‘आयसीसी’च्या निर्णयाकडे लक्ष : ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत बीसीसीआय

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खडे बोल सुनावले आहेत. या प्रकरणावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून, भारताने सध्या ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजीव शुक्ला म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणात ज्या खेळभावनेचा उल्लेख केला आहे, त्याच्याशी बीसीसीआय पूर्णपणे सहमत आहे. आयसीसी यावर काय अंतिम निर्णय घेते, त्यानंतरच भारत आपली अधिकृत भूमिका मांडेल. आयसीसीच्या बैठकीनंतरच बीसीसीआय पुढील पाऊल उचलणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
निवडक बहिष्कार सहन केला जाणार नाही
पाकिस्तानचा हा निर्णय बांगलादेशच्या समर्थनार्थ असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा कारणास्तव भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने आधीच स्पर्धेतून बाहेर काढले आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की, जागतिक स्पर्धांमध्ये कोणताही संघ अशा प्रकारे विशिष्ट संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. ही भूमिका जागतिक स्पर्धेच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे.
आयसीसीचे पाकिस्तानला कडक संकेत
पाकिस्तान सरकारच्या सोशल मीडिया पोस्टनंतर आयसीसीने पीसीबीला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर घोषणा केली असली, तरी क्रिकेट बोर्डाकडून अजूनही अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे. प्रत्येक सहभागी संघाला ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सामने खेळावे लागतील. वेळापत्रकाचे उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी ताकीद आयसीसीने दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेटचे भवितव्य टांगणीला
जर पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर त्यांना मोठ्या आर्थिक दंडासह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निलंबनाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जागतिक स्तरावर एकाकी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.