कैऱ्या १०० रुपयांना ४ ते ५ : शेवग्याच्या ५ शेंगा १०० रुपयांना

पणजी : येथील बाजारात मानकुराद आंबे दाखल झाले आहेत. एक मानकुराद आंबा ५०० रुपयेला एक आणि ६ हजार रुपये डझन या दराने विकले जात आहेत. मानकुराद आंबे बाजारातील काही निवडक व्यापाऱ्यांकडेच तेही थोड्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. पुढील महिन्यात बाजारात अधिक प्रमाणात आंबे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यानंतरच आंब्याचे दर आवाक्यात येतील, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
पणजी बाजारात अद्याप हापूस आंबे दाखल झालेले नाहीत. सोमवारी तोतापुरी आंबे २५० रुपये किलो दराने विकले जात होते. कैऱ्या १०० रुपयांना ४ ते ५ नग या दराने विकल्या जात होत्या. फणसाचे गरे १०० रुपयांना १० ते १२ या दराने विकले जात होते. शेवगा अजूनही महाग असून १०० रुपयेला ५ शेंगा या दराने विकला जात होता, तर लिंबू ५ रुपयांना एक नग होता. सोमवारी पणजी बाजारातील अन्य भाज्यांचे दर मागील आठवड्याप्रमाणेच होते.
बाजारात नारळ आकारानुसार ३० ते ५० रुपयांना नग होता. रताळी ८० रुपये किलो होती. लहान लसूण २०० रुपये, तर मोठी लसूण ५०० रुपये किलो होती. आल्याचे दर १८० ते २०० रुपये किलो होते. कांदा आणि बटाटा प्रत्येकी ५० रुपये, तर टोमॅटो ४० रुपये किलो होते. मटार, गाजर भेंडी, ढब्बू मिरची ८० रुपये किलो होते. फ्लॉवर ५० रुपये नग या दराने विकला जात होता, तर कोबीचे दर ४० रुपये किलो होते. वांगी ६० ते ८० रुपये किलो होती.
बाजारात वालपापडी दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो होती. काकडी ८० रुपये, तर मिरची ८० ते १०० रुपये किलो होती. मेथीची एक जुडी २५ रुपये, पालक, कांदा पात प्रत्येकी १५ रुपये जुडी होते. शेपू २५ रुपये, तर कोथिंबीर २० रुपयांना एक जुडी होती.
कांदा, टोमॅटो ‘फलोत्पादन’कडे निम्म्या दराने
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २७ रुपये, बटाटा २५ रुपये, टोमॅटो २८ रुपये, वालपापडी ६० रुपये, मिरची ७६ रुपये, भेंडी ५७ रुपये, गाजर २५ रुपये, तर कोबी २५ रुपये प्रती किलो दराने विकले जात होते. फ्लॉवरच्या एका नगाचा दर ३५ रुपये होता.