ओरबिन

प्रदूषण, शेती आणि जंगलांची होणारी विल्हेवाट यावर लेखक स्पष्टपणे लिहितो आणि काही प्रश्न वाचकांसमोर ठेवतो. विचार करण्याची जबाबदारी वाचकांवर सोपवणारी ‘ओरबिन’ ही कादंबरी म्हणूनच अधिक प्रभावी आणि स्मरणात राहणारी ठरते.

Story: बुकशेल्फ |
07th February, 10:10 pm
ओरबिन

ग्रामीण जीवनाच्या धुळकट वाटा, मायनिंगचे वास्तव आणि माणसांची स्वप्ने या सगळ्यांचे प्रतिबिंब ‘ओरबिन’मध्ये दिसते. काही कथा केवळ वाचल्या जात नाहीत, त्या वाचकाला स्वतःच्या आयुष्याशी भिडवतात ‘ओरबिन’ त्यापैकीच एक आहे.

प्रत्येक माणसाचे अनुभव वेगवेगळे असतात. आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक व्यक्तींना, अनेक पात्रांना भेटत जातो. त्यांच्या आयुष्याकडे पाहताना, त्यांच्या विचारांशी भिडताना आपल्यालाच आपले प्रतिबिंब दिसू लागते. लेखक गजानन देसाई यांची ‘ओरबिन’ ही कादंबरी वाचताना सतत असाच अनुभव येत राहतो. ही कादंबरी वाचकाला केवळ कथा वाचायला लावत नाही, तर सुपा, मुळगाव यांसारख्या गावांमधून, मायनिंगच्या परिसरातून, ट्रकांच्या धुळकट प्रवासातून माणसांच्या आयुष्यात शिरायला भाग पाडते. वाचक स्वतः त्या जगाचा एक भाग झाल्यासारखा अनुभव घेतो.

उध्वस्त होत चाललेल्या वाटाड्याचे आयुष्य लेखक जेव्हा अत्यंत प्रामाणिकपणे, हृदय ओतून शब्दांत मांडतो, तेव्हा त्याचे सुंदर साहित्यिक रूपांतर घडते. ‘ओरबिन’ ही अशी कादंबरी आहे की जिला वाचायला एकदा सुरुवात केली की पानामागून पानं भराभर उलटत जातात. प्रत्येक पात्र स्वतंत्रपणे उभे राहते आणि स्वतःची ओळख निर्माण करते. विशेषतः अनिलसारख्या पात्राबद्दल वाचताना वाचकाच्या मनात सहानुभूती, आपुलकी आणि विचारांची आंदोलने निर्माण होतात.

जात-धर्म यांचा गाजावाजा न करता, मायनिंगमुळे निर्माण झालेली आर्थिक विषमता, काही लोकांचे झपाट्याने श्रीमंत होणे आणि त्याच वेळी अनेक कुटुंबांचे उद्ध्वस्त होणे, हा विरोधाभास लेखकाने अत्यंत वास्तववादी पद्धतीने उलगडला आहे.

‘ओरबिन’ ही कादंबरी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचेही प्रभावी चित्रण करते. शिक्षणाच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यांचे दर्शन या कादंबरीत घडते. पहिल्या टप्प्यातील गुरुजी हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणारे, त्यांच्या भावनांशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतात. शाळा, वर्ग, विद्यार्थी आणि स्वतःची मुले या सगळ्यांशी त्यांची भावनिक गुंतवणूक दिसून येते.

मध्यभागी सुधारित शाळेतील स्त्री शिक्षिका विद्यार्थ्यांना “मोठे झाल्यावर काय बनायचे आहे?” असा प्रश्न विचारते. या टप्प्यात मुलांची उत्तरे अधिक वास्तववादी आहेत ‘ड्रायव्हर’ होण्याची इच्छा व्यक्त होते. मात्र शेवटच्या टप्प्यातील तिसऱ्या शिक्षिकेच्या वर्गात मुलांची उत्तरे बदललेली दिसतात. “डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे; पण ड्रायव्हर नको,” असे उत्तर म्हणजे गावाच्या बदलत्या सामाजिक-मानसिकतेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. हा बदल लेखकाने अतिशय  प्रभावीपणे मांडला आहे.

भूतकाळाचे लेखन, वर्तमानातील वास्तव आणि भविष्यातील सूचक चित्रण यांचा सुंदर समन्वय ‘ओरबिन’मध्ये आढळतो. ही कादंबरी व्यसनांचे दुष्परिणाम ठळकपणे मांडते. दारू, जुगार यांसारखी व्यसने माणसाला कशी अधोगतीकडे नेतात, माणसाचे आयुष्य कसे मुळापासून उपटून टाकतात, हे लेखक ठसठशीतपणे दाखवतो. चूक आहे हे माहीत असूनही माणूस त्या सवयींमधून बाहेर पडू शकत नाही. ही मानवी मानसिकता लेखकाने प्रामाणिकपणे उलगडली आहे.

लहान-लहान प्रसंगांतून मोठे अर्थ उलगडणे ही लेखकाची खासियत आहे. एका ठिकाणी तंबाखू खाणारा माणूस दिसतो, तर दुसऱ्या ठिकाणी तोच माणूस सिगारेट जीवाला किती घातक आहे, हे दुसऱ्याला समजावून सांगणारा

दिसतो.

कादंबरीत बोलीभाषेचा आणि कोकणी संवादांचा प्रभावी वापर आढळतो. मायनिंगसंबंधी तांत्रिक बाबी इतक्या स्पष्ट आणि नेमकेपणाने मांडलेल्या आहेत की लेखकाने सखोल अभ्यास आणि संशोधन करूनच हे लेखन केले आहे, याची जाणीव वाचकाला होते. त्यामुळे कादंबरी अधिक विश्वासार्ह बनते.

गुरुजी आणि अनिल यांचा शेवटाकडील संवाद विशेष भावनिक ठरतो. अनेक वर्षांनंतर गुरुजी गावात परत येतात; त्या क्षणी घडणारा संवाद वाचकाला क्षणभर थांबवतो, विचार करायला लावतो आणि अंतर्मुख करतो. या ठिकाणी वाचक भावनिक होतो, कारण हा संवाद केवळ दोन पात्रांचा नसून संपूर्ण पिढीच्या अनुभवांचा ठरतो. 

कादंबरीचा शेवटही वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा ठरतो. येथे सगळे संपत नाही, तर नव्या प्रश्नांची सुरुवात होते. लेखकाने केवळ मायनिंगचे प्रश्न मांडले नाहीत, तर त्या यंत्रवत जगातील माणसांच्या हरवत चाललेल्या संवेदनांनाही स्पर्श केला आहे. यंत्रांच्या घरघराटात निसर्गाचा कोमल आवाज कसा दबला जातो आणि प्रगतीच्या हव्यासपोटी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली मूल्ये कशी कोलमडतात, याचे दाहक चित्रण येथे घडते. ही कादंबरी वाचताना विकासाच्या नावाखाली आपण नक्की काय गमावत आहोत, याची बोचरी जाणीव पदोपदी होत राहते. प्रदूषण, शेती आणि जंगलांची होणारी विल्हेवाट यावर लेखक स्पष्टपणे लिहितो आणि काही प्रश्न वाचकांसमोर ठेवतो. विचार करण्याची जबाबदारी वाचकांवर सोपवणारी ‘ओरबिन’ ही कादंबरी म्हणूनच अधिक प्रभावी आणि स्मरणात राहणारी ठरते.


स्नेहा बाबी गावडे मळीक