चिनी तरुणाने कचऱ्यातून मिळवले २६ लाखांचे सोने !

Story: विश्वरंग- चीन |
06th February, 10:36 pm
चिनी तरुणाने कचऱ्यातून मिळवले २६ लाखांचे सोने !

आपल्याकडे सिम कार्ड जुने झाले किंवा खराब झाले की आपण ते सहज फेकून देतो. पण, चीनमधील एका तरुणाने याच फेकून दिलेल्या कचऱ्यातून तब्बल २६ लाख रुपयांचे सोने तयार करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) व्यवस्थापनाचा हा अनोखा आणि तितकाच धोकादायक प्रयोग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील हुइझोउ शहरात राहणाऱ्या किआओ नावाच्या व्यक्तीने हा पराक्रम केला आहे. २० जानेवारी रोजी त्याने या प्रक्रियेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. किआओने दिलेल्या माहितीनुसार, त्याने केवळ सिम कार्डच नव्हे, तर खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि इतर ई-वेस्ट गोळा केला होता. सुमारे २ टन ई-वेस्टवर प्रक्रिया केल्यानंतर त्याला १९१.७३ ग्रॅम शुद्ध सोने मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत सुमारे २ लाख युआन (भारतीय चलनानुसार अंदाजे २६,५९,२४८ रुपये) इतकी आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये किआओने ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने दाखवली आहे. प्रथम हजारो सिम कार्ड्स रसायनांनी भरलेल्या मोठ्या ड्रममध्ये टाकली जातात. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया केलेले अवशेष विशिष्ट तापमानावर जाळले जातात. अनेक तासांच्या मेहनतीनंतर अशुद्धी वेगळी करून शुद्ध सोन्याचा गोळा तयार केला जातो.

तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, सिम कार्ड आणि बँक कार्डमधील चिपवर सोन्याचा अतिशय पातळ थर (गोल्ड प्लाटिंग) चढवलेला असतो. सोने हे उत्तम विद्युत वाहक असून त्याला गंज लागत नाही, त्यामुळे चिप दीर्घकाळ टिकावी यासाठी ०.००१ ग्रॅमपर्यंत सोन्याचा वापर केला जातो. या व्हिडिओनंतर ऑनलाइन मार्केटमध्ये जुनी सिम कार्ड खरेदी करण्याची लाट आली असली, तरी किआओने लोकांना गंभीर इशारा दिला आहे.

ही प्रक्रिया अत्यंत जटिल असून, त्यात वापरली जाणारी रसायने आरोग्यासाठी घातक आहेत. यामुळे विषारी वायू आणि रसायनांमुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात. रासायनिक सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते. अनेक देशांमध्ये परवान्याशिवाय अशा प्रकारे धातू निष्कर्षण करणे बेकायदेशीर ठरू शकते. केवळ व्यावसायिक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच अशा प्रक्रिया करणे शक्य आहे, असेही त्याने आवर्जून स्पष्ट केले आहे. किआओच्या या प्रयोगाने ई-वेस्टकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला असला तरी, सावधानता बाळगणे अधिक गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

- सुदेश दळवी