सुरावलीतील प्रकार : घटना सीसीटीव्हीत कैद

मडगाव : सुरावली येथील एका निवासी इमारतीतून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोर सायकल घेऊन इमारतीकडे आला व त्यानंतर पार्किंगमधील दुचाकी चोरून पसार झाला. याप्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे.
सुरावली येथील सेबी नामक व्यक्तीची सुमारे १.६० लाख रुपये किमतीची दुचाकी चोरी झाली आहे. चोरीची घटना बुधवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित सायकलवरून निवासी इमारतीच्या बाहेर आला. त्याने इमारतीबाहेर सायकल उभी केली. त्यानंतर गेट उघडून तो इमारतीच्या परिसरात घुसला. त्याठिकाणी पाहणी केली व त्यानंतर हँडल लॉक नसलेली दुचाकी ढकलत इमारतीच्या गेटबाहेर आणली व दुचाकीवरुन पसार झाला. चोरीची ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. सेबी यांनी कोलवा पोलिसात दुचाकी चोरीप्रकरणी तक्रार नोंद केली आहे. कोलवा पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही देण्यात आलेले असून पोलीस पुराव्यांच्या आधारे तपास करीत आहेत.