स्थानिक आक्रमक

सांगे : गोव्यातील (Goa) मिराबाग-सावर्डे (Mirabag, Sanvordem) येथे झुवारी नदीवर (Zuari River) बंधारा बांधण्यास विरोध करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने स्थानिक एकवटले. बंधाऱ्याला तीव्र विरोध केला. स्थानिक आक्रमक बनल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी उपस्थितांवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
बंधारा बांधण्याचे काम घेतलेला कंत्राटदार मिराबाग येथे येताच मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिकांनी काम सुरू करण्यास विरोध केला. त्यांच्यावर रोष व्यक्त करीत प्रश्नांची सरबत्ती केली. बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे दाखवण्याची मागणी स्थानिकांनी कंत्राटदाराकडे केली.
पोलिसांनी स्थानिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमानता स्थानिक कंत्राटदाराच्या अंगावर धावून जाऊ लागले. कुठल्याही परिस्थितीत बंधारा होऊ दिला जाणार नाही; असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी मिराबाग तसेच आसपासच्या भागातील ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यात पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने होत्या.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मिराबाग येथील स्थानिक झुवारी नदीवर बंधारा बांधण्यासाठी आंदोलन करीत आहेत. तरीही काम हाती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने, स्थानिकांचा संयम सुटू लागल्याचे व आक्रमक बनल्याची माहिती येथील काही स्थानिकांनी दिली. मिराबाग येथे झुवारी नदीवर बंधारा उभारल्यास पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जाणार व त्याचा फटका बसणार असल्याची भीती स्थानिकांना आहे. त्यामुळेच या बंधारा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक एकवटले आहेत.
बंधाऱ्याचे काम स्थानिकांनी पाडले बंद
दरम्यान, बंधाऱ्याचे काम बंद पाडण्यास मिराबाग-सावर्डे येथील स्थानिक यशस्वी ठरले आहेत. स्थानिकांचा वाढता विरोध पाहून कामासाठी आणलेली मशिनरी कंत्राटदाराने तेथून नेण्यास सुरूवात केली आहे . तुर्तास काम बंद करण्यात आले आहे.