
भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत भारताने दाखवलेली सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि आक्रमक कामगिरी पाहता संघाची ही मजल पूर्णपणे अपेक्षित ठरली आहे.
भारतीय युवा संघाने स्पर्धेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने केली. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयम आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दाखवली.
दुसऱ्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी बांगलादेश होता. पावसामुळे पुन्हा एकदा सामना प्रभावित झाला आणि दुसऱ्या डावात २९ षटकांपर्यंत कमी करण्यात आली होती. भारताने हा सामना १८ धावांनी जिंकला.
तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. येथेही पावसाने खोडा घातला. मात्र भारतीय संघाने परिस्थितीचा अचूक अंदाज घेत आक्रमक खेळ केला आणि ७ गडी राखून सामना आपल्या नावावर केला.
चौथ्या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा सामना केला आणि येथे भारतीय संघाने स्पर्धेतील सर्वात जबरदस्त कामगिरी केली. भारताने हा सामना तब्बल २०४ धावांनी जिंकला. स्पर्धेतील सर्वात चर्चेचा सामना म्हणजे उपउपांत्य फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान लढत. सर्व विभागांत सरस ठरत भारताने पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले.
आता भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तान संघाशी होणार आहे. हा उपांत्य सामना हरारे स्पोर्ट्स क्लब, झिम्बाब्वे येथे खेळवला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना बुलावायो येथे होणार असून, क्रिकेटप्रेमींना एक रोमहर्षक लढत पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ ६ फेब्रुवारी रोजी हरारे येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने यापूर्वी अनेकदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून आपली परंपरा सिद्ध केली आहे. यंदाही हीच परंपरा कायम ठेवण्याचा संघाचा निर्धार दिसून येत आहे.
एकूणच पाहता, भारतीय १९ वर्षांखालील संघाची ही मोहीम अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. प्रत्येक सामन्यातून संघ अधिक मजबूत होत गेला असून, उपांत्य फेरीत पोहोचत त्यांनी विजेतेपदाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष भारतीय युवा संघाकडे लागले असून, हे युवा शिलेदार पुन्हा एकदा भारताला जागतिक विजेतेपद मिळवून देतील, अशीच अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे.
- प्रवीण साठे