मडगाव पालिकेत ध्वजारोहणाला दांडी मारणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई शक्य

पालिकेची उद्या सर्वसाधारण सभा : कचरा व्यवस्थापनावरही होणार निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
मडगाव पालिकेत ध्वजारोहणाला दांडी मारणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई शक्य

‍मडगाव : मडगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. पालिका सभागृहात आयोजित केली आहे. या बैठकीत सोनसडो येथील जागा संपादनाबाबत राय चर्चला जादा नुकसान भरपाई देण्यासह ध्वजारोहण समारंभाला अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय कचरा टर्मिनेटर मशीन बसवणे, नाईट सॉईल टँकर खरेदीसह कम्युनिटी हॉल उभारणीवर चर्चा होणार आहे.
मडगाव पालिकेच्या या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित आणि प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. यातील सोनसडो येथील सर्व्हे क्रमांक १९६/१ मधील संपादित जमिनीसाठी फाब्रिका राय चर्चला जादा नुकसानभरपाई देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेतला जाईल. याशिवाय शहरातील कचरा समस्या हाताळण्यासाठी सीएसआर निधीतून एक टन क्षमतेचे कचरा टर्मिनेटर मशीन बसवण्यासाठी संमती पत्र देण्याबाबत चर्चा होईल. तसेच जुन्या तीन कचरा कॉम्पॅक्टर्समध्ये सुधारणा करणे आणि नाईट सॉईल टँकर खरेदीसाठी अतिरिक्त निधीचा वापर करणे, या विषयांचाही अजेंड्यात समावेश आहे.
सभेतील इतर महत्त्वाचे विषय
* आयटीसीजीएलमार्फत शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत निर्णय होईल.
* आमदार निधीतून मालभाट येथे कम्युनिटी हॉल बांधणे आणि पालिका बागेतील गणपती मंडप व कामगार विश्रामगृहाची पुनर्बांधणी करणे.
* मागील सभांच्या इतिवृत्ताला अधिकृत मंजुरी दिली जाईल.

हेही वाचा