वाहतूक संचालकांचे सहाय्यक वाहतूक संचालकांना आदेश

पणजी : वाहन नोंदणीसाठी आता 'लीव्ह अँड लायसन्स' (भाडे करार) तसेच आधार कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. वाहन नोंदणीच्या वेळी हे दस्तऐवज ग्राह्य धरू नयेत, असे आदेश वाहतूक संचालकांनी सहाय्यक वाहतूक संचालकांना दिले आहेत.
वाहन नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून लीव्ह अँड लायसन्स करार किंवा आधार कार्ड चालणार नाही, अशी अधिसूचना वाहतूक खात्याने जारी केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश आता संचालकांनी दिले आहेत.
निर्णयामागील प्रमुख कारणे
- अनेक माल वाहतूकदार तसेच परराज्यातील लोक 'लीव्ह अँड लायसन्स' करार सादर करून गोव्यात वाहनांची नोंदणी करतात. यामुळे त्यांना गोव्यातील स्थानिक सुविधांचा लाभ मिळतो.
- लीव्ह अँड लायसन्स कराराच्या आधारावर वाहन नोंदणी केली जाऊ नये, अशी मागणी माल वाहतूक चालक संघटना आणि क्रेन ऑपरेटर संघटनांनी केली होती.
- अनेक परप्रांतीय लोकांनी गोव्यात आधार कार्डची नोंदणी केली आहे. आधार कार्ड आणि भाडे करारावरील गोव्याचा पत्ता दाखवून हे लोक गोव्यात वाहनांची नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे.
आता कोणते पुरावे चालणार?
आता वाहन नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, वाहन चालक परवाना आणि इतर अधिकृत कागदपत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे.