जन्माला आल्यानंतर आपण बऱ्याच नात्यांशी जोडलो जातो. काही नाती आपण स्वतः निर्माण करतो तर काही आपोआपच जोडली जातात.

आपले आई-वडील, आजी-आजोबा हे कोण असणार, काही कौटुंबिक नाती ही पहिलीच ठरलेली असतात. आपण आपले मित्र-मैत्रिणी आपल्या सोयीनुसार किंवा बहुतेक वेळा आपण आपल्या आवडीनुसार निवडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात या नात्याचे एक वेगळेच असे स्थान आहे आणि प्रत्येक नात्याला एक वेगळाच अर्थ देखील आहे. सगळ्यात महत्त्वाचे नाते असते ते आई आणि मुलाचे. हे प्रेमळ नाते देवानेच तयार केलेले आहे. आपल्या आईची तुलना आपण कोणाशीही किंवा कोणीही करू शकत नाही. आपण कितीही मोठे झालो तरी आईची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. आईची मुलाबद्दल असलेली तळमळ, माया, काळजी ही केवळ एक आईच अनुभवू शकते. आईने आपल्याला कितीही वाईट बोलले तरी तिचा हेतू मात्र कधीच वाईट असू शकत नाही. आपल्या मुलांचा विकास कसा होणार याकडे तिचे सदैव प्रयत्न चालू असतात.
मूल जन्माला येण्याआधीपासूनच आईची तयारी चालू असते. नऊ महिने बाळाला आपल्या पोटात अगदी अलगद वाढवून ती बऱ्याच गोष्टींना सामोरी गेलेली असते. पण एक दिवस आपलं बाळ जन्माला येणार या आनंदापुढे ती आपले सगळे दुःख, परिश्रम विसरून जाते. आपल्या बाळाची प्रत्येक हालचाल ती ओळखते आणि ज्या दिवशी बाळ जन्माला येते, तो दिवस तिचा - त्या दिवशी तिचा एक नवीन जन्म होतो. स्वतःला ती पूर्णपणे विसरून ती आपल्या बाळाच्या ओढतीने आपले जीवन अर्पण करते. बाळ का रडत असेल, याची प्रत्येक हालचाल तिला अगदी माहिती असते. बाळाला त्रास होऊ नये म्हणून ती आपल्या आहारात सुद्धा बदल करते. काही पदार्थ तिला अतिशय आवडत असतात पण आपल्या बाळाला जर त्या पदार्थाच्या सेवनामुळे त्रास होत असेल तर ती ते देखील खाणे बंद करते. ती पूर्णपणे स्वतःला विसरून एका नव्या विश्वात ती जगत असते. गर्भात मूल वाढत असताना ती बऱ्याच गोष्टींची काळजी घेते जेणेकरून आपले बाळ सुखरूप जन्माला येईल. बाळ आणि आई दोघे एकरूप झालेले असतात.
बाळ जन्माला आल्यापासून ते सहा महिन्यापर्यंत त्याची सत्वपरीक्षाच असते. वेळ, दिवस कसे जातात तेच कळत नाही. ती बरेच दिवस शांत झोपेपासून वंचित असते. रात्रीची संपूर्ण झोप तिला कधीच मिळत नाही. याचा पूर्ण परिणाम तिच्या शरीरावर झालेला असतो. तिला अशक्तपणा देखील जाणवतो पण ती आपल्या बाळापुढे हे सगळं काही विसरते. बऱ्याच वेळी गरोदरपणात घेतलेली औषधे देखील तिला हानिकारक वाटतात, त्याचा विपरीत परिणाम तिच्या शरीरावर झालेला आपल्याला जाणवतो. एकदा बाळ चालू लागलं की ती तीच आपलं बालपण परत एकदा जगत असते. बाळाला वेगवेगळे खेळ, गाणी शिकवण्याबरोबर तीही त्यात गुंतून जाते. त्याप्रमाणे बाळ कधी मोठं होतं हे तिला काहीच कळत नाही. बाळ जसजसे मोठे होत जाते तसे आईची पण स्वतःमध्ये बदल करते. त्याच्याबरोबर त्याच्यासारखं वागणं, बोलणं, खेळणं यात ती जणू स्वतःही एक मूल बनून जाते.
जी आई सकाळच्या वेळी आपले आवडते कार्यक्रम टीव्हीवर बघायची ती आता कार्टून किंवा अॅनिमेटेड मुव्ही बघायला लागते. ती आपली आवड सोडून आता मुलांच्या आवडीत आपला आनंद शोधत असते. मुलाला आवडणारा खाऊ बनवणे हे सगळं काही ती करते. पण एक दिवस ती कोणाला बोलून दाखवत नाही की तिला तिचा असा वेळ उरलेला नाही. स्वतःच्या शरीराकडेही ती बऱ्याच वेळी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येते. एकदा बाळ बोलायला लागलं की पहिला शब्द हा "आई" किंवा आताची मुलं "मम्मी" म्हणतात. आणि हा शब्द ऐकला की आईचा आनंद गगनात मावेना अशी स्थिती तिची झालेली असते. तिच्या सर्व परिश्रमांची ती पोचपावती म्हणाला काही हरकत नाही. खरंच आयुष्यात आई आल्याशिवाय आईपण कळत नाही हे काही खोटं नाही. या जगातील सर्व मातांना देव उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना...
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
जाऊ देईत दुःख खुशाल
आई तू मंदिराचा उंच कळस
आई तू अंगणातील पवित्र तुळस
आई तू भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई तू वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी.

- स्नेहल महाले
पणजी