आयुष्याचा बराचसा टप्पा ओलांडल्यानंतर मागे वळून पाहताना अनेक चित्रपट उलगडत जातात. आपण इतरांशी जसे वागतो, त्याची परतफेड कधी ना कधी होतच असते. नियती पाप-पुण्याचे माप याच जन्मात पदरात घालते, याचा प्रत्यय देणारी 'भाटकर काकूं'ची ही सत्यकथा.

आयुष्याचा बराचसा टप्पा आता ओलांडला. अनुभवले ते एक चित्रपटच जणू! मुलगी, विद्यार्थिनी, पत्नी, शिक्षिका, आई अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या; निदान मला तरी तसे वाटते. अनेक अनुभव आले, माणसे भेटली; काही जवळची झाली, काही दुरावली, तर काही आली तशी गेली. पण एक सांगू? आपण इतरांशी जसे वागतो किंवा जसे संबंध ठेवतो, त्याची परतफेड होतेच! नक्की त्याच लोकांकडून नसेल, पण कुठून ना कुठून 'रिटर्न्स' मिळतातच. चांगल्याला चांगले, तर वाईटाला वाईटच पदरात पडते. एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून मी एका गोष्टीवर ठाम झाले आहे की नियती आहे आणि ती पाप-पुण्याचे माप आपल्या पदरात इथेच घालते.
आता इतके सगळे सांगण्याची आणि आठवण्याची गरज काय? तर आमच्या 'भाटकर काकू'. आमच्या चाळीत खूप 'वल्ली' झाल्या, त्यात भाटकर काकूंचा नंबर एकदम वरचा. भाटकर काकू म्हणजे चाळीची जाग जणू! सतत कोणत्या ना कोणत्या मजल्यावर त्या दिसायच्याच. मग रात्र असो वा दिवस, पौर्णिमा असो वा अमावस्या; कुठे ना कुठे, कोणाच्या ना कोणाच्या दारात किंवा घरात काकू दिसणारच. तशा त्या राहायच्या पहिल्या मजल्यावर, पण वावर मात्र पूर्ण चाळभर असे. कोणाच्या घरात गेल्या तर शांत गप्पा मारतील असे कधीच घडायचे नाही. चुगल्या करणे, भांडणे लावणे आणि मुख्यत्वे दुसऱ्याच्या घरातील खबर काढणे यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. स्वानुभवावरून सांगते, या गोष्टी करायला सुद्धा एक कला लागते; त्यासाठी जो बिनधास्तपणा लागतो, तो सगळ्यांकडे नसतो. अख्ख्या चाळीला माहिती होते की भाटकर काकू काय चीज आहेत, पण तरीही प्रत्येक गृहिणी आपल्या मनातील गोष्टी त्यांच्याकडे बोलायची आणि काकू त्या गावभर करायच्या.
एकदा खालच्या मजल्यावरील छेडांची मुलगी नाक्यावर कोणाशी तरी बोलत होती. काकूंना खबर लागली आणि ती मुलगी घरी येईपर्यंत चाळीत सगळ्यांना हे कळलेही होते. झाले! सगळीकडे चर्चा सुरू झाली. शेवटी ही गोष्ट छेडांच्या कानावरही गेली. घरात मोठा तमाशा झाला, पण आजकालची मुले ती, थोडेच ऐकणार! जेव्हा तिला कळले की भाटकर काकूंनी हा गोंधळ घातला आहे, तेव्हा गॅलरीत मोठे 'रणकंदन' झाले. काकूही जोरात आणि छेडांची लेकही! शेवटी मिटवामिटवी झाली, पण काकू गप्प बसतील तर त्या काकू कसल्या? दुसऱ्या दिवसापासून "छेडांच्या मुलांना चांगली शिकवण नाही, ती उर्मट आहेत" अशी गावभर बोंबाबोंब त्यांनी सुरू केली.
अशा या भाटकर काकू आपल्या पतीदेवांसोबत पहिल्या मजल्यावर राहत असत. भाटकर काका म्हणजे देवमाणूस, अगदी नाकासमोर चालणारे. घरात दोन मुले होती, दोघेही हुशार आणि टापटीप. काकाच त्यांचे सगळे करायचे, कारण काकूंना आपल्या नसत्या उद्योगातून वेळच मिळत नसे. शिफ्ट ड्युटी करणारे भाटकर काका कुकर लावणे, भाजी आणणे, साफसफाई करणे अशी घरगुती कामेही करायचे आणि काकू मात्र नुसत्या 'भटकभवानी'! आमच्या घरात काकू आल्या की "संक्रांत आली" असेच आमच्या सासूबाई म्हणायच्या. त्यांच्या स्वभावाची पूर्वकल्पना असल्याने मी सुद्धा त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे.
घरात आणि नातेवाईकांत सुद्धा त्यांच्या या स्वभावामुळे त्या प्रसिद्ध होत्या. सासूबाई तर कंटाळून आधीच आपल्या मुलीकडे राहायला गेल्या होत्या. थोडीफार उमज आलेली स्वतःची मुलेही त्यांना घरात फारसे विचारत नसत; अर्थात त्याला त्यांचा मतलबी स्वभावही कारणीभूत होता. पण काकूंना त्याचे काहीच वाटत नसे. पूर्वी त्यांच्याकडे त्यांचे दोन भाऊ सणासुदीला येत असत, पण त्यांच्या बायकांमध्येही भांडणे लावल्याने भावांनीही त्यांच्याशी संबंध तोडले होते. समोरच्या चाळीत थोरात कुटुंब राहत होते, ते दोन भाऊ आपल्या कुटुंबासह सुखाने राहत होते, पण त्यांच्या घरातही काकूंनी वादाची ठिणगी टाकली. शेवटी खोली विकून थोरात बंधू वेगळे
झाले.
घरात आणि नात्यात काकूंना किंमत उरली नव्हती. मुलांनाही आईबद्दल ओढ नव्हती. शिक्षण झाल्यावर मुलगा बंगलोरला गेला, तर मुलगी लग्न करून परगावी गेली; ती परत कधीच न येण्यासाठी. अशा कजाग आणि भांडकुदळ आईबरोबर कोण राहील? काकूंनी अनेकांची घरे दुभंगली, अनेक घनिष्ठ नात्यांत विष कालवले आणि याचे परिणाम त्यांना भोगावेच लागले. काही वर्षांपूर्वी भाटकर काका वारले; ते जिवंत होते तेव्हाही घरात नसल्यासारखेच असत. छेडांच्या पत्नीने दिलेला शाप जणू खरा ठरला. ती एकदा काकूंना म्हणाली होती, "तुम दुसरे के घर में झांकती है ना, एक दिन ऐसा आयेगा की तेरे को एक भी घर नहीं बचेगा झांकने को." खरेच, आज चाळीत सगळे आहेत, पण भाटकर काकू एकट्या पडल्या आहेत. कोणीच त्यांना विचारत नाही.
आयुष्यात केलेल्या चुका त्यांना कळल्या आहेत की नाही, कुणास ठाऊक! आता त्या घरातच असतात किंवा संध्याकाळच्या वेळी गल्लीतल्या देवळात असतात. मला वाटले की कदाचित त्यांना पश्चात्ताप झाला असेल, पण कसले काय! परवाच देवळात प्रसाद वाटण्यावरून त्यांचे भांडण झाले. भटजी आरतीनंतर ठराविक लोकांनाच प्रसाद जास्त देतात, यावरून त्यांनी प्रकरण वाढवले. शेवटी चौकशी झाली आणि त्यात भाटकर काकूंचेच नाव आले. सगळ्यांनी कपाळावर हात मारला. "काय करायचे हो या काकूंचे?" भटजी बुवा बोलले. मी मनात म्हटले, काय करणार? "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही...”

- सौ. रेशम जयंत झारापकर