२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत आयोजन : दिग्गज खेळाडूंचा समावेश

पणजी : राज्यात सोमवारपासून वर्ल्ड लीजेंड्स प्रो टी२० लीग सुरू होणार आहे. उद्घाटन सोहळा संध्याकाळी ७.३० वाजता वेर्णा येथील १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियमवर होईल. दहा दिवस चालणाऱ्या या लीगचे सामने युट्यूब, डीडी स्पोर्ट्स सह अन्य प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळतील. रविवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह हरभजन सिंग, शिखर धवन, कार्लोस ब्रेथवेट, शेन वॉटसन, महेश भूपती व अन्य क्रीडापटू उपस्थित होते.
मंत्री खंवटे यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात ओळखले जाणारा गोवा आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. देशात क्रिकेट खेळाचे अनेक चाहते आहेत. लेजेंड्स खेळाडूंच्या स्पर्धेचे आयोजन गोव्यात केल्याने येथील चाहत्यांना आनंद होणार आहे. त्याशिवाय गोव्याच्या क्रीडा, संस्कृती, आरोग्य आणि अनुभव यांसारख्या विविध पर्यटन संधींचे प्रदर्शन करण्यासही मदत होणार आहे.
हरभजन सिंग म्हणाले की, मागील काही वर्षांत गोव्यात अनेक बदल झाले आहेत. आता येथे वेगळ्या जीवनशैलीचा अनुभव मिळतो. स्वच्छ वातावरण, उत्तम जीवनमान आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे देशभरातील लोक येथे राहणे पसंत करत आहेत. सुधारलेली क्रीडा पायाभूत सुविधेमुळे गोवा केवळ एक पर्यटन केंद्रासह राहण्यासाठी आणि मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून उदयास येत आहे.
पुढील दहा वर्षे लीजेंड्स प्रो टी२० लीग गोव्यातच
महेश भूपती म्हणाले की, गोवा फुटबॉल संस्कृतीसाठी ओळखले जाते. असे असले तरी क्रिकेट हा देशाचा आत्मा आहे. गोव्यात जागतिक दर्जाचे क्रिकेट आणण्याची हीच योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटले. पुढील दहा वर्षे गोव्यात या लीगचे आयोजन करायची आमची इच्छा आहे. लेजेंड्स प्रो टी-२० लीगचे पहिले पर्व २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेर्णा येथील नव्याने उद्घाटन झालेल्या १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत ६ फ्रँचायझी संघ आणि ९० दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार असून, संपूर्ण स्पर्धा एकाच ठिकाणी खेळवली जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट महोत्सवासारखा अखंड थरार अनुभवता येणार आहे.
मायकल क्लार्क लीग कमिशनर
या लीगचे कमिशनर म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लार्क म्हणाले, भारत हा क्रिकेटचा मोठा केंद्रबिंदू आहे आणि गोवा हे या स्पर्धेसाठी उत्तम ठिकाण आहे. जुने मित्र आणि जुने प्रतिस्पर्धी पुन्हा मैदानात एकत्र येताना पाहणे हे खास असेल. या नव्या भूमिकेत मी खूप उत्सुक आहे.
शदाब जकाती ९ वर्षांनी मैदानात
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वाधिक विकेट घेणारा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा घरच्या मैदानावर क्रिकेट खेळताना दिसणार आहे. निमित्त असेल वेर्णा येथील १९१९ स्पोर्ट्स मैदानावर आयोजित करण्यात आलेली वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० क्रिकेट स्पर्धा. ४५ वर्षीय शदाब जकातीची या स्पर्धेसाठी राजस्थान लायन्स संघात निवड झाली असून, त्याने ही माहिती स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना शदाब म्हणाला, या प्रकारच्या लीग पूर्णपणे वेगळ्या असतात. येथे लोक विकेट पाहायला नाही, तर षटकार पाहायला येतात, अशी मिश्कील टिप्पणी करत त्याने आपल्या सहभागाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. शदाब जकातीने गोव्याकडून जानेवारी २०१८ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. तो सामना सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला होता. घरच्या मैदानावर त्याने शेवटचा स्पर्धात्मक प्रथम श्रेणी सामना ऑक्टोबर २०१७ मध्ये खेळला होता. २४ ते २७ ऑक्टोबर २०१७ दरम्यान पर्वरी येथे पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर शदाबला पुन्हा गोव्याची ‘रणजी कॅप’ परिधान करण्याची संधी मिळाली नाही. त्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात शदाबने पहिल्या डावात ५ गडी बाद केले होते. तरीही त्यानंतर त्याची रणजी संघात निवड झाली नाही. रणजी क्रिकेटमधील त्याच्या अखेरच्या सामन्यात त्याने तब्बल ४६ षटकांमध्ये ७ मेडन १६५ धावांत ५ बळी घेत ‘मॅरेथॉन’ गोलंदाजी केली होती.
नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शदाब जकाती पुन्हा एकदा गोव्यातील चाहत्यांसमोर क्रिकेट खेळताना दिसणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० स्पर्धेमुळे गोव्यातील क्रिकेट चाहत्यांना अनेक दिग्गज खेळाडूंना एकाच मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील संघ आणि खेळाडू
राजस्थान किंग्स
कर्णधार: इऑन मॉर्गन, खेळाडू : बेन कटिंग, एल्टन चिगुंबुरा, नमन ओझा, कॅलम फर्ग्युसन, एंजेलो परेरा, जेपी ड्युमिनी, सुरेश रैना, बिपुल शर्मा, पिनाल शाह, जयकिशन कोळसावाला, अभिमन्यू मिथुन, अनुरित सिंग, जेसल कारिया, शदाब जकाती.
दिल्ली वॉरियर्स
कर्णधार : हरभजन सिंग, खेळाडू : सिक्कुग्गे प्रसन्ना, चॅडविक वॉल्टन, इम्रान ताहिर, कॉलिन इंग्राम, इरफान पठाण, इसुरू उदाना, शाहबाज नदीम, चिराग गांधी, श्रीवत्स गोस्वामी, गुरकीरत सिंग मान, राहुल शुक्ला, दिवेश पाठानिया, सुबोध भाटी, रवी जांगिड.
पुणे पँथर्स
कर्णधार : कायरन पोलार्ड, खेळाडू : सामिउल्लाह शिनवारी, उपुल थरंगा, अमित मिश्रा, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, मार्टिन गप्टिल, रॉबिन उथप्पा, कमिल लेव्हरॉक, राहुल यादव, असद पठाण, अंकित राजपूत, फैज फजल, प्रियांक पांचाल, ईश्वर पांडे.
दुबई रॉयल्स
कर्णधार : शिखर धवन, खेळाडू : समित पटेल, पियुष चावला, ख्रिस्तोफर एम्पोफू, फिडेल एडवर्ड्स, धनुष्का गुणतिलका, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, परवेझ रसूल, गीतांश खेऱ्हा, अभिषेक राऊत, पीटर ट्रेगो, मोनू कुमार, अमित वर्मा, कर्क एडवर्ड्स.
गुरुग्राम थंडर्स
कर्णधार : थिसारा परेरा, खेळाडू : फिल मस्टर्ड, रॉस टेलर, चेतेश्वर पुजारा, कॉलिन डी ग्रँडहोम, एस. श्रीसंत, स्टुअर्ट ब्रॉड, रायड एमरिट, जर्मेन ब्लॅकवूड, अमितोज सिंग, शेल्डन जॅक्सन, अक्षय वखारे, मालिंदा पुष्पकुमार, सौरिन ठाकर, पवन नेगी.
महाराष्ट्र टायकून्स
कर्णधार : दिनेश कार्तिक, खेळाडू : कार्लोस ब्रेथवेट, डेल स्टेन, ख्रिस गेल, नेथन कूल्टर-नाईल, स्टुअर्ट बिन्नी, पीटर सिडल, शॉन मार्श, राहुल शर्मा, पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, बलतेज सिंग, मनविंदर बिसला, सिद्धार्थ कौल.