फोंडा पोटनिवडणुकीत विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक : युरी आलेमाव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th February, 02:52 pm
फोंडा पोटनिवडणुकीत विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक : युरी आलेमाव

पणजी : भाजपसारख्या (BJP) हुकुमशाही पक्षाला हटवण्यासाठी सर्व विरोधी (Opposition) पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. फोंडा मतदारसंघ (Ponda Constituency) नेहमीच काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत येथे काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे.

एकत्र येण्याबाबत आम्ही सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांशी बोलणी करणार आहे. भाजप येथे फोडा आणि राज्य कराचे राजकारण करत असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. मंगळवारी पणजीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आलेमाव म्हणाले की, आमच्यामध्ये काही मतभेद असतील तरी ते बंद दाराच्या आत राहिले पाहिजेत.  भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्वांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे.

अन्य राजकीय पक्षांनी गोव्याच्या,  गोमंतकीयांच्या हितासाठी एकत्र यावे. जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी केली. मात्र; आम्ही एकत्र असतो तर आणखी चांगला निकाल पाहायला मिळाला असता. मी दोस्तीपूर्ण लढत या कल्पनेच्या देखील विरोधात आहे. 

ते म्हणाले, चिंबलवासियांनी युनिटी मॉलच्या विरोधात ४४ दिवस आंदोलन केले. सरकारने आंदोलन करणाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरकार यशस्वी झाले नाही. हीच एकता राजकीय पक्षांनी दाखवणे आवश्यक आहे.

फोंड्यामध्ये काँग्रेस, विरोधी पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर काँग्रेसचा विजय सुलभ होईल. काँग्रेस पक्ष या निवडणुकीकडे गंभीरपणे पाहत आहे. येथे देखील भाजप फूट पाडून जिंकण्याचा प्रयत्न करेल. यासाठी विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.


हेही वाचा