
पणजी : सरकार गोव्यातील (Goa) मांडवी नदीत (Mandovi River) एका मोठ्या कॅसिनो जहाजाला (Casino Ship) परवानगी देणार आहे. मांडवीतील प्रदूषण तसेच स्थानिकांना सहन करावा लागणाऱ्या त्रासाचा विचार करता येथे कॅसिनोला परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली.
सोमवारी त्यांनी याबाबत महापौर रोहित मोन्सेरात यांची भेट घेतली. पणजी महानगरपालिकेने (Panjim Muncipal Corportation) या कॅसिनोच्या विरोधात ठराव घ्यावा; अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी वाल्मिकी नाईक, जॅक सुखीजा, पॅट्रिशिया पिंटो व अन्य नागरिक उपस्थित होते.
याबाबत वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, सरकार नव्या कॅसिनोला परवानगी देत नाही; असे सांगत आहे. मात्र; जुन्या कॅसिनोच्या परवान्यावर मोठे जहाज आणण्याची परवानगी देत आहे. त्यामुळे आधीची लहान कॅसिनो जहाजे जाऊन आता तिथे मोठी जहाजे आणली जात आहेत. आता मांडवीत ११२ मीटर लांब आणि २७ मीटर उंच कॅसिनो येणार आहे.
मागील अनेक वर्षे पणजीतील कॅसिनोमुळे मांडवी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शिवाय वाहतूक कोंडी, गुन्हेगारी देखील वाढली आहे. ते म्हणाले, सरकार एका बाजूला म्हादई वाचवणार म्हणते तर दुसरीकडे पणजीतील एखाद्या इमारती पेक्षाही उंच कॅसिनो नदीत आणत आहे. सरकारने लोकांना फसवणे बंद केले पाहिजे. याबाबत आम्ही रोहित मोन्सेरात यांना निवेदन दिले आहे.
आम्ही उद्या याविषयी पणजीच्या आमदारांना भेटणार आहोत. त्यांना आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट देण्याबाबत देखील सांगणार आहोत. तसेच नदी परिवहन, जीसीझेडएमए, बंदर कप्तान व या संबंधित अन्य सर्व खात्यांना देखील पत्र लिहिणार आहोत.
१२ रोजी महापालिका बैठकीत ठराव मांडणार
रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, कॅसिनोच्या परवानगीचा विषय महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. आमचा अधिकार केवळ व्यापार परवाना देण्यापुरता मर्यादित आहे. याबाबत महापालिकेच्या १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत ठराव मांडला जाईल. वैयक्तिकरित्या मी कॅसिनोंच्या विरुद्ध आहे.