दिवसभर घरासाठी राबताना होणारी शारीरिक आणि मानसिक ओढाताण कधीकधी चिडचिडीला जन्म देते. पण या चिडचिडीच्या मुळाशी असते ती म्हणजे 'अपेक्षा'. आपल्याच माणसांकडून असलेल्या अपेक्षा कशा प्रकारे आपल्या मूडवर परिणाम करतात, याचे विश्लेषण करणारा हा एक प्रांजळ लेख.

आज खूप दिवसांनी मनातलंच काहीतरी लिहावं असं ठरवून लिहायला बसले. विचार मनात होतेच, फक्त ते मांडायचे होते. रोजच्या दैनंदिन कामातून वेळ काढून आज म्हटलं, लिहून डोक्यातील विचारांना 'डिलीट' करूया; नाहीतर ते डोक्यात साठून राहतात आणि डोकं जड होतं.
आम्ही स्त्रिया दिवसभर राबतो, घरच्यांचे सगळे हवे-नको ते बघतो. घर आवरणे, कपडे, भांडी हे सगळं निगुतीने करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यात आमची खूप धावपळ होते, शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. यातूनच चिडचिड निर्माण होते आणि मग हीच चिडचिड आपण नवरा किंवा मुलांवर काढतो. काम सुरळीत झालं तर ठीक, नाहीतर तारांबळ उडालीच समजा! मग घरातलं वातावरण बिघडतं आणि राग-रुसवे, फुगवे, अपेक्षा यांना वाट मोकळी मिळते.
अशा वेळी आम्ही नवरा किंवा घरच्या इतर लोकांच्या मागे लागतो - "असं करा, तसं करा, कामात मदत करा. तुमचं घराकडे लक्ष नाही, काही मदत करत नाही. आम्ही आहोत म्हणून तुमचं घर चालतंय, दुसरी असती तर केव्हाच सोडून गेली असती," अशा तक्रारी सुरू होतात. मग काय, पुरुषांचीही तारांबळ उडते की हिचे 'मूड्स आणि मूड स्विंग्स' नेमके आहेत तरी काय? आणि मग पुन्हा घरातील वातावरण बिघडतं.
असं का बरं होतं? यामागचं खरं कारण म्हणजे 'अपेक्षा'. आपल्या घरच्यांकडून मदतीची असलेली एक अपेक्षा! ही अपेक्षाच आमच्या मूड स्विंग्सचं प्रमुख कारण आहे. आपली अपेक्षा असते की, नवऱ्याने आणि मुलांनी आपली कामं स्वतः करावीत, कामात थोडा हातभार लावावा, सगळं नीटनेटके ठेवावे. पण तुमच्या लक्षात येतं का, ही अपेक्षा आपण कधी करतो? जेव्हा आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतात, तेव्हाच आपण ही अपेक्षा करतो.
कसं काय? जेव्हा आपला नवरा कामावर जातो किंवा बाहेरगावी जातो, तेव्हा आपण आपली कामं करतोच ना? तेव्हा आपली काही चिडचिड होत नाही, राग येत नाही की मूड स्विंग्स होत नाहीत. का बरं? कारण तेव्हा आम्हाला माहिती असतं की ही जबाबदारी आमचीच आहे आणि मदतीला कोणीही नाही. जेव्हा आपल्या मदतीला कोणी नाही हे लक्षात येतं, तेव्हा आपोआपच अपेक्षा उरत नाही. आपणच ही कामं उरकून घेतली पाहिजेत, हे मनाशी पक्कं होतं. मदतीला आता कोणी नाही हे ओळखून, वेळेचं गणित मांडून आम्ही ती कामं उरकतो. 'अपेक्षा' हेच आमच्या चिडचिडीचे मुख्य कारण आहे, पण शेवटी अपेक्षा आपण आपल्याच माणसांकडून करतो, हेही तितकंच खरं आहे!

- श्रद्धा मोने