पिळर्ण येथे १५.८९ लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियनाला अटक

म्हापसा न्यायालयाने ठोठावली सात दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th February, 11:15 pm
पिळर्ण येथे १५.८९ लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियनाला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने पिळर्ण - बार्देश येथे छापा टाकून १५.८९ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी ओमेरिगो फ्रायडे (४२) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, पिळर्ण - बार्देश परिसरात एक नायजेरियन नागरिक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुप्तहेरांकडून एका पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर, उपनिरीक्षक अमीन नाईक, कॉ. नितीन गावस, कल्पेश तोरसकर, साई गोवेकर, दत्तात्रेय शेट वेर्णेकर व इतर पथकाने शुक्रवार ६ रोजी उत्तरारात्री १.१० ते ४.१० दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या गोवन पॅराडाइज कॉलनी जवळ असलेल्या ठिकाणी सापळा रचला. याच दरम्यान एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १५.८९ लाख रुपये किमतीचा ३१.७९४ ग्रॅम कोकेन सापडला. तो नंतर जप्त केला. तसेच तो वापरत असलेली दुचाकी जप्त केली.

निरीक्षक महेश गडेकर यांनी फ्रायडे याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

हेही वाचा