विद्यापीठाच्या मंचावर द्वेषाची भाषा नको : युरी आलेमाव

विद्यार्थी मंडळ पदग्रहण सोहळा संपन्न

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th February, 04:04 pm
विद्यापीठाच्या मंचावर द्वेषाची भाषा नको : युरी आलेमाव

पणजी : विद्यापीठ (University) हे ज्ञान मिळवण्याचे, करियर घडवण्याचे केंद्र आहे. येथे भावी पिढीला योग्य आकार दिला जातो. येथे द्वेष, पूर्वग्रह, भेदभाव पसरवणारी भाषा नसावी असा सल्ला विरोधी पक्ष नेते (Opposition Leader) युरी आलेमाव यांनी दिला.

मंगळवारी विद्यापीठ (Goa University) विद्यार्थी मंडळाच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार कार्लोस फेरेरा, कुलगुरू हरिलाल मेनन, रजिस्ट्रार सुंदर धुरी, सोहम राऊत, श्रुती पवार, साई देसाई व अन्य नवनियुक्त प्रतिनिधी उपस्थित होते.

आलेमाव म्हणाले की, नव्या विद्यार्थी मंडळाकडे (Students Council)  कालावधी कमी आहे. असे असले तरी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. त्याच वेळी त्यांना सामाजिक, नागरी प्रश्नांची माहिती असणे आवश्यक आहे.

संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांनी  अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. त्यांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासह नवीन कौशल्य आत्मसात करावे. 

कार्लोस फेरेरा म्हणाले की, मी गोवा विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होतो. गोवा विद्यापीठातील अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड असेल त्या क्षेत्रात काम करून सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करावेत.

विद्यार्थी मंडळात निवडून आलेल्या सर्वांची मते मिळाली नसली तरी त्यांना संपूर्ण विद्यार्थी समुदायासाठी काम करायचे आहे. यासाठी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे त्यांनी ठरवणे आवश्यक आहे. 

स्वातंत्र्य आणि शिस्त एकत्रित असणे आवश्यक 

मेनन म्हणाले की, देशातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत गोवा विद्यापीठात ठरलेल्या वेळेवर विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका होतात.

नवनियुक्त मंडळाने आपल्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी काम करावे. अधिकारांसोबत जबाबदाऱ्या येतात हेही लक्षात ठेवावे. स्वातंत्र्या सोबत शिस्त असणे महत्त्वाचे असते.

हेही वाचा