणि वेदना कमी करण्यासाठी दिवसातून काही वेळ बर्फ लावणे उपयुक्त ठरते.
४. वजन नियंत्रण: वजन कमी केल्यास पायांवरील ताण कमी होतो.
५. फिजिओथेरपी: स्ट्रेचिंग आणि बळकटीकरणाचे व्यायाम केल्यास स्नायूंना आधार मिळतो.
प्रतिबंध
मेटाटार्साल्जिया ही महिलांमध्ये आढळणारी सामान्य परंतु दुर्लक्षित समस्या आहे. योग्य वेळी लक्ष दिल्यास आणि पादत्राणांमध्ये आवश्यक बदल केल्यास ही समस्या सहज टाळता येऊ शकते. पायांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण निरोगी पायांमुळेच आपल्या दैनंदिन जीवनातील हालचाली सुलभ होतात. त्यामुळे फॅशनपेक्षा आराम आणि आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर