हॉस्टेल लाईफ : स्वातंत्र्य, हुरहुर आणि अभ्यासाचं कोडं

अभ्यासात भीतीऐवजी, “मी हे का करत आहे?” हा प्रश्न स्वतःला विचारलात, की अभ्यास हा स्वतःच्या self-respect आणि self-growth चा भाग होतो.

Story: मनी मानसी |
20th February, 09:21 pm
हॉस्टेल लाईफ : स्वातंत्र्य, हुरहुर आणि अभ्यासाचं कोडं

“Failure के बाद भी अगर तुम खडे हो, तो तुम loser नहीं हो...’ छिछोरे चित्रपटातील हा संवाद ऐकताना आपण सिनेमा पाहतोय असं वाटत नाही, तर जणू एका हॉस्टेलच्या खोलीत, रात्री उशिरा, स्वतःशीच चाललेला संवाद ऐकतोय असं वाटतं. त्यामुळे माझा आजचा लेख हा आपल्यापैकी जे ‘धुरंधर’ हॉस्टेल लाईफ जगत आहेत त्यांच्यासाठी खास लिहिला आहे बरं! 

मित्रांनो, हॉस्टेलवरचं आयुष्य बाहेरून फार रंगतदार वाटतं...मित्र, गोंधळ, खळखळून हसणं, मज्जा आणि निव्वळ स्वातंत्र्य! पहिल्यांदा हॉस्टेलच्या खोलीत पाऊल टाकताना मनात एक वेगळाच आनंद असतो. आता आपण खरंच मोठे झालो! आपल्याला कोणी वेळ विचारणार नाही, झोपेची, उठायची, अभ्यासाची... सगळं आपल्याच हाती. त्या छोट्याशा खोलीचं दार बंद केल्यावर वाटतं, हे ‘माझं’ आयुष्य आहे, आता मीच माझ्या मर्जीचा राजा! पहिले काही दिवस तर स्वप्नवतच जणू! नवे मित्र, रात्री उशिरापर्यंत गप्पा, कँटीनचा चहा, आणि अभ्यासाबद्दलचा एक सामूहिक निर्णय, “आज नाही, उद्या पाहू.” मात्र त्या “उद्या”चं एक वैशिष्ट्य असतं... ते बिचारं रोजच पुढे ढकललं जातं. असं का बरं होतं?

अहो, पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यावर मन थोडं उधळतं. साहजिकच ह्यात अभ्यास मागे पडतो. पण हे आळशीपणामुळे नाही, तर पहिल्यांदाच “आपल्याला आता कुठल्याच गोष्टीला मज्जाव करायला कोणी नाही” या जाणिवेमुळे. ही जाणीव मनात खोलवर उतरते. आणि आश्चर्य म्हणजे, ज्या कारणांसाठी आपण घरापासून इतक्या लांब शिकायला आलो, तेच आपले असंख्य ध्येय थोडे मागे राहून जातात. इथे खरंतर, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, हॉस्टेल लाईफ म्हणजे घर सोडणं नव्हे तर घराची चौकट मनात घेऊन चालायला शिकणं होय. मुळात, आपण विसरून जातो की, हॉस्टेलमध्ये करायचा अभ्यास हा फक्त एक विषयापुरता निगडीत नसतो. उलट, तो एका जबाबदारीचे प्रतीक असतो. आणि ही जबाबदारी स्वीकारायला, मन तयार व्हायला थोडं वेळ घेतंच.

तुम्हाला छिछोरे मधले अन्नी आणि त्याचे अतरंगी मित्र आठवतात? जेव्हा अभ्यासात आणि खेळात ते सगळेच मागे पडतात, तेव्हा त्यांना वाईट वाटतं कारण ते नापास होतात म्हणून नाही, तर आपण स्वतःबद्दल जी कल्पना करून ठेवलेली असते, ती ढासळते म्हणून. रात्री उशिरा आईला फोन करताना “सगळं ठीक आहे गं” असं सांगणं, आणि फोन ठेवल्यावर मनात एक अनामिक रितेपण जाणवणं हे काही त्या मुलांच्या कमकुवतपणाचं लक्षण नव्हे... हे त्यांच्या मनाचं transitional phase मध्ये असणं आहे, जिथे बालपण सुटतंय, पण adulthood अजून घट्ट रोवलेलं नसतं..प्रौढत्वाने अजून पूर्ण आकार घेतलेला नसतो.

अशा अवस्थेत अभ्यास “करायचा आहे” असं फक्त सांगून होत नाही. कारण इथे मन कधी पुढे जातं, तर कधी मागे ओढलं जातं. ह्यात अभ्यास आपल्याकडून नीट होईल की नाही ह्या भविष्याच्या संभ्रमातून तो बऱ्याचदा टाळला देखील जातो.  सोप्या भाषेत सांगायचं तर, 

स्वातंत्र्य मिळालंय, पण त्याचं मॅन्युअल कुणी दिलेलं नाही!  मोबाइल हातात आहे, पण वेळ निसटून जाते. अभ्यास करायचाय, पण मन लागत नाही आणि मग येतो guilt! 

खरं तर, हॉस्टेल मध्ये अभ्यास न होण्याचं कारण अभ्यास कठीण आहे हे नसतं, तर भावनांची गर्दी मनात दाटणे हे असतं. नवीन ओळखी, जुन्या आठवणी, अपेक्षा, भीती...या सगळ्यांच्या मधे वही उघडायची सवय हरवते. अशा वेळी अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. अभ्यास म्हणजे “रोज किती तास” नाही, तर “रोज स्वतःशी मी किती प्रामाणिक आहे” हे तपासणे होय. मन नसतानाही रोज वीस मिनिटं वही उघडणं, फोन बाजूला ठेवणं, एक ठरलेली वेळ आणि एक ठरलेला कोपरा, हे छोटे निर्णय तुमच्या हॉस्टेल लाईफचा प्रवास फार सुकर करू शकतात.

अभ्यासात भीतीऐवजी, “मी हे का करत आहे?” हा प्रश्न स्वतःला विचारलात, की अभ्यास हा स्वतःच्या self-respect आणि self-growth चा भाग होतो. अहो, हॉस्टेलवरचं आयुष्य क्षणिक असतं.

घरची उब दूर असते.

मायेचा आवाज फोनपुरताच मर्यादित राहतो.

पण ह्याच काळात आपण स्वतःसाठी उभं राहायला शिकतो. आणि कदाचित म्हणूनच, हॉस्टेल लाईफ आपल्याला जे शिकवतं, ते फक्त अभ्यासात नाही, तर आयुष्यात देखील फार उपयोगी पडतं. इथे चुका होतात, गोंधळ होतो, परंतू हळूहळू आपण स्वतःच स्वतःशी जळवून घ्यायला शिकतो. 

मग काय म्हणताय? क्या बोलती हॉस्टेलवाली पब्लिक?


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४