शिक्षण व्यवस्थेत हस्तक्षेपाची वेळ !

बिट्ससारखी संस्था जरी बाहेरची असली, तरीही गोव्यात होणाऱ्या या घटनांमुळे गोव्यातील शिक्षण व्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळेच राज्य प्रशासनाने या संस्थेमध्ये हस्तक्षेप करून नेमक्या इतक्या आत्महत्या कशा होतात, ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा

Story: संपादकीय |
04th February, 11:19 pm
शिक्षण व्यवस्थेत हस्तक्षेपाची वेळ !

गोव्यातील बिट्स पिलानीचा कॅम्पस पुन्हा एकदा हादरला आहे. या कॅम्पसमध्ये डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या काळात बिट्सच्या सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ही बाब आता सखोल संशोधनाचा विषय बनली आहे. तिथे वारंवार विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत आणि त्याच शिक्षण संस्थेत हे का घडत आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. देशातील इतर संस्थांमध्येही अशा घटनांची नोंद झाली आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. जर इतर विद्यार्थ्यांचा समावेश केला, तर ही संख्या एका संशोधनानुसार ४०० च्या पार जाते. हे आकडेच सुन्न करणारे आहेत. विद्यार्थी तरुण वयात एवढा टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवतात, या गोष्टीचा पालक आणि शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन यांनी अभ्यास करण्याची खरी गरज आहे. पालकांकडून मुलांवर कोणीतरी बनण्यासाठी असलेला दबाव एका बाजूने मुलांना सतावत असतो, तर दुसऱ्या बाजूने इच्छेविरुद्ध घेतलेल्या अभ्यासक्रमातील अडथळे सतावत असतात. शिक्षण संस्थांकडून आकारली जाणारी फी हा आणखी एक मोठा विषय असतो. उच्च शिक्षणावेळी मनाविरुद्ध शिकावे लागत असलेले विषय, शुल्क, सोबतच्या किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांकडून होणारी सतावणूक, प्रेमभंग, व्यसनाधीन होणे अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून काही विद्यार्थी एकाच वेळी अनेक समस्यांचा सामना करत असतात. अशावेळी त्याला समजून घेण्यासाठी आणि त्याला योग्य तो निर्णय घेण्याची मुभा मिळत नाही. यातूनच अनेकदा विद्यार्थी टोकाची भूमिका घेऊन जीवन संपवतात.

कितीतरी हुशार विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थांमध्ये होत असलेल्या अशा गोष्टींमुळे जीव गमावून बसतात. गोव्यात अनेकदा शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ऐकू येतात. गोव्यातील बिट्स पिलानी या उच्च शिक्षण संस्थेत तर गेल्या काही वर्षांत सहा विद्यार्थ्यांनी जीव गमावला. एका घटनेनंतरही ही शिक्षण संस्था जागी झालेली नाही. सलगपणे सहाजणांनी आत्महत्या केल्यामुळे या शिक्षण संस्थेच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त होत आहे. अनेकदा पालकांनी या शिक्षण संस्थेवर बेजबाबदारपणाचे आरोप केले आहेत. या संस्थेत होत असलेल्या या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण त्याचे सोयरसुतक या संस्थेला आहे, असे दिसत नाही. कारण आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन झाले नसल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचेच हे उदाहरण आहे.

देशातील मोठमोठ्या शिक्षण संस्था ज्यात आयआयटी, एनआयटी, केंद्रीय विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असल्याचे गेल्या काही वर्षांतील अहवाल सांगतात. आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी कानपूरच्या कॅम्पसमध्येच २००५ ते २०२५ या कालावधीत शंभरपेक्षा जास्त आत्महत्या झाल्याचे म्हटले आहे. एनआयटींमध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे २५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. केंद्रीय विद्यापीठांमध्ये पाच वर्षांत पंचवीसच्या आसपास आत्महत्या झाल्या आहेत. देशातील एकूणच उच्च शिक्षण व्यवस्थेतील हे चित्र वेदनादायी आहे. माणूस तयार करण्यापेक्षा कोणाच्या तरी इच्छेनुसार आपण यंत्रे तयार करायचा प्रयत्न करतो आणि त्यात माणसे गमावून बसतो, अशी एकूण स्थिती आहे. बिट्स पिलानीसारख्या संस्थेत दोन वर्षांतच सहा आत्महत्या झाल्या, यावरून उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या समुपदेशनापासून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. बिट्ससारखी संस्था जरी बाहेरची असली, तरीही गोव्यात होणाऱ्या या घटनांमुळे गोव्यातील शिक्षण व्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळेच राज्य प्रशासनाने या संस्थेमध्ये हस्तक्षेप करून नेमक्या इतक्या आत्महत्या कशा होतात, ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी शिक्षण संस्थेवर दबाव आणायला हवा. या संस्था जरी नावाने आणि दिसायला मोठ्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ती खबरदारी घेतात का, ते पाहणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने वारंवार घटना घडत आहेत ते पाहता, या मोठ्या संस्था विद्यार्थ्यांचे हित जपण्यात अपयशी ठरल्या आहेत, असेच म्हणावे लागेल.