पोलीस अधीक्षकांकडून निरीक्षकाची बदली करण्यासह चौकशीचे आश्वासन

मडगाव : गोव्यातील (Goa) कोलवा (Colva) पोलीस निरीक्षकांनी (Police Inspector) पोलीस फौजफाट्यासह स्थानिक चर्चच्या (Church) धर्मगुरुंची भेट घेतल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कोलवा पोलीस ठाण्यावर धडक दिली.
ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीची आणि जाहीर माफीची मागणी लावून धरली. पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी पोलीस निरीक्षकांची बदली करून सदर प्रकारची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थानी माघार घेतली.
कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह चर्चमध्ये गेले होते. धार्मिक स्थळी अशा प्रकारे पोलीस फौजफाटा घेऊन जाणे हे अनाठायी आणि धार्मिक भावना दुखावणारे होते.
याची माहिती मिळताच कोलवा आणि आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. आमदार व्हेन्झी व्हिएगस, वॉरेन आलेमाव यांच्यासह स्थानिक जमा झाले होते.
कोलवा पोलीस निरीक्षकांनी चर्चच्या फादरची आणि ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी. संबंधित पोलीस निरीक्षकाची कोलवा पोलीस ठाण्यातून तत्काळ बदली करण्यात यावी. एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह चर्चमध्ये जाण्याचे नेमके कारण काय होते,
याची स्पष्टता मिळावी. तसेच पोलिसांनी जागेच्या वादातून गुप्ता नामक तक्रारदाराच्या तक्रारीनंतर स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे नोंद केले असून; मच्छीमारांनी केलेल्या तक्रारीनुसार गुप्ता नामक बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात यावा.
तसेच यापूर्वीही कोलवा पोलीस निरक्षकांकडून ग्रामस्थाकडे चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळालेली आहे, मारहाणही झालेली आहे. त्याची चौकशी करून गुन्हा नोंद करावा, अशा मागण्या केल्या आहेत.
कोलवा येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संतोष देसाई, पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल. पोलिस निरीक्षक विक्रम नायक यांची बदली करण्यात येईल व ग्रामस्थानी केलेल्या आरोपांची चौकशी करून पुढील प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन यावेळी दिले.
मात्र, जोपर्यंत पोलीस निरीक्षकांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे कोलवा पोलीस स्टेशन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी चर्चमध्ये पोलीस बंदोबस्तासह जाण्याची चूक कबूल करत माफी मागितली व पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.