मिराबाग सावर्डे येथील सभेत निर्धार

सांगे : मिराबाग सावर्डे येथे जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याला स्थानिक लोकांनी विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत बंधारा होऊ देणार नसल्याचा निर्धार मिराबाग येथे झालेल्या सभेत रविवारी केला.
सभेला चिंबल येथील गोविंद शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई, नीलेश गावडे उपस्थित होते. यावेळी उपेंद्र नाईक यांनी सांगितले की, मिराबाग गावात आतापर्यंत सर्व लोक एकोप्याने व शांततेने राहत होते. मात्र, बंधाऱ्याचा विषय पुढे आणल्यापासून गावात फूट पडली आहे. सरकारने या प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते तसेच जनसुनावणी घेणे गरजेचे होते; मात्र तसे करण्यात आले नाही. सरकारला पाणीच हवे असेल तर पंपिंगद्वारे ते नेले जाऊ शकते; त्यासाठी बंधाऱ्याची गरज काय, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
नीलेश गावडे यांनी सांगितले की, जुवारी नदीवर बंधारा का आणि कुणासाठी आवश्यक आहे, हे सरकारने स्पष्ट करायला हवे होते. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल लोकांसमोर मांडायला हवा होता. उसगाव येथे असाच एक प्रकल्प प्रस्तावित होता आणि तो लोकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले. हा बंधारा झाल्यास खारफुटी नष्ट होऊन किनारी भागात धूप होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महिलांनी पुढे येऊन या प्रकल्पाला विरोध करून आपली ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
गोविंद शिरोडकर यांनी सांगितले की, लोकशाहीत लोकांचे राज्य असायला हवे; मात्र सध्याच्या सरकारची कार्यपद्धत पाहता हुकूमशाहीच चालवली जात असल्याचे दिसून येते. सरकारने प्रत्येक प्रकल्पात लोकांना विश्वासात घ्यायला हवे, पण प्रत्यक्षात लपवाछपवी करून कामे केली जात आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ करून होणारा तथाकथित विकास आम्हाला नको, असे त्यांनी ठणकावून सांगितले. सरकार बहुजन समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी संकेत भंडारी तसेच इतर ग्रामस्थांनीही विचार व्यक्त केले. अखेरीस, मिराबाग–सावर्डे येथे कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्याचे काम होऊ देणार नाही, अशी शपथ उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.
खासगी फॅक्टरीसाठी खटाटोप सुरू : प्रभुदेसाई
पंचवाडी व शिरोडा गावांना पाणी कमी पडत असल्याने हा बंधारा उभारला जात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र त्यात तथ्य नाही. हे पाणी प्रत्यक्षात शिरोडा येथील एका खासगी फॅक्टरीसाठी नेले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन्ही गावांची मिळून सुमारे २० हजार लोकसंख्या असून त्यांना २ एमएलडी पाणी पुरेसे आहे. फॅक्टरी सुरू झाल्यानंतरच पाणी कमी पडू लागल्याचा दावा अभिजित प्रभुदेसाई यांनी केला.