इशान चमकला, सूर्या तळपला

भारताचा न्यूझीलंडवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23rd January, 11:42 pm
इशान चमकला, सूर्या तळपला

रायपूर : ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सनी पराभव करत शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या १५.२ षटकांत ३ बाद २०९ धावा करत सामना सहज जिंकला.
न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सॅन्टनर याने नाबाद ४७ धावा (२७ चेंडू) केल्या. त्याला राचिन रवींद्र याने ४४ धावा (२६ चेंडू) करत चांगली साथ दिली. सुरुवातीला टिम सेफर्ट (२४) आणि डेव्हन कॉनवे (१९) यांनी झटपट धावा जोडल्या.
भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादव याने ४ षटकांत २ विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
२०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मात्र खराब झाली. अभिषेक शर्मा (०) आणि संजू सॅमसन (६) लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत सामना एकतर्फी केला.
ईशान किशनने अवघ्या ३२ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. यात ११ चौकार आणि ४ षटकार होते. दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ८२ धावा (३७ चेंडू) करत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला शिवम दुबे याने नाबाद ३६ धावा (१८ चेंडू) करत चांगली साथ दिली. भारताने अवघ्या १५.२ षटकांत लक्ष्य गाठत सामना ७ विकेट्सनी जिंकला.
भारताकडून यशस्वीरीत्या पाठलाग केलेली सर्वाधिक मोठी लक्ष्ये
२०९ धावा – विरुद्ध न्यूझीलंड, रायपूर, २०२६
२०९ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम, २०२३
२०८ धावा – विरुद्ध वेस्ट इंडिज, हैदराबाद, २०१८
२०७ धावा – विरुद्ध श्रीलंका, मोहाली, २००९
२०४ धावा – विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, २०२०
२०२ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजकोट, २०१३
२००+ धावांचे लक्ष्य सर्वाधिक वेळा यशस्वीरीत्या पाठलाग करणारे संघ
ऑस्ट्रेलिया – ७ वेळा
भारत – ६ वेळा
दक्षिण आफ्रिका – ५ वेळा
पाकिस्तान – ४ वेळा
इंग्लंड – ३ वेळा
२००+ धावांचे लक्ष्य पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून जिंकणारे संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड, रायपूर २०२६ – लक्ष्य: २०९, विजय २८ चेंडू शिल्लक
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड २०२५ – लक्ष्य: २०५, विजय २४ चेंडू शिल्लक
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, बासेटेरे २०२५ – लक्ष्य: २१५, विजय २३ चेंडू शिल्लक
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग २००७ – लक्ष्य: २०६, विजय १४ चेंडू शिल्लक