घोगळ येथील सील केलेली मशीद खुली करण्याची मागणी

मुस्लिम बांधवांनी मशिदीबाहेर जमून निदर्शने केली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th February, 01:07 pm
घोगळ येथील सील केलेली मशीद खुली करण्याची मागणी

मडगाव: घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या बाहेर झालेल्या खून प्रकरणानंतर जिल्हा प्रशासनाने मशीद सील केली होती. आज सोमवारी मुस्लिम बांधवांनी मशिदीबाहेर जमून निदर्शने केली व रमजानपूर्वी मशीद खुली करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या बाहेर ३० जानेवारी रोजी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अली खान यांची हत्या करण्यात आली होती. मशिदीवरील ताबा आणि निधी संदर्भातील वादातून ही घटना घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत मुख्य सूत्रधार अक्रम खान आणि चाकू पुरवणारा साहिल याच्यासह एकूण आठ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर मशिदीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुनाच्या घटनेमुळे पोलिसांच्या अहवालानुसार, दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने मशिदीचा परिसर सील करण्यात आला. परिणामी, गेल्या शुक्रवारीही नमाज पठणासाठी ही मशीद बंदच होती.

या कारणास्तव सोमवारी मुस्लिम बांधवांनी मशिदीजवळ गर्दी केली होती. 'मशीद हे ईश्वराचे घर असून ते जास्त काळ बंद ठेवणे चुकीचे आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, मात्र सर्वसामान्य भाविकांना नमाज पठणापासून वंचित ठेवू नये,' अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सुन्नी गुलिस्तान मशिदीचे सील उघडून नमाज पठणास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून उपजिल्हाधिकार्‍यांनी ही मशीद सील केली असून, तणाव निवळल्याशिवाय ही बंदी कायम राहण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

मशिदीबाहेर जमाव वाढल्याने फातोर्डा पोलिसांनी जादा कुमक मागवून घेतली होती. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. धार्मिक स्थळ बंद राहता कामा नये, मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. शांतता राखून आपण यावर योग्य तोडगा काढूया, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, मशिदीवर योग्य व्यक्तींची नियुक्ती व्हावी आणि या विषयावरून अधिक गोंधळ होऊ नये यासाठी मंत्री दिगंबर कामत व आमदार विजय सरदेसाई यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एका शिष्टमंडळासह दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन बैठक आयोजित केली जाईल, असेही रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा