पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनाचा समारोप

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आयुर्वेद म्हणजे मन, शरीर, अन्न यांचा समतोल साधणे आहे. आयुर्वेदाचा जन्म भारतात झाला असून त्याचे जागतिक नेतृत्व भारताकडेच असणे आवश्यक आहे. यासाठी डबल इंजिनचे सरकार प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, डॉ. स्नेहा भागवत, डॉ. मीनल जोशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आयुर्वेदाचे जागतिक नेतृत्व भारताकडे राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून आयुर्वेद व अन्य भारतीय उपचार पद्धतीसाठी आयुष खाते सुरू करण्यात आले. आत्मनिर्भर भारत, आपली स्वतःची ज्ञानप्रणाली बळकट करण्यासाठी डबल इंजिन सरकार प्रयत्न करत आहे. गोव्याला जागतिक आरोग्य आणि स्वास्थ्य पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास यायचे आहे. येथील पर्यावरण, स्वच्छ हवा, पर्यटनासाठी करण्यात आलेल्या पायभूत सुविधा यामध्ये मदत करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. या गोष्टी अन्य ठिकाणी दुर्मिळ असल्याने आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.
ते म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात सर्व जग योग, आयुर्वेदाकडे वळत आहे. शरीर आणि मनाचा समतोल असल्याने प्राचीन असूनही आजदेखील आयुर्वेद सर्व लोकांशी जोडले गेले आहे. एखाद्या व्यक्तीचे डोके दुखत असेल तर अन्य औषधपद्धती वेगवेगळे उपचार करतात. आयुर्वेदात त्या व्यक्तीचा वात, पित्त, त्याची जीवनशैली ताण तणाव, झोप अशा अनेक गोष्टींचा विचार करून उपचार केले जातात. अन्य औषधपद्धती आजारी पडल्यावर उपचार करतात, तर आयुर्वेद आजारी पडू नये यासाठी प्रयत्न करते. आयुर्वेद उपचार पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे कोणतेही नुकसान अथवा साईड इफेक्ट होत नाहीत. उलट यामुळे शरीराला फायदाच होतो.
स्वयंपाक घर हे पहिले क्लिनिक
आयुर्वेदानुसार आपले स्वयंपाक घर हे पहिले क्लिनिक आहे. येथे आले, जिरा, कोकम, नारळ, हळद असे विविध गुणकारी जिन्नस आहेत. आपल्या पूर्वजांनी अन्नात सुरू केलेले हे जिन्नस आजही आपण वापरत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकत्रित उपचार पद्धती
मुख्यमंत्री म्हणाले की, या संमेलनात सुमारे ३ हजार लोकांनी भाग घेतला आहे. यादरम्यान ३५० हून अधिक पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. तर ५०० हून अधिक जणांनी येथील आयुर्वेदिक ओपीडीचा लाभ घेतला आहे. येणाऱ्या काळात आयुर्वेदिक व अन्य उपचारपद्धती एकत्रितपणे कसे काम करू शकतील यावर विचार झाला पाहिजे. मानसिक आरोग्यासाठी आयुर्वेद चांगली उपचार पद्धती ठरू शकते. यामुळे भविष्यात आयुर्वेदिक डॉक्टरांना अनेक संधी उपलब्ध होतील.