वर्ल्ड लिजेंड्स प्रो टी-२० लीग : पुजाराचे शतक १ धावाने हुकले

पणजी : वर्ल्ड लिजेंड्स प्रो टी-२० लीग २०२६ अंतर्गत वेर्णा येथील १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात दुबई रॉयल्स संघाने गुरुग्राम थंडर्स संघावर अवघ्या ३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दुबई रॉयल्सने २० षटकांत ५ बाद २०० धावा असा डोंगर उभा केला होता.
दुबईकडून समीत पटेल याने नाबाद ६५ धावा (३२ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) करत संघाच्या डावाला आकार दिला. त्याला पर्वेझ रसूल याने नाबाद २९ धावा (१७ चेंडू) करत चांगली साथ दिली. अंबाती रायुडू याने ४५ धावा (२७ चेंडू) केल्या. सुरुवातीला मात्र दुबईची अवस्था डळमळीत झाली होती. कर्णधार शिखर धवन (५), पीटर ट्रेगो (१) आणि किर्क एडवर्ड्स (२९) लवकर बाद झाले. गुरुग्रामकडून स्टुअर्ट ब्रॉड याने २ बळी, तर रेयाड एम्रिट, सौरिन ठाकूर आणि मलिंदा पुष्पकुमार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुरुग्राम थंडर्सने २० षटकांत ५ बाद १९७ धावा केल्या आणि सामना अवघ्या ३ धावांनी हातातून गमावला. गुरुग्रामकडून चेतेश्वर पुजारा याने अफलातून फलंदाजी करत ९९ धावा (६० चेंडू, १४ चौकार, १ षटकार) केल्या. त्याचे शतक अवघ्या १ धावाने हुकले. त्याला कर्णधार थिसारा परेरा याने नाबाद ५६ धावा (२७ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) करत चांगली साथ दिली. कोलिन डी ग्रँडहोम याने २२ धावा केल्या. मात्र, शेवटच्या षटकांत आवश्यक धावा न जमवता आल्याने गुरुग्रामला पराभव स्वीकारावा लागला. दुबईकडून गोलंदाजीत पियुष चावला याने उत्कृष्ट मारा करत ४ षटकांत ३५ धावा देऊन ३ बळी घेतले. पर्वेझ रसूल आणि समीत पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
अखेरच्या षटकाचा थरार
शेवटच्या षटकात गुरुग्रामला विजयासाठी १० धावांची गरज होती. फलंदाजीला होते कर्णधार थिसारा परेरा (नाबाद ५६) आणि चेतेश्वर पुजारा (९९). गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याच्याकडे देण्यात आली. या एका षटकात चावलाने २ महत्त्वाचे बळी घेत केवळ ३ धावा दिल्या आणि गुरुग्राम थंडर्सचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरवला.
अखेरचे षटक
१९.१ वा चेंडू – परेराने १ धाव घेतली.
१९.२ वा चेंडू – पुजाराने २ धावा काढल्या.
१९.३ वा चेंडू – पुजारा यष्टीचित ! ९९ धावांवर बाद.
१९.४ वा चेंडू – चिराग गांधी आला, धाव नाही.
१९.५ वा चेंडू – पुन्हा स्ट्राईकवर चिराग गांधी, धाव नाही.
१९.६ वा चेंडू – चिराग गांधी बोल्ड! आणि सामना संपला!