वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

साक्षीदारांनी जबाब फिरविला, जखमीचे निधन झाल्याचा मुद्दा निर्णायक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

पणजी : आगशी येथे २०१८ मध्ये वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि इतर साक्षीदारांनी जबाब फिरविला. तसेच जखमी वीज कर्मचाऱ्याचे निधन झाल्यामुळे त्याची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित लॉरेन्स पाल्हा याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. आरतीकुमारी नाईक यांनी दिला.

आगशी पोलिसांनी या प्रकरणी २५ मार्च २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, २२ मार्च २०१८ रोजी दुपारी आगशी परिसरातील जेम्स बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये वीज खंडीत झाली होती. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. याच दरम्यान दुपारी २ वाजता वीज कर्मचारी सोनू त्या ठिकाणी आला. त्यावेळी संशयित लाॅरेन्स पाल्हा आणि वीज कर्मचारी सोनू यांच्यात वाद झाला. लॉरेन्सने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. त्यात वीज कर्मचारी जखमी झाला होता. त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले. या प्रकरणी वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, आगशी पोलिसांनी संशयित लाॅरेन्स पाल्हा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. याच दरम्यान संशयित पाल्हा याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी तपासपूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर संशयित लाॅरेन्स पाल्हा याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.

वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांच्या जबाबात विसंगती

संशयित पाल्हा यांच्यावतीने अ‍ॅड. मायकल नाझारेथ यांनी बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच तक्रारीत आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा युक्तिवाद केला. तक्रारीत वीज कर्मचाऱ्याला स्टील प्लेट लागल्याचा उल्लेख असून, जप्त केलेल्या कोयत्याशी हा प्रकार सुसंगत नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालात आणि साक्षीदारांच्या जबाबातही विसंगती असल्याचे त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा