इतक्या वर्षांनंतर आजही अनेक ठिकाणी जातीच्या नावानेच वस्त्या आहेत. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठीच शालेय स्तरावर समतेचे धडे देण्याची गरज आहे. ही समता फक्त प्रार्थनेपुरती न राहता, ती प्रत्यक्ष जीवनात कशी आणता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

जाती-पातीच्या भिंती पाडून समतेचे राज्य यावे यासाठी सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा, हेही नसे थोडके. सामाजिक
बांधिलकीच दुर्मिळ होत चालली असताना, कुठेतरी भेदभावाच्या भिंती पाडण्याचा प्रयत्न होत आहे. किमान हा भेदभाव पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, हेच भविष्याची आशा निर्माण करणारे चित्र आहे. सामाजिक जाणिवेची आठवण ठेवून प्रत्येकाने तसे प्रयत्न केले तर निश्चितच समाजातून एकोपा जपणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. डिचोली नगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आपल्या परिसरातील दोन वाड्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे डिचोली नगरपालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा स्तुत्य निर्णय घेणाऱ्या पालिकेच्या सर्व नगरसेवकांचे आणि मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला हवे. किमान, ही एक सुरुवात डिचोली पालिकेने केली आहे. अशाच प्रकारचे निर्णय घेऊन समाजातील भेदभाव पुसून टाकण्याचा प्रयत्न इतरांनीही केला, तर समाजाला निश्चितच सकारात्मक दिशेने नेता येईल.
डिचोली नगरपालिकेने आपल्या परिसरातील जातीवाचक असलेली वाड्यांची नावे बदलली. एका वाड्याचे नाव ‘धनगरवाडा’ होते, तर दुसऱ्या वाड्याचे नाव ‘हरिजनवाडा’ होते. त्यांचे अनुक्रमे ‘कुळणवाडा’ आणि ‘राष्ट्रोळीनगर’ असे नामकरण करण्याचा हा निर्णय पालिकेने घेतला आहे. मानवाधिकार आयोगाच्या शिफारशी आणि पालिका प्रशासनाच्या अधिसूचनेप्रमाणे हे नामकरण करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या निर्णयाप्रमाणे या वाड्यांवर नव्या नावांचे फलक लावण्यासह सरकारी दस्तावेजातून ही नावे बदलण्याची प्रक्रियाही होणार आहे. डिचोलीतून ही बदलाची सुरुवात झाली आहे. गोव्यात सर्वत्र अशा प्रकारची जाती किंवा समाजाला संबोधून असलेली नावे बदलण्याची गरज आहे. एखाद्या उच्च समाजाच्या नावानेही असलेली नावे बदलण्याची गरज आहे. कारण एखादा परिसर हा एखाद्या जातीच्या, समाजाच्या, आडनावाच्या, धर्माच्या नावाने ओळखला जाऊ नये. माणुसकी जपण्यासाठी प्रयत्न झाले तरच समता रुजणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावरच मुलांना समतेचे धडे देणे गरजेचे आहे. हा बदल झाला तरच भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
डिचोलीत फक्त दोन वाड्यांची नावे बदलली. गोव्याच्या कानाकोपऱ्यात अशी जुनी जातीवाचक नावे आजही आहेत. आणि आपल्यापैकी बरेच लोक ती वारंवार उच्चारतात. डिचोलीतून ज्या कामाची सुरुवात झाली आहे, ते काम राज्यभर नगरपालिका आणि पंचायतींनी राबवायला हवे. किंबहुना सरकारच्या पंचायत आणि पालिका प्रशासन या दोन्ही खात्यांनी सर्वांना लेखी आदेश देऊन अशी जातीवाचक नावे असतील तर ती बदलण्याच्या सूचना कराव्यात. गोव्यात तसा मोठ्या प्रमाणात भेदभाव दिसत नाही. पण तरीही काहीजण मुद्दामहून लोकांची जात जाणून घेण्यासाठी, ‘तू अमुक म्हणजे अमुक ठिकाणचा का?’ किंवा तो आपल्या जातीतला, आपल्यापेक्षा खालच्या जातीतला ते जाणून घेण्यासाठी, ‘तू अमुक म्हणजे तमुकचा कोणी लागतो का? अमुक देवी तुमची कुलदेवता? तुमचा कुलदेव अमुक का?’ असे विविध प्रकारचे प्रश्न विचारून समोरच्याची जात हेरतात. अमुक आडनाव अमुक जातीतही आहे, असे म्हणून समोरचा त्याच जातीचा का, ते तपासण्यासाठी काहींची घालमेल सुरू असते. जात, धर्म या गोष्टींपेक्षा आपण माणूस म्हणून प्रत्येकाला वागवण्याचा प्रयत्न केला, तर बदल आपल्यापासूनच होईल. आजही एखाद्या नेत्याला मंदिरात प्रवेश दिला नाही किंवा त्याने प्रवेश केला म्हणून शुद्धीकरण करणारे लोक आपल्या देशात आहेत. आपल्या आसपासही अशा प्रकारचे लोक असतील. त्यामुळेच डिचोली नगरपालिकेने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहेच. पण ती आपली जबाबदारीही आहे, हे प्रत्येकाने ओळखायला हवे. माणसाकडे माणूस म्हणून पाहताना अडल्या-नडलेल्यांना मदत करण्यातच खरा धर्म आहे. स्वातंत्र्य आणि संविधानानंतरही देशात जाती-पातीच्या भिंती ढासळल्या नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. इतक्या वर्षांनंतर आजही अनेक ठिकाणी जातीच्या नावानेच वस्त्या आहेत. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठीच शालेय स्तरावर समतेचे धडे देण्याची गरज आहे. ही समता फक्त प्रार्थनेपुरती न राहता, ती प्रत्यक्ष जीवनात कशी आणता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. डिचोली नगरपालिकेचा आदर्श घेऊन इतरांनीही असा उपक्रम सुरू करायला हवा.