ज्ञान-कर्पूर-दीपाचा मशालधारक

माझ्या एकाशिवाय बाकी सगळे असार आहे, असे ज्यांची बुद्धी सर्वतोपरी मानते, अशा त्या शुद्धज्ञानी भक्तांपुढे मीच स्वतः मशालधारक होऊन ज्ञान-कर्पूराचा दीप पाजळत वाट दाखवत चालू लागतो.

Story: विचारचक्र |
01st February, 11:56 pm
ज्ञान-कर्पूर-दीपाचा मशालधारक

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।१०।।

सरळ अर्थ : त्या निरंतर माझ्या ध्यानात मग्न झालेल्या व प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी असा तो तत्वज्ञानरुपी योग देतो की ज्याच्या योगाने ते मलाच येऊन मिळतात.

विस्तृत विवेचन : असे जे आधीच प्रेमरूप होऊन भक्तिरसाने माझे सुख आपलेसे करून घेत असतात, त्यांची सायुज्याकडे नि:शंक वाटचाल चालू असते. तो त्यांचा पार्था जो मार्ग आहे, त्याच्या तुलनेत स्वर्ग-मोक्ष-मार्ग हे आडमार्ग आहेत. जे माझ्यावर खरे प्रेम करत आहेत, तर मीही त्यांना तेच परत केले पाहिजे ना? त्या खऱ्या प्रेमापलिकडे त्याच्यापेक्षा चांगले असे दुसरे काही असू शकते का? खरेतर त्यांनीच आम्हाला स्वाधीन करून आमच्याकडून ते घेतले आहे! म्हणून ते न चुकता यथासांग व्यवस्थित त्यांना देऊ करणे, हे माझे कर्तव्य आहे.

लाडके बाळ खेळायला लागले की, माऊली त्याच्या मागे धावते. आपल्या प्रेमाची पांखर (म्हणजे पंखांची साऊली, संरक्षण) घालून ती निरंतर त्याचे रक्षण करते आणि बाळ जे जे काही मागेल (ती अगदी सोन्याची वस्तू असली तरी) ते ते ती त्याला अत्यंत कौतुकाने करून देते. तसे अर्जुना, त्या माझ्या भक्तांचा तो प्रेम-भक्तिरसपूर्ण मार्ग मी चांगला स्वच्छ करून ठेवतो आणि त्यामुळेच पार्था, माझ्या भक्तांना सायुज्यतेपर्यंत पोहोचणे सहज सुखकर होते. त्यांच्या प्रेम-भक्तीचा परिपोष करावा, तिची वाढ करून ती पुष्ट करावी हे माझे आवडीचे काम आहे. माझ्या भक्तांना माझी आवड असणे या भावनेची गोडी मला आवडते.

अर्जुना, तुला ऐकून आश्चर्य वाटेल की आमच्या घरी प्रेमळ भक्तांची तशी खरी दुर्मीळताच आहे! ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना मोक्ष दिला, ज्यांना काम पाहिजे त्यांना काम दिला, स्वर्गाची इच्छा करणाऱ्यांना स्वर्गप्राप्ती करून दिली. एवढेच काय तर माझे शरीरही देऊन टाकले लक्ष्मीला! पण अर्जुना, मुक्तीहूनही नि:शंक आगळे वेगळे असे जे साजूक प्रेम-सुख ते मी फक्त माझ्या प्रेमळ भक्तांसाठीच राखून ठेवलेले आहे.

अशारीतीने अर्जुना, मी माझे सर्वस्व देऊन टाकून माझ्या प्रेमळ भक्तांना जवळ करतो. काय सांगू तुला या गोष्टी, ज्या वाणीत सामावण्यासारख्या नाहीत!

तेषामेवाsनुकम्पार्थमहमज्ञानजं तम: ।

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ।।११।।

सरळ अर्थ : आणि हे अर्जुना, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी स्वतः त्यांच्या अंत:करणात ऐक्यभावाने स्थित असलेला अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरुपी दीपकद्वारा नष्ट करतो.

विस्तृत विवेचन : म्हणून, ज्यांनी माझा आत्म्याचा भावच आपल्या जगण्याचे सर्वस्व ठरवले आहे, माझ्या एकाशिवाय बाकी सगळे असार आहे असे ज्यांची बुद्धी सर्वतोपरि मानते, अशा त्या शुद्धज्ञानी भक्तांपुढे मीच स्वतः मशालधारक होऊन ज्ञान-कर्पूराचा दीप पाजळत वाट दाखवत चालू लागतो. जेव्हा अज्ञानाचा दाट अंधार माझ्या भक्तांपुढे दाटायला लागतो, तेव्हा नेहमी मीच स्वतः तो दूर करत त्यांच्यासाठी ज्ञानोदय करतो. त्यायोगे मद्भक्तांच्या ज्ञानचक्षूंना अत्यंत प्रिय असलेल्या माझे भगवंत नारायणाचे दर्शन होते.

हे ऐकल्यावर अर्जुन सद्गदित होऊन म्हणाला, की देवा, हे तुझे बोल ऐकून माझे मन शांत झाले आहे. माझ्या संसाराचा सगळा मळ झाडून तू मला निर्मळ केले आहेस. माझे जन्म - मरणाचे सायास आता संपले आहेत. आता यापुढे मला गर्भवास प्राप्त होणार नाही. हे दयासिंधू कृपाळा, आज इथे मी माझे स्वतःचे जनन माझ्याच डोळ्यांनी बघितले. आत्म-ज्ञान-रूपाने हे समग्र जीवन जणु माझ्याच स्वाधीन झाले आहे, असे मला आता वाटत आहे. दस्तुरखुद्द तुमच्या मुखकमलातून मला ज्ञानोपदेश व्हावा ही तुमची माझ्यावर विशेष कृपा होय!

देवा नारायणा, भक्ताच्या खुणा समजावून देऊन आज तुम्ही मला धन्य केले आहे. आज हा भाग्याचा सुदिन उजाडला आणि माझे जीवन सफल झाले. तुमच्या वचन-तेजाच्या योगाने माझ्यात जो अंतर्बाह्य काळोख होता तो सगळा नाहीसा झाला. 

अर्थात् म्हणूनच हे केशवा, आज खऱ्या अर्थानं तुझं स्वरूप बघायला मिळाले!

अर्जुन उवाच

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ।।१२।।

आहुस्त्वामृषय: सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।

असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे ।।१३।।

सरळ अर्थ : अर्जुन म्हणाला, हे भगवन् आपण परम ब्रह्म आणि परम धाम तसेच परम पवित्र आहात, कारण आपणाला सर्व ऋषिमंडळी सनातन दिव्य पुरुष एवं देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. त्याचप्रमाणे देवऋषी नारद, असित व देवलऋषी तसेच व्यास महर्षी व स्वतः आपणही मला सांगत आहात.

विस्तृत विवेचन : त्यावर अर्जुन म्हणाला, देवा भगवंता महाभूतांचे जे विश्रांतीचे स्थान आहे, ते तूच आहेस. तूच निर्वाण आहेस. तूच परब्रह्म आहेस. परम पावन असा जगाचा नाथ तूच आहेस. तिन्ही देवांचे आराध्य दैवतही तूच आहेस. चोवीस तत्वांच्या पलिकडे जे पंचवीसावे दिव्य तत्व आहे तेही तूच आहेस.

सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती (पर्याय शब्द - प्रधान, अव्यक्त, माया, प्रसवधर्मिणी, गुणक्षोभिणी इत्यादि), महत् किंवा बुद्धी (पर्याय शब्द -  मती, ज्ञान, ख्याती, आसुरी इत्यादि), अहंकार (पर्याय शब्द -  अभिमान, तेजस् इत्यादि), पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, पाच तन्मात्रा (मिसळ न होता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गुणांची निरनिराळी अतिसूक्ष्म मूळ स्वरूपे), आणि पांच महाभूते, (पंचविसावे तत्व 'पुरुष'  'ज्ञ'  'द्रष्टा').

ज्याला सांख्य-जन पुरुष असे संबोधतात तोही तूच आहेस. प्रकृतीहून वेगळा असलेला असा जो अजन्मा तोही तूच आहेस, हे आता आम्ही ओळखले आहे. काळरूप यंत्र ही तूच आहेस आणि त्याचा सूत्रधारही तूच आहेस. आणि जीवन म्हणून जे काही आहे, त्याला एकमेव आधारही तूच आहेस आणि या सगळ्या दृश्यादृश्य ब्रह्माण्डाचे तूच अधिष्ठान आहेस, हे मला आता स्पष्ट कळून आले आहे.

देवा कृष्णा, तुझा आणखीही एक थोरपणा आता मला समजून येतोय. हे मी पूर्वीच ऐकले होते. महर्षींनी वर्णन केले होते. पण तुझी आत्ता कृपा झाली म्हणून त्याची प्रचिती मला आत्ता आली! देवर्षी नारद आमच्यापाशी बसून असेच तुझे अखंड गुणगान करायचे. त्यांच्या गायन-सुखात मी तल्लीन व्हायचो खरा, पण त्यांच्या त्या तुझ्या गुण-गायनातले रहस्य तेव्हा मला कळत नव्हते. अहो गोविंदराव, आंधळ्यांच्या गावी स्वतः सूर्य जरी प्रकटला, तरी त्यांना फार फार तर उन्हाचीच सोय होईल, पण प्रकाश दिसेल काय सूर्याचा? देवर्षी अध्यात्माचे गीत राग-रागिणींमध्ये आळवायचे. त्या गीत-माधुरीचे सुख वरवर मला कळायचे, आवडायचे. पण त्यातले दुसरे काहीही कळत नव्हते! असित देवल महर्षी सुद्धा तेच तसेच सांगायचे. पण त्यावेळी तिथे आमची मती विषयांच्या विषाने व्याप्त झाली होती!

(क्रमश:)


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३