पेडे, म्हापसा येथे मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकल्याने अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी


10th February, 10:18 am
पेडे, म्हापसा येथे मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकल्याने अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

म्हापसा : गोव्यातील (Goa) पेडे, म्हापसा (Mapusa) येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी बंद केलेल्या महामार्गाच्या (Highway) भागातून गेल्याने भरधाव दुचाकीचा अपघात झाला. त्यात राहुल भोसले (थिवी) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) (GMC)  दाखल करण्यात आले आहे.

मध्यरात्रीनंतर २ वाजता वरील अपघात घडला. राहुल भोसले हा युवक गिरी येथून दुचाकीने करासवाडा येथे जात होता. पेडे येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचला असता; कुणी तरी रस्त्यावरील बॅरिकेड्स बाजूला काढून ठेवल्याने, भरधाव दुचाकी घेऊन तसाच पुढे गेला.

रस्त्याच्या कामासाठी साठवून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकली. त्यात राहुल भोसले गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. 

दरम्यान, उड्डाणपुलाचे काम करताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने; हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास आणखी मोठा अपघात घडण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली असून, याठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.  

हेही वाचा