रेडिमेड वस्तूंचा मारा - माणूस पागल आवारा !

जर आपण वेळेत सावरलो नाही आणि 'श्रम' संस्कृतीकडे वळलो नाही, तर भविष्यात आपली पुढची पिढी केवळ यंत्रांवर अवलंबून असलेली एक मुर्ती बनेल. गरज आहे ती थोडा वेळ काढून स्वतःचे काम स्वतः करण्याची आणि या मार्केटिंगच्या मायाजालातून बाहेर पडण्याची!

Story: मिश्किली |
14th February, 10:37 pm
रेडिमेड वस्तूंचा मारा - माणूस पागल आवारा !

जगात उद्या काय नवीन घडेल आणि कुठली अजब वस्तू बाजारात येईल, याची आज माणूस कल्पना सुद्धा करू शकत नाही. नवनवीन संशोधनापेक्षा 'नवनवीन सोयी' शोधण्याकडे माणसाचा कल वाढला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी तर माणसे आज कुठल्याही थरावर जातात, पण स्वतःच्या आरोग्याची नोंद ठेवायला मात्र विसरतात. पूर्वीचा माणूस मेहनत घ्यायचा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्यायचा. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता कुणालाच कष्ट करायचे नाहीत. 'बटण दाबा आणि हजर' या मानसिकतेमुळे माणूस आज स्वतःच्याच घरात पाहुण्यासारखा राहू लागला आहे.

एक काळ होता जेव्हा लोकांपाशी वेळ होता आणि घरातील प्रत्येक लहान-मोठे काम ते स्वतः आवडीने करायचे. विहिरीतून पाणी काढण्यापासून ते अंगण झाडण्यापर्यंतच्या कामांमुळे शरीराचा नैसर्गिक व्यायाम व्हायचा. आता कुणाकडे वेळ नाही, असे म्हणण्यापेक्षा कुणाला वेळ द्यायची इच्छा नाही, असे म्हणणे उपयुक्त ठरेल. आज मध्यमवर्गीयच काय, आर्थिक ओढाताण असलेल्या घरांत सुद्धा कामवाली, डिशवॉशर, वॉशिंग मशिन आणि व्हॅक्युम क्लीनरचा शिरकाव झाला आहे. 'वेळ वाचवणे' हे जरी गोंडस नाव दिले जात असले, तरी वाचवलेल्या त्या वेळेत माणूस नक्की काय करतो? हा वेळ जातो केवळ मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोलिंग करण्यात!

परिणामी, घरी बसून फक्त खायचे आणि नंतर आरोग्याच्या तक्रारींचा पाढा वाचायचा, हेच आजचे जीवन झाले आहे. कुणाचे वजन वाढतेय, कुणाचे पोट सुटलेय, तर कुणाचे कोलेस्ट्रॉल वाढून हृदय धोक्यात आले आहे. जेव्हा शरीराची हालचालच होत नाही, तेव्हा शरीर आजारांच्या रूपाने प्रत्युत्तर देणारच! "काम करायला माणसे मिळत नाहीत" ही ओरड सर्वत्र ऐकू येते, पण स्वतःचे काम स्वतः करण्याची लाज वाटणाऱ्यांची संख्याही तेवढीच वाढली आहे.

काही वर्षांपूर्वी एक विचित्र बातमी वाचनात आली - 'जगातील पहिली बिअर पावडर!' आता झटपट तयार करा थंडगार बिअर! हे वाचल्यावर कित्येक मद्यपींना पहिला प्रश्न पडला असेल की, "पावडरमध्ये चकणा पण मिक्स आहे का?" दुधाची पावडर, साखरेची पावडर, कस्टर्ड पावडर इथपर्यंत ठीक होते, पण आता बिअर सुद्धा पावडर स्वरूपात? यापुढे अजून काय यायचे बाकी राहिले आहे?

आज अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांवर सुईपासून विमानापर्यंत सर्व काही मिळते. टेबल-खुर्ची, कपाट इथपर्यंत समजण्यासारखे होते, पण आता लिंबू, केळीची पाने, दुर्वा, खाऊची पाने आणि चक्क 'अंतिम संस्कार किट' सुद्धा ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. माणूस जिवंत असताना त्याला वेळ द्यायला कुणाकडे सवड नाही, पण त्याच्या मरणाचे सामान मात्र एका क्लिकवर घरपोच येते, ही केवढी मोठी शोकांतिका आहे! Sarvapooja Antim Kriya Final Rites Kit ही चर्चेचा विषय आहे. पण प्रश्न असा पडतो की, हे किट नक्की ऑर्डर करायचे कधी? कारण ‘सेल’ तर चालू असतो, पण माणसाचा 'सेल' कधी संपणार हे कोणालाच ठाऊक नसते! ऑनलाइन शॉपिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो 'डिलिव्हरी टाइम'. समजा एखाद्याने स्वतःसाठीच हे किट मागवायचे ठरवले, तर त्याने यमराजाला सांगावे का, "प्रभू, प्राण न्यायला दोन दिवस उशिरा या, कारण माझी किट अजून 'आउट फॉर डिलिव्हरी' आहे!"? किंवा समजा 'नेक्स्ट डे डिलिव्हरी' आहे आणि माणूस त्याआधीच गेला, तर पाहुण्यांनी कुरियरवाल्याची वाट पाहत प्रेत थांबवून ठेवायचे का? ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की 'रिटर्न पॉलिसी' आलीच. समजा, एखाद्याचे प्राण जाता जाता परत आले किंवा तो मरता मरता वाचला, तर त्या किटचं काय करायचं? ‘Item not used’ असं म्हणून ते परत करायचं का? त्याहून भयानक असे की त्यावर लोकांचे रिव्ह्यू आहेत – Just used for my friend. He burnt really well, no chance of coming back. Ordering one more for my uncle.

मार्केटिंगच्या तंत्राने तर आपल्या साध्या गोष्टींना 'लक्झरी' बनवून विकायला सुरुवात केली आहे. घरी सहजपणे आणि अत्यंत स्वस्त दरात तयार होणारे 'हळदीचे दूध' आज कॅफेमध्ये 'टर्मरिक लॅटे' या नावाने ३००-४०० रुपयांना विकले जात आहे. जे आपण घरच्या घरी 50 रुपयात बनवू शकतो. फालुद्यातील बिया आणि त्यात फ्लेवर मिसळून कृत्रिम सब्जा विकले जात आहे. डीटॉक्स वॉटर, सोललेले डाळींब, मक्याचे खुले दाणे, सोललेली लसूण, सोललेली केळी सुद्धा बाजारात आली आहेत. केळे नैसर्गिक पॅकिंग मध्ये येते पण त्यालाही आता प्लास्टिक मध्ये बांधून विकले जात आहे. ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला ताज्या स्वरूपात दिल्या आहेत, त्या आपण प्लास्टिकमध्ये बंद करून विकत घेत आहोत. मिठाचे साधे पाणी ‘नेसल व्हॉश’च्या नावाने ३०० रुपयांना विकले जात आहे.

डबाबंद आणि बाटलीबंद पदार्थांनी आपल्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला आहे. पूर्वी आईच्या हाताची चव असायची, आता प्रिझर्व्हेटिव्हजची चव आहे. ताजे अन्न खाण्याऐवजी 'दोन मिनिटात' तयार होणाऱ्या नूडल्स किंवा 'रेडी टू ईट' पाकिटांवर आपण जगत आहोत. शेवटी प्रश्न उरतो तो मानसिकतेचा. आपण सोयींच्या नावाखाली स्वतःला अपंग तर बनवत नाही आहोत ना? रेडिमेड वस्तूंच्या या माऱ्यात माणूस खरोखरच 'पागल आवारा' झाला आहे. त्याला स्वतःच्या हाताने काम करण्यात कमीपणा वाटू लागला आहे. जर आपण वेळेत सावरलो नाही आणि 'श्रम' संस्कृतीकडे वळलो नाही, तर भविष्यात आपली पुढची पिढी केवळ यंत्रांवर अवलंबून असलेली एक मुर्ती बनेल. गरज आहे ती थोडा वेळ काढून स्वतःचे काम स्वतः करण्याची आणि या मार्केटिंगच्या मायाजालातून बाहेर पडण्याची!


- आदित्य सिनाय भांगी, पणजी