बदलीचा सूड घेण्यासाठी सहकाऱ्याचे कृत्य

बेळगाव : बेळगाव येथील एका महिला अधिकाऱ्याच्या घरात बल्ब होल्डरमध्ये छुपे कॅमेरे बसवून चित्रीकरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या बदलीचा सूड घेण्यासाठी एका सहकाऱ्यानेच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्याच्या घरातील बल्ब होल्डरमध्ये छुपे कॅमेरे सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास केला असता, एका सरकारी अधिकाऱ्यानेच हे षड्यंत्र रचल्याचे उघड झाले असून माळमारुती पोलिसांनी या विकृत कृत्याचा पर्दाफाश केला आहे.
व्यावसायिक वैमनस्यातून महिला अधिकाऱ्याला समाजात बदनाम करण्याच्या हेतूने हे कॅमेरे बसवण्यात आले होते. याप्रकरणी विनोद टी. या सरकारी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे मोबाईल फोन पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.