महिनाभर तापलेले ते आभाळ आता प्रेमाच्या सरींनी ओसंडून वाहत होते. या पावसाने फक्त जमीनच नाही, तर रामाच्या मनातील नैराश्यही भिजवून टाकले. करपलेल्या शेतात पुन्हा हिरवाईचे स्वप्न तरारू लागले.

कोकणच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा देखण्या गावात राम नावाचा कष्टाळू शेतकरी राहायचा. निसर्गाच्या सान्निध्यात त्याचे छोटेसे कौलारू घर होते. घरात त्याची मायाळू पत्नी सुमन आणि गौरी व चंदन ही दोन निरागस मुले होती. राम रोज पहाटेच्या कोवळ्या उन्हात खांद्यावर नांगर घेऊन शेताची वाट धरायचा. भात, नाचणी आणि परसातल्या पालेभाज्यांची लागवड करून तो आपल्या संसाराचा गाडा मोठ्या अभिमानाने ओढत होता. हिरव्यागार रानात कष्ट करताना मिळणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचा.
पण म्हणतात ना, 'नशिबाचे चक्र कधी फिरेल सांगता येत नाही'. आनंदाच्या दिवसांत अचानक दुःखाचे ढग दाटून आले. आभाळातून पावसाचा एक थेंबही पडनासा झाला. महिना उलटला तरी पावसाने पाठ फिरवली होती. कडक उन्हामुळे रामाने रक्ताचे पाणी करून लावलेली पिके डोळ्यादेखत करपू लागली. गावच्या नद्या, नाले आणि विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या. जमिनीला भेगा गेल्या होत्या आणि सर्व गावकरी व्याकुळ होऊन चातकासारखी पावसाची वाट पाहत होते.
असेच दिवस सरत असताना महाशिवरात्रीचा मंगलमय दिवस समीप आला. गावातल्या प्राचीन शिवमंदिरात सणाची लगबग सुरू झाली होती, पण रामाच्या घरात मात्र चिंतेचे सावट होते. शेती हातची गेल्यामुळे घरात अन्नाचा कण नव्हता आणि पदरात दामही उरला नव्हता. अशा स्थितीत सण साजरा करायचा तरी कसा, हा प्रश्न त्याला सतावत होता.
महाशिवरात्रीच्या पहाटे गौरी आपल्या बाबांकडे आली आणि म्हणाली, "बाबा, आज देवाचा मोठा दिवस आहे, आपण मंदिरात जाऊया ना!" पण निराशेने ग्रासलेला राम म्हणाला, "बाळा, आपल्याला देव केव्हाच विसरला आहे, कशाला जायचे तिथे?" तरीही लेकीचा हट्ट आणि तिचा देवावरचा विश्वास पाहून राम कुटुंबासह मंदिरात जाण्यास निघाला. मंदिराच्या वाटेवर भक्तीचा गंध दरवळत होता. काही स्त्रिया परडीत बेलपत्र, सुवासिक अगरबत्ती आणि रानफुले घेऊन बसल्या होत्या. सुमनने आपल्या पदराशी जपून ठेवलेले शेवटचे काही पैसे काढून पूजेचे साहित्य घेतले आणि सर्वजण
गाभाऱ्यात गेले.
मंदिरात शिवनामाचा गजर सुरू होता. गौरीने जड अंतःकरणाने शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहिले. अभिषेक करताना तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पिंडीवर पडले. जणू काही ती आपली सर्व गाऱ्हाणी महादेवाच्या चरणी अर्पण करत होती. तिने मनोभावे प्रार्थना केली, "देवा, माझ्या बाबांचे कष्ट वाया जाऊ देऊ नकोस, आमच्यावरचे हे संकट दूर कर."
दर्शन घेऊन सर्वजण जड पावलांनी घराकडे परतत होते. इतक्यात निसर्गाची चक्रे फिरली! शांत असलेले आकाश अचानक काळ्याकुट्ट ढगांनी झाकून गेले. सोसाट्याचा गार वारा वाहू लागला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षण सर्वजण भयभीत झाले, पण पुढच्याच क्षणी टपोरे थेंब जमिनीवर पडू लागले. मातीचा तो सुगंध आणि अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरींनी रामाच्या कुटुंबाचा सारा थकवा आणि दुःख धुवून काढले. सुमनने कृतज्ञतेने आकाशाकडे हात जोडले. हा एखादा चमत्कारच होता! गौरी आनंदाने ओरडली, "बाबा, बघा! महादेवाने माझी हाक ऐकली. ही त्याचीच कृपा आहे!"
महिनाभर तापलेले ते आभाळ आता प्रेमाच्या सरींनी ओसंडून वाहत होते. या पावसाने फक्त जमीनच नाही, तर रामाच्या मनातील नैराश्यही भिजवून टाकले. करपलेल्या शेतात पुन्हा हिरवाईचे स्वप्न तरारू लागले.
घरी परतल्यावर गौरीने उत्साहाने विचारले, "बाबा, देव असतो ना?" तेव्हा रामाने तिला जवळ घेतले आणि गदगदल्या स्वराने म्हणाला, "हो बाळा, महादेव नेहमीच आपल्या सोबत असतात. कधी या पावसाच्या रूपाने, तर कधी आपल्या कष्टावर असलेल्या अढळ विश्वासाच्या रूपाने."
पुन्हा एकदा रामाचे कुटुंब, नव्या उमेदीने आणि हसतमुखाने, हिरव्यागार शेतीच्या स्वप्नाकडे चालू लागले.

- पूजा परब, पालये, पेडणे