दिल्ली वॉरियर्सचा पुणे पँथर्सवर ५९ धावांनी दणदणीत विजय

वर्ल्ड लिजेंड्स प्रो टी-२० लीग: नदीम सामनावीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
दिल्ली वॉरियर्सचा पुणे पँथर्सवर ५९ धावांनी दणदणीत विजय

पणजी : वर्ल्ड लिजेंड्स प्रो टी-२० लीग २०२६ मधील पाचव्या सामन्यात दिल्ली वॉरियर्सने पुणे पँथर्सवर ५९ धावांनी शानदार विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पुणे पँथर्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत २० षटकांत ३ बाद २१८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पुणेचा संघ १९.४ षटकांत १५९ धावांत गारद झाला.
दिल्ली वॉरियर्सकडून चॅडविक वॉल्टन आणि श्रीवत्स गोस्वामी यांनी डावाची दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची जबरदस्त भागीदारी झाली. वॉल्टनने ३२ चेंडूत ६२ धावा (५ चौकार, ५ षटकार) करत आक्रमक खेळी केली. गोस्वामीने ३३ चेंडूत ५१ धावा (८ चौकार, १ षटकार) केल्या.
यानंतर सौरभ तिवारी लवकर बाद झाला, पण गुरकीरत सिंग मान (४४ नाबाद) आणि इरफान पठाण (४९ नाबाद) यांनी डाव सावरत अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीला २१८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
पुण्याकडून अमित मिश्रा याने ४ षटकांत २९ धावा देत २ विकेट घेतल्या, तर अभिषेक साकुजाने १ विकेट मिळवली. मात्र इतर गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले.
२१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे पँथर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. शेन वॉटसन (३), मार्टिन गप्टिल (८) आणि रॉबिन उथप्पा (२) लवकर बाद झाल्याने संघ १६ धावांत ३ विकेट्स गमावून अडचणीत सापडला. यानंतर उपुल थरंगा (५०) आणि सामीउल्लाह शिनवारी (५२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. मात्र थरंगा धावबाद झाल्यानंतर पुण्याची मधली फळी कोसळली आणि संघ पुन्हा बॅकफूटवर गेला.
शेवटी खालच्या फळीतील फलंदाज फारसा प्रतिकार करू शकले नाहीत आणि पुणेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १५९ धावांत बाद झाला.
शाहबाज​, उडानाची अप्रतिम गोलंदाजी
दिल्लीकडून शाहबाज नदीम आणि इसुरु उडाना यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत पुण्याच्या फलंदाजीचा कणा मोडला. हरभजन सिंग आणि राहुल शुक्ला यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दिल्ली वॉरियर्सचा हा विजय पूर्णपणे एकतर्फी ठरला. शाहबाज नदीमला सामनावीर घोषित करण्यात आले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करत दिल्लीने या स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे, तर पुणे पँथर्सला पुढील सामन्यांत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.