नवजात बाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील काळजी

हा पालकांसाठी खूप महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात बाळ हळूहळू बाहेरील जगाशी जुळवून घेऊ लागते आणि काही महत्त्वाचे बदल दिसून येतात.

Story: अाईपण भारी देवा ! |
06th February, 10:47 pm
नवजात बाळाच्या  तिसऱ्या आठवड्यातील  काळजी

तिसऱ्या आठवड्यात बाळाचे वजन वाढायला सुरुवात होते. जन्मानंतर पहिल्या ७–१० दिवसांत थोडे वजन कमी होणे नैसर्गिक असते, पण आता बाळाने दररोज साधारण २०–३० ग्रॅम वजन वाढवणे अपेक्षित असते. वजन वाढत नसेल, बाळ सतत झोपाळू वाटत असेल किंवा दूध नीट पीत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

या आठवड्यापर्यंत कावीळ (जॉन्डिस) जवळजवळ कमी झाली पाहिजे. डोळ्यांचा पांढरा भाग, चेहरा किंवा शरीर खूप पिवळे दिसत असेल आणि ती कावीळ वाढताना जाणवत असेल, तर ती दुर्लक्षित करू नये. दीर्घकाळ राहणारी कावीळ बाळाच्या यकृताशी (लिव्हर) संबंधित समस्या, रक्तगट विसंगती किंवा इतर आजारांचे लक्षण असू शकते. अशा वेळी रक्ततपासणी व डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो.

स्तनपान व झोपेचा क्रम (सायकल) या काळात थोडाफार स्थिर होत जातो. बाळ साधारण २–३ तासांनी दूध मागते आणि दिवस-रात्र मिळून १६–१८ तास झोपते. रात्री वारंवार उठणे हे अगदी सामान्य आहे. आईने दरवेळी बाळाला नीट पाजणे, ढेकर देणे आणि बाळ पूर्णपणे दूध पिते आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. फक्त स्तनपान हेच बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे.

नाळ (नाभी) या आठवड्यापर्यंत पूर्णपणे सुकलेली व बरी झालेली असावी. नाभीभोवती लालसरपणा, सूज, पू, दुर्गंधी किंवा रक्तस्त्राव दिसत असल्यास तो संसर्गाचा संकेत असू शकतो. नाभी नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावी; घरगुती उपाय टाळावेत.

या आठवड्यात बाळ थोडे जास्त जागे राहू लागते, आवाजाकडे लक्ष देते आणि चेहऱ्याकडे पाहून प्रतिक्रिया देते. मात्र बाळाची हालचाल अचानक कमी होणे, दूध न पिणे, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास किंवा सतत रडणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशावेळी तात्काळ डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.

तिसरा आठवडा म्हणजे बाळाच्या वाढीचा आणि पालकांच्या आत्मविश्वासाचा एक महत्त्वाचा टप्पा. योग्य निरीक्षण, प्रेमळ काळजी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे बाळ निरोगी वाढते.


डॉ. पूनम संभाजी

बालरोगतज्ज्ञ