मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का?

मेनोपॉज नंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य नाही, मात्र वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने काही विशिष्ट परिस्थितीत ती शक्य होऊ शकते. प्रत्येक स्त्रीचा निर्णय वैयक्तिक, आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक घटकांवर आधारित असतो.

Story: डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
06th February, 10:50 pm
मेनोपॉज नंतर गर्भधारणा  होऊ शकते का?

रीचा आता पन्नाशीला टेकली होती. संसार सगळा व्यवस्थित चालला होता. फक्त मनात एक रिक्तता होती ती आईपणाची. सुरुवातीच्या काही वर्षात थोडाफार प्रयत्न करून मग नवरा बायकोनी जवळजवळ आशाच सोडून दिली होती. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न, "आता उशीर झाला", “देवाचीच इच्छा नसेल” असे म्हणत अपुरे राहिले होते.

एक दिवस मैत्रिणीशी बोलताना रीचा आपल्या मनातली सल व्यक्त करत होती. मैत्रिणीने शांतपणे तिचा हात धरला आणि म्हणाली: "रीचा, अजून हार मानायची गरज नाही. तू अजूनही आई होऊ शकतेस, फक्त मार्ग थोडा वेगळा असू शकतो. तु परत एकदा नव्याने प्रयत्न करून बघ.. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कठीण असले तरी, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि योग्य मार्गदर्शनाने घेऊन या वयातही मातृत्व अनुभवण्याची संधी मिळू शकतो.”

रीचा या शब्दांना विसंबून बघत होती. हळूहळू तिला समजले की, जीवनात काही संधी अजूनही बाकी आहेत व मनात एक नवी आशा निर्माण झाली. आपल्यालाही प्रश्न नक्कीच पडला असेल की खरंच मेनोपॉज जवळ आलेला असताना गर्भधारणा शक्य आहे का?

मेनोपॉजल महिलेला गर्भधारणा होऊ शकते का?

स्त्रीच्या आयुष्यात मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा एक महत्त्वाचा जैविक टप्पा मानला जातो. साधारणतः ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान स्त्रीला मेनोपॉज येतो. या काळात मासिक पाळी कायमची थांबते आणि प्रजननक्षमता नैसर्गिकरित्या संपुष्टात येते. परंतु अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न कायम असतो, मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी मेनोपॉज म्हणजे नेमके काय, शरीरात कोणते बदल होतात आणि आधुनिक वैद्यकीय पर्याय काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

मेनोपॉज म्हणजे सलग १२ महिने मासिक पाळी न येणे. या अवस्थेनंतर अंडाशय अंडी तयार करणे थांबवतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांचे प्रमाण खूप कमी होते. अंडोत्सर्जन होत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता संपते. अशा वेळी नैसर्गिक पद्धतीने मेनोपॉज नंतर गर्भधारणा होणे शक्य नसते. पण अनेकदा मेनोपॉजच्या आधीच्या टप्प्यात म्हणजेच पेरिमेनोपॉज दरम्यान जेव्हा मासिक पाळी अनियमित असते. कधी येते, कधी थांबते, तेव्हा काही महिलांना वाटते की मेनोपॉज झाला आहे, पण प्रत्यक्षात अंडोत्सर्जन कधीकधी होत असते. अशा वेळी गर्भधारणा होण्याची शक्यता फार कमी असली तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टर पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर किमान एक वर्ष गर्भनिरोधक वापरण्याचा सल्ला देतात.

मेनोपॉजची लक्षणे 

मेनोपॉजच्या वेळी जाणवणारी लक्षणे जशी 'बिन बुलाये मेहमान'. प्रत्येक स्त्री मध्ये हि लक्षणे वेग वेगळी जरी असली तरी तेव्हढीच त्रासदायक असतात. मासिक पाळी वगळता प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज यातली इतर लक्षणे सारखी असतात:

प्री मेनोपॉजची लक्षणे: अनियमित मासिक पाळी, दम नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात होणारा मासिक पाळी पाळीचा स्त्राव.

मेनोपॉजची लक्षणे: शरीरातून उष्णता निघणे, झोप न येणे , नैराश्य, वजन वाढणे,तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी, हृदयात धडधड वाढणे, युरिनल इन्फेकशन, केस गळणे किंवा कमकुवत होणे, चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर व पाठीवरचे केस वाढणे, दुखरे स्तन किंव्हा स्तनांचा आकार कमी होणे.

आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आज अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत ज्यामुळे काही महिलांना मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य होऊ शकते. यामधेही विविध प्रक्रिया असतात.

बीजदान (एग डोनेशन): या आयव्हीएफ प्रक्रियेत डोनर एग सोबत तुमच्या जोडीदाराच्या शुक्राणू च मिलन कृत्रिमरित्या केलं जात. ज्यांनंतर ते  विकसनशील भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.

भ्रूण दान (एम्ब्रियो डोनेशन): जेव्हा जोडपे आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे स्वतःची अंडी आणि शुक्राणू वापरून गर्भधारणा करू शकत नाहीत तेव्हा भ्रूण दानाचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेत, डोनर एग आणि स्पर्म कृत्रिमरित्या आयव्हीएफ द्वारे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते आणि निरोगी भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.

स्त्रीबीज गोठवणे (क्रायोप्रीसर्वेशन): आजकाल अंडी गोठवण्यामुळे स्त्रीला गर्भधारणेचा निर्णय पुढे सुद्धा ढकलता येतो, कारण ही प्रक्रिया अंडी संपण्याआधी जतन करण्याची संधी देते.

या प्रक्रियांमधे मासिक पाळी पुन्हा सुरू करण्यासाठी दोन ते तीन महिने हार्मोनल गोळ्या दिल्या जातात.

शेवटी असे म्हणता येईल की मेनोपॉज नंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य नाही, मात्र वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने काही विशिष्ट परिस्थितीत ती शक्य होऊ शकते. प्रत्येक स्त्रीचा निर्णय वैयक्तिक, आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक घटकांवर आधारित असतो. योग्य माहिती, वैद्यकीय मार्गदर्शन आणि स्वतःच्या आरोग्याची जाणीव ठेवूनच असा निर्णय घ्यावा.

...वय ही मर्यादा नाही, मेनोपॉझ म्हणजे शेवट नाही!


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर