
अधून मधून पोटात दुखत राहतं, सारखं काहीतरी खावंसं वाटतं, शीच्या जागी खाज येते, कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही... असे त्रास कश्यामुळे होतात माहित आहे? पोटातील जंतांमुळे. आतड्यांमध्ये छोटे छोटे कृमी म्हणजेच जंत तयार होतात आणि ते आपल्याला त्रास करतात. या जंतांचा नाश करण्यासाठी १० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस आपल्या पोटातील जंतांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
जंत काय करतात?
जंत शरीरात राहून आपण खाल्लेल्या अन्नातील पोषण स्वतः खातात. त्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत नाही. जंत खूप झाले तर अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नाही.
जंत का होतात?
जंत होण्याची मुख्य कारणे पुढील प्रमाणे:
• अस्वच्छ हाताने जेवणे
• न धुतलेली फळे-भाज्या खाणे
• जास्त गोड पदार्थ खाणे- मिठाई, खीर, चोकलेट, कोल्डड्रिंक्स, आईसक्रीम, केक, पेस्ट्री इ.
• बाहेरचे उघड्यावरचे अस्वच्छ, माश्या बसलेले अन्न खाणे
• नखे मोठी ठेवणे
• रोज - रोज पालेभाज्या खाणे
• चपाती किंवा बिस्कीट दूधात बुडवून खाणे
• बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
• दही, पनीर, काजूगर, गुळाचे पदार्थ,उडदाचे पदार्थ जसे की इडली, डोसा, मेदूवडा, दहीवडा अतिप्रमाणात खाणे.
• व्यायाम न करणे आणि दुपारी जेवल्यानंतर झोपणे.
जंतांपासून कसा बचाव करावा?
१) स्वच्छता राखा
जेवणापूर्वी आणि खेळून आल्यावर हात स्वच्छ धुवा.
नखे नियमित कापा आणि स्वच्छ ठेवा.
स्वच्छ पाणी प्या.
२) जंत कमी करणारे घरगुती पदार्थ
आपल्या स्वयंपाक घरातील अनेक घटक हे कृमिनाशक आहेत. फोडणीसाठी वापरले जाणारे हिंग, जिरे, लसूण, मोहरी, हळद इ.
सोलकढीत घातला जाणारा ओवा सुद्धा जंत कमी करण्यास उपयोगी आहे.
किरायतं - लहानपणी आमची आजी आम्हाला दर रविवारी किरायतं शिजवून त्याचा काढा सकाळी प्यायला द्यायची. किरायतं खूप कडू असतं पण पोटातील जंत नाहीसे करतं आणि पोट दुखी थांबवतं. ही वनस्पती वापरण्यासाठी नीट ओळखता मात्र यायला हवी.
शेवग्याच्या शेंगातील बिया सुद्धा जंत कमी करणाऱ्या आहेत.
३) रोज वेळेवर जेवावे. आणि भूक नसताना परत परत खाऊ नये.
४) ताजे आणि घरचे स्वच्छ अन्न खावे.
५) रोज व्यायाम करावा व मैदानी खेळ खेळावे.
वरील सगळे पदार्थ योग्य पद्धतीने आहारात वापरल्यास व जंत होण्याची कारणे टाळल्यास जंत होण्याचे प्रमाण खूप कमी होईल.
लक्षात ठेवा …
आपण स्वच्छ राहिलो, चांगला आहार घेतला आणि आरोग्य विषयक सवयी पाळल्या तर आपण जंतांपासून दूर राहू शकतो आणि निरोगी, ताकदवान बनू शकतो.
हे सगळे उपाय करून सुद्धा पोटात जंत झाले तर आपल्या वैद्यांना भेटून लगेच औषध सुरू करावे.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य